
शिवरायांचा प्रताप दर्शवणारा व शिवरायांनी स्वराज्यात पायापासून बांधलेला डोंगरातील एकमेव गड म्हणजे प्रतापगड ! १६५६ साली शिवाजी महाराजांनी जेव्हा मोरेंकडून जावळी जिंकली तेव्हा हा ढोपऱ्या (भोरप्या) डोंगर महाराजांनी हेरला. खरंच ! आजही महाराजांच्या या दूरदृष्टीला वंदन करावेसे वाटते, ते यासाठीच ! कारण आजही तो डोंगर चढताना गुडघे टेकायची वेळ येते आणि वाहनांची सुद्धा प्रचंड दमछाक होते. जावळीतील या डोंगराचे वैशिष्ट्य म्हणजे चाहुबाजुंनी हा डोंगर कुठेही एकसंध नाही म्हणजे कोणतीही डोंगररांग या डोंगराला जोडलेली दिसत नाही. हेच शिवरायांनी हेरले आणि विचार केला कि, शत्रूला लपूनछपून आक्रमण करता येणार नाही. हि भौगोलिक दृष्टी महाराजांकडे होती, त्याचा हा निव्वळ पुरावाच !
प्रतापगड पाहण्याचा योग तसा माझा बराचवेळा आला. दरवेळी त्यातील विविध नाविन्यता जाणवत गेली. अधिक अभ्यास करून एक जाणवले कि, जसे दुर्गसंवर्धनामुळे किल्ला जगतो तसे अभ्यास दौऱ्यामुळे किल्ला बोलतो. असाच एक अभ्यासदौरा किल्ले प्रतापगडावर केला. विविध अंगांचा अभ्यास करून प्रतापगड दाखवताना प्रत्येकजण भारावून गेला होता.
शिवरायांनी स्थापन केलेले हिंदूंचे स्वराज्य कलेकलेने वाढत होते. हिंदूधर्म वाचावा आणि टिकावा यासाठी शिवरायांनी सुरु केलेल्या प्रयत्नांना आता बळ येत होते आणि त्यात आदिलशाहीचा विजापूरच्या दरबारात शिवरायांना मारण्याचा विडा उचलला गेला. विडा उचलणारा बलाढ्य सरदार होता, अब्दुलाखान भटारी म्हणजेच अफजलखान ! हा अफजल जेवण बनवणाऱ्या बाईचा मुलगा आणि त्यात तो बडी बेगमच्या मर्जीतला ! अफजल हे नाव नसून ती एक पदवी आहे. या अफजलचा आत्मविश्वासाकडून अतिआत्मविश्वासाकडे प्रवास सुरु झाला. मराठ्यांचा देव, देश आणि धर्म बाटवणारा हा अफजल वेगाने स्वराज्यात येत होता. हे आपल्या स्वराज्यावर आलेले पहिले बलाढ्य आक्रमण ! मजल दरमजल करत मंदिरांना नेस्तनाबूत करत, हिंदूंना बाटवत व स्त्रियांची अब्रु लुटत हि वावटळ स्वराज्यात आली आणि इतकेच काय तर शिवरायांच्या अप्रतिम राजकारणामुळे जावळीत दाखल झाली. फार आधी स्वतः सुभेदार असलेला ह्या अफजलला जावळी ओळखता आली नाही, तितक्या तत्परतेने हि जावळी शिवरायांनी ओळखली. सह्याद्रीत फक्त वारा, पाणी आणि मराठेच वावरू शकतात तसेच सह्याद्री मराठ्यांशी बोलतो, सह्याद्रीने मराठा ओळखले, मराठ्यांनी सह्याद्री ओळखली, ते उगाच नव्हे. जावळी त्याचाच एक भाग ! इतकी महत्वाची दूरदृष्टी ठेवून शिवरायांनी तेथे बेलाग दुर्ग बांधून काढला. त्यावेळी प्रतापगडाचे नामकरणसुद्धा झाले नव्हते पण फिरंगी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ ला व तिथीनुसार विकारीनाम संवस्तर शके १५८१ ला ह्या बलाढ्य व अतिआत्मविश्वासाने भरलेल्या अफजलचा शिवरायांनी कोथळा बाहेर काढला आणि हे आक्रमण संपूर्णतः थोपवले. हिंदूंच्या सेनाधिपतीने केलेला पराक्रम जागतिक किर्तीचा झाला. धर्म वाचला, देवळं वाचली आणि देवही वाचला. मावळ्यांना आत्मविश्वास मिळाला, दहशतवाद कसा संपवायचा ह्याचे सूत्र महाराजांनी आपल्याला साडे तीनशे वर्षांपूर्वी दाखवून दिले, स्वराज्याला ऊर्जा मिळाली आणि किल्ल्याचे नामकरण झाले “प्रतापगड” !
इतका मोठा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे, पण आज या किल्ल्यावर काही लोक सहल करायला येतात. खरं तर हा गड स्फूर्तिस्थान आहे. शिवरायांच्या पहिल्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. हिंदूंच्या कर्तृत्वाचा आलेख इथूनच तर वाढत गेला, याची जाण मनांत ठेवून तो किल्ला पाहणे गरजेचे आहे. जसे “जय भवानी, जय शिवराय” बोलतांना अंगावर रोमांच उभे राहतात तसे अफजल बुरुजावरुन ती कबर पाहताना तो रोमांचा क्षण आपल्याला अनुभवता येतो पण दुर्दैव या गोष्टीचे वाटते कि, तिथे सुद्धा बरेच लोक सेल्फी मारताना आढळतात. आजही त्या बुरुजावरुन व शेजारच्या तटावरून ती जावळी पाहताना कापाकापीच्या तलावारींचा आवाज कानात घुमतो पण तेव्हा काही पर्यटक फोटोग्राफीमध्ये दंग असतात. किल्ल्यावर तशी दिवसभर काही प्रमाणात वर्दळ असते परंतु महाबळेश्वरला चाललो आहोत म्हणून प्रतापगड वाटेतच बघून जाऊ. या दृष्टिकोनातून काही लोक तिथे फेरफटका मारायला येतात. दिवसभरातील गर्दीपेक्षा संध्याकाळी तिथे जास्त गर्दी होते. कारण काय, तर सनसेट म्हणजेच सूर्यास्त पाहण्यासाठी ! कठीण आहे हे सर्व ! ज्या किल्ल्यावर कधीही न मावळणाऱ्या पराक्रमाचा सूर्योदय झाला तिथे या समाजातील लोक सूर्यास्त पाहण्यासाठी गर्दी करतात. इतिहासाची जाण मनात असेल तर भविष्यात प्रगतीचे सुर्योदय होतच असतात पण खंतेची बाब हि आहे कि, किल्ला नाही तर सूर्यास्त बघायला जास्त गर्दी होते आहे. संध्याकाळी या किल्ल्यावर जास्तीत जास्त लोक पश्चिमेकडे डोळे लावून बसतात. आज हा किल्ला पराक्रमाची निशाणी जपत असताना, काही लोक फक्त पर्यटन करण्यास येत आहेत. ज्या किल्ल्यावर एका बलाढ्य आक्रमणाला मूठभर मावळ्यांनी आणि शिवरायांनी नेस्तानाबुत केले, त्याचा विसर पडत चालला आहे. फार वाईट वाटते कि, आपलेच लोक इतिहास विसरत आहेत.
किल्ला स्वच्छ राहावा म्हणून आज जागोजागी कचराकुंड्या लावल्या आहेत परंतु समाजातील काही पर्यटक किल्ल्याच्या पिछाडीच्या तटावरून प्लास्टीक बाटल्या फेकतात का, तर हवेच्या दाबाने ती पुन्हा बुमरँगसारखी आपल्या हातात येईल. काही वेळा येते तर काही वेळा ती बाटली दरीत जाते. माझ्या मते, इतिहासातील घटनेची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा इतिहास वाचला जाईल आणि हा बालिशपणाचा खेळ थांबेल पण वेळ मिळाला तर इतिहास वाचणारी मंडळी आज आजूबाजूला फिरत आहे. हिच लोक कॉलर ताठ करून सांगत फिरतात कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास विविध देश करत आहेत आणि तुम्ही कधी करणार ? असे, आम्ही विचारल्यावर ती निरुत्तर होतात.
हिंदवी स्वराज्य संस्थापक व मराठ्यांचे पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदू धर्म टिकला, हे नाकारता येणार नाहीत. त्यामुळे त्यांचे गडकिल्ले आपल्यासाठी तिर्थक्षेत्रासारखी आहेत व त्यांचा योग्य तो मान आपण सर्वांनी ठेवायलाच पाहिजे. हि बाब आपल्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. आज असा जाणता राजा पुन्हा होणे नाही. तरी सुद्धा कोणालाही आताच्या काळात राजकारणात “जाणता राजा” हि उपाधी लावण्यात येते. एखाद्या आगाऊ शेमड्या मुलाला आज आपल्याकडे छत्रपती म्हणून हाक मारतात तेव्हा खूप वाईट वाटते जेव्हा अशी नावे माझ्या कानावर पडतात. जागतिक कीर्तीचा प्रजाहितदक्ष राजा, हिंदू धर्माचा सेनाधिपती, मराठ्यांचे पहिले छत्रपती आज आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, हे आपले भाग्य आहे, हे कुठेतरी विसरले जात आहे.
इतिहासातुन बऱ्याच गोष्टी शिकता येतात फक्त डोळसवृत्ती वापरणे गरजेचे आहे. या राजाचा उदो उदो जितका करू तितका कमी आहे. इतिहासात रमताना आज वर्तमानात जगताना भविष्याचा वेध घेता येतो. फक्त तो मनापासून वाचायला पाहिजे. इथल्या मातीला मराठ्यांच्या रक्ताचा गंध आहे, इथल्या सह्याद्रीत मराठ्यांचा मावळ्यांचा वास आहे. हे ओळखणे म्हणजेच शिवरायांना वंदन आहे.
हा माझा लेख दिनांक ७ मार्च २०१७ ला पहिल्यांदा तरुण भारत व दिनांक १५ जुलै २०१७ ला गोव्यातील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र गोवन वार्ता या वर्तमानपत्रात आला. इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा तसेच शिवरायांनी त्यांच्या आयुष्यातील पहिले आक्रमण ज्या गडावर यशस्वीरित्या थोपवले. देव, देश आणि धर्म वाचला तिथे आज पर्यटन म्हणून जायचे कि तीर्थक्षेत्र म्हणून जायचे ? हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, म्हणून हा लेख प्रपंच !
हा लेख वर्तमानपत्रात बऱ्याच लोकांनी वाचला आहेच पण सातासमुद्रापार असलेले आपल्या वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी ह्या ब्लॉगमार्फत प्रयत्न आहे.
लेख कसा वाटला ? हे comment मध्ये किंवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
(लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आलेले आहेत.)
दिनांक ७ मार्च २०१७ ला तरुण भारत वर्तमानपत्रात आलेला लेख….

दिनांक १५ जुलै २०१७ ला गोव्यातील सुप्रसिद्ध वर्तमानपत्र गोवन वार्ता या वर्तमानपत्रात आलेला लेख…

No comments:
Post a Comment