
बरेच दिवस या विषयावर लिहिण्याचा मानस होता, त्याला कारणही तसेच होते. आपल्याकडे अकबर बोलल्यानंतर तरुणाईला जोधा आठवते आणि त्यांच्या प्रेमकहाणीत हा तरुणवर्ग मग्न होतो तर लहान मुलांना बिरबल आठवतो आणि ते त्यांच्या छान छान गोष्टीत रममाण होतात. ह्याच गोष्टी आपल्याकडे आपण सर्व वाचतो आणि मूळ इतिहासापासून दूर निघून जातो. बालवयात पुस्तकातून भेटलेला अकबर खूप जवळचा वाटायला लागतो जो मुळात काल्पनिक इतिहास रचून तयार केलेला असतो. जोधा आणि अकबराची प्रेमकहाणी आपल्यातील काही लोकांना अमरप्रेम कहाणी वाटते आणि धर्माच्या बाबतीत सांगायचे झाले तर “जात प्रेमात आडवी येत नाही”, हे सांगण्यासाठी या जोडीचे उदाहरण दिले जाते. खरंच तसं आहे का ओ ? माझ्या मते, कधीतरी सत्य इतिहासाकडे आपण नजर टाकणे गरजेचे आहे. हाच दृष्टिकोन बाळगून हा ब्लॉगप्रपंच सुरु केला. चला तर मग जाणून घेऊया, बिरबला पलिकडला अकबर….
धर्मवेडा तुर्की बाबर सन १५२६ मध्ये पानिपताची पहिली लढाई जिंकला. इब्राहिम लोदी विरुद्धच्या या लढाईला तो जिहाद म्हणत असे. आपला इस्लाम धर्म इतरांच्यावर लादणे हा त्याला आपला हक्क वाटत असे. हिंदुस्थानचा हा पहिला मुघल राजा ! त्या मागे त्याचे घाबरट मुलगा हुमायुन गादीवर आला. राज्य सांभाळता न आल्याने तो आपला जीव वाचवत पळत होता. त्या धावपळीच्या कालखंडात १५४२ साली त्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव अबुल-मुताह जलालुद्दीन-महमद अकबर !
या परदेशी रक्ताच्या अकबराचे अनघा नावाच्या भारतीय दाईने संगोपन केल्याची नोंद आढळते. पुढे १३ व्या वर्षी तो राजा झाला पण राजधानीच नव्हती. दिल्लीचा ताबा त्यावेळी हेमू या पराक्रमी हिंदू राजाकडे होता. तो स्वत:ला विक्रमादित्य म्हणवून घेत असे. त्याने स्वतःचे हिंदू राज्य निर्माण केले होते. अकबराचा आणि त्याचा संघर्ष अटळ होता. सरते शेवटी सन १५५६ मध्ये पानिपतावर दोघांचे सैन्य समोरासमोर आले, तुंबळ युद्ध झाले. हिंदूंच्या रक्तासाठी चटावलेली पानिपताची भूमी तिच्या स्वभावाला जागली आणि अकबराने ही लढाई जिंकली. हेमू काफराचे स्वतःच्या हाताने त्याने मुंडके उडवले. काफिरांना ठार करणारा धर्मयोद्धा म्हणून “गाझी” ही इस्लामी धर्मशास्त्रातली पदवी स्वतःला त्याने लावून घेतली. स्वतःच स्वतःला पदवी लावून घेण्यात मुघल पटाईत होते. त्यावेळी अकबराचा मार्गदर्शक होता बहरामखान ! अकबर हा काही दयाळू संत नाही किंवा सद्गुणांचा पुतळा ही नाही. तो मध्ययुगातला विचारी राजा आहे आणि नव्या अनुभवांनी व नव्या विचारांनी माणसे बदलतात, याचे द्योतक उदाहरण आहे. पुढे मार्गदर्शक बहरामखानाशी अकबराचा वाद झाला. त्यात बहरामखानाची हकालपट्टी झाली. बहरामखान मक्केच्या यात्रेला निघून गेला तो परत न येण्यासाठी !
१५६२ सालापासून वीस वर्षांच्या अकबराच्या स्वतंत्र कार्यकर्तुत्वाला प्रारंभ झाला. तो धार्मिक होता साहजिकच दरसाल अजमेरची यात्रा करत असे. त्यावेळी तो पुत्रप्राप्तीसाठी आतुर होता. पुत्रप्राप्तीसाठी त्यावेळी यात्रा-जत्रा करणे, अशी धर्मश्रद्धा त्यावेळी सार्वत्रिक होती. अशाच यात्रेत राजा बिहारीमलची कन्या जोधाबाईशी अकबरने लग्न केले. यावरून विशीतला हा अकबर धर्मनिष्ठ मुसलमान वाटतो. जोधाबाईचा धर्म बदल होण्यासाठी नकार असल्यामुळे अकबरकडे उदारमतवादी मुसलमान कि धर्मपिसाट मुसलमान ? हे दोनच पर्याय उरले होते. सरते शेवटी त्याने पहिला पर्याय निवडला.
अकबर एक वेगळ्या धाटणीचा राजकारणी होता. फायदा असेल तेव्हा जमेल तितके उपसून काढा व कठिण प्रसंग असताना कमीतकमी नुकसान होऊन टिकून रहाण्याचे कसब दाखवा. ह्या सूत्रानुसार त्याचा वावर असे. त्यासाठी त्याने साम-दाम-दंड-भेद जमेल तिथे, जमेल तसे व जमेल तितके वापरले. अनुभवाने शहाणे होऊन त्याने राजपुतांशी संघर्ष टाळला. राजपुतांशी संघर्ष करुन आपण शक्तीहीन होत जाऊ व आज ना उद्या आपली सत्ता जाईल हे त्याने हेरले. मोठ्या धूर्तपणे राजपुतांना समजावून अथवा दमात घेऊन एकएकाला फोडून आपल्या भजनी लावले. राजपुतांची सत्ता कायम ठेवण्याच्या बदल्यात त्यांच्याशी रक्तसंबध जोडायची सुरुवात अकबराने केली व ती मुघलांच्या पुढील पिढ्यात सुरु राहिली. ह्यावेळी घाबरलेले अथवा आपला फायदा बघणारे राजपूत अकबराच्या ह्या जाळ्यात अडकले. एकच झेंडा शेवटपर्यंत वाकला नाही तो म्हणजे “उदयपुर”.
अकबराच्या राजपुतांसाठी ३ अटी होत्या त्यावर एक दृष्टिक्षेप..
१) आपल्या घराण्यातील एक उपवर मुलगी अकबराला द्यावी.
२) दरवर्षी एक ठराविक रक्कम खंडणी म्हणून अकबराला द्यावी.
३) अकबराला कुर्निसात करुन त्याच्या समोर गुडघे टेकावेत.
राणा प्रतापांनी ह्यातले काहीच मान्य केले नाही. अखेर अकबराने राणा प्रतापांसाठी पहिल्या २ अटी देखील काढून टाकल्या. आपल्या समोर आपला शत्रू गुढघे टेकतो आपल्याला कुर्निसात करतो हा सुखावणारा भाग तसेच राजकिय दृष्ट्या इतरांसाठी ह्याचे निघणारे सुचक अर्थ एक बादशहा म्हणून अकबराला हवे असणे फार साहजिक होते. पण इथे राणा प्रतापांचा स्वाभिमान अकबराच्या गर्वापेक्षा दृढ व मोठा ठरला. राणाप्रताप शेवटपर्यंत झुकले नाहीच. म्हणूनच पुढल्या पिढ्यांसाठी कायमचे ते “राणांचे” – “महाराणा” असे आदर्श बनले.
राजपूत विषयक अकबराच्या धोरणातला बदल येथूनच सुरू झाला. राजपूतांना सन्मानाने वागवणे. त्यांना मुसलमानांपेक्षा वरच्या हुद्द्यावरच्या जागा देणे वगैरे गोष्टी त्याने सुरु केल्या. त्या वेळच्या काळाचा विचार करता ह्याला थोडाबहुत पुरोगामीपणाच म्हणावे लागेल. त्या काळात गोव्यातले पोर्तुगीज रक्तरंजित इंक्विझिशनमध्ये मग्न होते. सातासमुद्रापार राणी एलिझाबेथच्या इंग्लंडला चर्चमध्ये उपस्थित राहण्यासाठी आयरिशांना कर द्यावा लागत होता तर इकडे हिंदू धर्मपंडितात एकाहून एक कर्मठ भूमिका घेण्याची चढाओढ लागली होती. त्या काळातला अकबराचा हा मर्यादित उदारमतवाद जो सोयीने त्याच्या फायद्याचा आहे. यामध्येच अकबरने पुढचे पाउल टाकले आणि मुल्लामौलवी कायमस्वरूपी बिथरवले. “युद्धात जिंकलेल्या हिंदूना सक्तीने मुसलमान करण्यात येणार नाही” असा सरकारी आदेशच त्याने काढला.
या आज्ञेने मौलवी चिडणे स्वाभाविक होते आणि झाले ही तसेच ! इस्लामचा प्रचार जगभर करण्याचे ध्येय हृदयात बाळगून बिगर मुस्लिमांशी होणारे प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्ध जिहाद मानले जावे, असा मौलवींचा कायम आग्रह होता. दोन मुसलमान राजे आपापसात भांडले तरच ते खाजगी भांडण मानले जात असे. अकबर म्हणतो कि, माझ्या हिंदूंशी झालेल्या लढायांचा आणि इस्लाम धर्माचा काही संबंध नाही. लढाई ही खाजगी गोष्ट आहे. हा इस्लामी धर्मशास्त्रात उघड हस्तक्षेप आहे. अशी चर्चा मौलवी करत असत. १५६२ साली त्याने अजून एक सरकारी आदेश काढून सदर उल सदरचे इस्लामी धर्मपीठाचे अधिकार कमी केले पण अकबर इतके करून थांबला नाही. १५६३ साली त्याने हिंदूंवर असलेला धार्मिक यात्राकर रद्द केला. त्या पुढे जाऊन १५६४ साली जिझिया कर रद्द केला. हिंदूंच्यावर जिझिया कर लावावा का ? हा इस्लामी पंडितातला एक विवादास्पद मुद्दा होता. जो त्याने हद्दपार केला होता. इस्लामी पंडितांच्या प्रत्येक गोष्टीला अकबराने सुरुंग लावला. इस्लाम धर्माची मूळची भूमिका शांतीचीच आहे, असे तो म्हणू लागला. जिझिया सरळ माफ करून अजून अकबर स्वतःला धर्मनिष्ठ मुस्लिम समजत असे. तो नवा विचार करू पहात होता पण काळाच्या सर्व मर्यादा त्यालाही होत्या.
अकबराने १५६६ साली दुर्गावती राणीला युद्धात मारले. तिच्या सुनेला आणि बहिणीला पकडून स्वतःच्या जनानखान्यात टाकले. अकबराच्या अंतःपुरात ५००० स्त्रिया असल्याची नोंद आहे. अकबर विपुल प्रमाणात दारू पित असे. बापाप्रमाणे अफूसुद्धा घेत असे. स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य म्हणून सर्व मादकद्रव्ये एकत्र करून “सबरस” नावाचे पेय बनवून पीत असे. अकबराचा मोठेपणा सांगत असताना त्याची चैन, भोग, अतिरिक्त विलास नाकारण्याचे काहीच कारण नाही. १५६८ ला अकबराने चितोड जिंकले. हा आनंद साजरा करण्यासाठी पकडलेले ८००० राजपूत सैनिक ठार मारले. त्यानंतर ३०,००० निरपराध नागरिकांची कत्तल केली पण युद्धाला धार्मिक रंग येवू दिला नाही.
१५६३ ते १५६७ ह्या काळात अकबराच्या सानिध्यात वेगवेगळे विद्वान आले. प्रथम विरवर जो बिरबल या नावाने विख्यात आहे. ह्याचे मूळ नाव महेशदत्त ! तो मुळचा उत्तर प्रदेशचा आहे. आता तो अकबर बादशहाला कसा भेटला त्याच्या दोन गोष्टी आहेत. एक जी कायम सांगितली जाते, बिरबलाने एका बहिरूप्याची बैलाच्या वेशात असताना पारख केली त्यावरून…. दुसरी गोष्ट अशी कि, महेशदत्त मुळचाच विद्वान व शूर ब्राह्मण होता. त्याने एका महिलेला वाघापासून वाचवले म्हणून त्याला पदवी मिळाली “वीरवर” उत्तरेत ‘व’ चा उच्चार ‘ब’ होतो, म्हणून त्याचे झाले ‘बिरबल’ ! जो आज आपल्या मनावर राज्य करत आहे. राजा तोरडमल, राजा मानसिंग आणि बिरबल ह्या हिंदू मित्रांच्या सानिध्यात एक वेगळाच अकबर आकारू लागला. अकबर स्वतः सुन्नी मुस्लिम असला तरी त्याचा लहानपणापासूनचा शिक्षक लतीफ कझवानी हा शिया मुस्लिम होता. त्याची धार्मिक भूमिका “सुलह ई कुल” या नावाने ओळखली जाते. साधारणपणे सर्वधर्मसमभावाच्या जवळ जाणारी ही भूमिका आहे. अकबराच्या अंतःपुरातील हिंदू स्त्रियांचाही त्यावर प्रभाव पडत होता. मुख्य म्हणजे नव्या अनुभवातून नवे शिकण्याची आणि स्वतःची मते बनवण्याची एक विलक्षण शक्ती अकबराजवळ होती. त्याकाळी ती दुर्मीळ होती, हे हि तितकेच खरे !
१५७३ साली तो गुजरातला गेला. त्यावेळी एका पारशी धर्मपंडिताशी त्याची भेट झाली. मूळचे इराणचे पारशी अग्निपूजक असत. सैतान हा अग्नीपासून बनलेला आहे असे इस्लामी धर्मगुरू मानत असत. पारशी वगैरे अग्निपूजक काफिरांना ठार मारले पाहिजे अथवा मुस्लिम केले पाहिजे. इथपर्यंत मौलवींत एकमत होते. अरबांनी इराण जिंकल्यानंतर सर्व देश मुसलमान करण्यात आला. धर्मासाठी जीव घेवून भारतात पळालेले लोक म्हणजे पारशी ! दस्तूर मेहराजी राणा या पारशी धर्मपंडिताशी चर्चा केल्यानंतर अकबराने म्हटले, पारशी हा देखील एक ईश्वरी धर्म आहे. शीख धर्माकडेही अकबराचे लक्ष होते. गुरू अर्जुनसिंग यांच्याशी अकबराने अनेकदा चर्चा केली. गुरु ग्रंथसाहेब हाही एक दैवी धर्मग्रंथ आहे असे अकबर मानू लागला. धार्मिक विषयांवर चर्चा करण्याचा छंद अकबराला लागला आणि इबादतखान्याचा (एक वास्तू) जन्म झाला. शिया, सुन्नी, पारशी, शीख, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव असे वेगवेळ्या पंथांचे पंडित बोलावून इबादतखान्यात अकबर त्यांच्याशी चर्चा करू लागला. येथे चार्वाकाचे अनुयायी येवून गेल्याचे नोंद आहे. या चर्चात परस्पर मतांचे खंडन होत असे. काफिरांना कुराणचे खंडन करायचा अधिकार देणे मौलवींना पटण्याजोगे नव्हते. हळूहळू सर्वच धर्म खरे आहेत अशा भुमिकेवर अकबर येवून पोचला. सैन्याच्या हालचालींमुळे शेते तुडवली गेल्यास नुकसानभरपाई देण्याचा हुकुम अकबराने याच काळात काढला. पुढे मुस्लिम धर्मगुरूंचा ब्लास्फेमीचा अधिकारच अकबराने १५७९ साली रद्द केला.
राजा मानसिंग हा श्रद्धाळू वैष्णव होता. त्याने अकबराची वल्लभ संप्रदायाच्या संतांशी भेट घडवून आणली. भेटीनंतर अकबराने वृंदावनाच्या परिसरातले सर्व कर माफ करून टाकले. त्या परिसरात गोहत्याबंदीचा कायदा केला. १५८० साली अकबराने कायदा केला की, आजपर्यंत ज्यांना जबरदस्तीने मुस्लिम करण्यात आले आहे, ते सर्व त्यांच्या मूळच्या धर्मात परत जाऊ शकतात. १५८० सालीच अकबराने ज्येसुईट मिशनऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. अकबराला त्यांची स्वेच्छेने दरिद्री राहून आयुष्यभर जनसेवा करण्याची मिशनरी वृत्ती आवडली. पण मिशनऱ्यांचा प्रयत्न अकबराला ख्रिश्चन करण्याचा होता. त्याला मात्र अकबर बधेना. मिशनऱ्यांनी त्याला पाखंडी ठरवले. मिशनरी लिहितात, “अकबर हिंदूसारखा मिश्या ठेवतो. दाढी ठेवत नाही. तो सूर्याची पूजा करतो. तो नास्तिक आणि पाखंडी आहे. फाजील जिज्ञासा हे त्याचे वैशिष्ट्य आहे.”
अकबराचा पाडाव झाल्याशिवाय भारतात इस्लामला भविष्य नाही असे मौलवींना वाटत होते. त्यांनी अकबराला काफर म्हणून जाहीर केले आणि अकबराविरुद्ध जिहाद पुकारला. अकबराने उलेमा आणि मौलवींचे बंड क्रूरपणे चिरडले. अनेक शेख आणि फकीर हद्दपार केले. अनेकांना कंदहारच्या बाजारात विकले. त्यांच्या दर्गे आणि मशिदींच्या जमिनी जप्त केल्या. राजकीय गोंधळ घातल्यास वक्फ च्या जमिनी जप्त करणारा आणि इस्लामी धर्मवेड्यांना गुलाम करून कंदहारच्या बाजारात विकणारा आणि त्या बदल्यात बैल आणणारा, अकबर हा पहिला आणि शेवटचा भारतीय आहे, हे लक्षात असू द्या. धर्माच्या बाबतीत अकबराच्या डोक्यात वेगळीच चक्रे फिरत होती. त्याने सगळ्या धर्मचर्चा ऐकल्या होत्या. बऱ्या वाईट गोष्टी सगळ्याच धर्मात असतात असे त्याला वाटू लागले. वाईट गोष्टी टाळून सगळ्याच धर्मातल्या चांगुलपणा एकत्र केला तर….
“दिने इलाही” या धर्माचा जन्म झाला. हो ! अकबराने नवीन धर्म जन्माला घातला होता. अकबराने त्याच्या धर्माचा हा नियम मोडला आणि स्वतःलाच पुढचा प्रेषीत जाहीर केले. वेद, रामायण व महाभारत यांची फारसीत भाषांतरे करून तो अभ्यासू लागला. मुस्लिमांच्या शाळांतून, मदरशातून त्यावेळी प्रथम अरबी भाषा आणी नंतर धर्मशास्त्रांचा अभ्यास होत असे. अकबराने अशी भूमिका घेतली की, शाळांतून इतिहास, तत्त्वज्ञान, गणीत, वैद्यक, ज्योतिष याचा अभ्यास झाला पाहिजे. एका अर्थाने आधुनिक अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ त्याने रोवली.
पुढे जावून अकबर म्हणू लागला सर्वच धर्म मानवाने निर्माण केलेले आहेत. म्हणून काळानुसार धर्मात बदल केले पाहिजेत. त्याने नियम केला की पती पत्नीत १२ वर्षापेक्षा अधिक अंतर असता कामा नये. अनेक लग्ने केलेल्या अकबराला आता एकपत्नित्व हवे होते. १५८२ नंतर त्याने आणखी लग्ने केली नाहीत. हिंदू आणि मुसलमान अशा दोघांनाही समान नागरी कायदा एकपत्नित्वाचा कायदा लागू केला. हा तत्कालीन हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही धर्मातला हस्तक्षेप होता. त्याने सक्तीने सती जाण्यावर बंदी घातली. विधवांना पुनर्विवाहाची परवानगी असावी, असे त्याला वाटत होते. मुलगा १२ व्या वर्षी सज्ञान होतो; तेव्हा त्याच्या परवानगीनेच त्याची सुंता १२ वर्षी करावी, असा कायदा तो आणू पाहत होता.
दिने इलाहीच्या स्थापने बरोबरच अकबराने जाहिर केले. समाजाच्या भल्यासाठी धर्मात हस्तक्षेप करणे हा राजाचा अधिकार आहे. अकबर सुरवातीला कडवा मुस्लिम होता. तो नंतर बदलत गेला. सहिष्णू मुस्लिम झाल्यानंतर अकबर नास्तिक मताकडे झुकू लागला. शेवटी इस्लाम त्यागून त्याने नवा धर्म काढला. अकबराच्या “दिने इलाही” या नव्या धर्माला पंचवीस हून कमी अनुयायी मिळाले. पण त्याने त्याचा नवा धर्म कोणावरही लादला नाही. मुल्ला मौलवींना कंदाहरच्या बाजारात विकणार्या अकबराला ते अवघड नव्हते. हा बुद्धिवाद, हि सहिष्णुता एक प्रकारचा चमत्कार होता. सेक्युलर हा शब्द जन्मण्याआधी हे घडत होते. फ्रेंच राज्यक्रांती घडायला अजून २०० वर्षांचा अवकाश होता.
अकबर हा शब्दश: विक्षिप्त होता. त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक खरे-खोटे किस्से आहेत. स्वता:ची, सत्ता टिकवण्यासाठी धडपडणारा तरुण ते सत्तेसाठी वाट्टेल ते राजकारण – समाजकारण करणारा बादशहा आणि नंतर स्वयंघोषित प्रेषित बनलेला सम्राट ही वाटचाल स्तिमीत करणारी आहे.
अकबराच्या काळात ग्रंथसंपदा, अनेक उत्तम व भव्य वास्तू, अनेक शहरे उभी राहीली. मी स्वता: आग्राहुन फत्तेहपुरला गेलो तिथे दर ३ किमी वर सध्या उत्तम स्थितीत असलेले कोसमिनार पाहिले. (खालील फोटोत तुम्ही पाहू शकता.)

जनानखान्याबरोबर त्याचा पीलखाना असे. म्हणजे हत्तींचा भरणा ! ह्याबाबत अनेक आश्चर्यकारक कथा सुद्धा आहेत. अकबराच्या कारकिर्दिवरती शेकडो पुस्तके लिहीली गेली इतका हा विषय मोठा आहे. पण मला मुख्य भर द्यायचा आहे तो धार्मिक व राजकिय बाबतीत….
अकबर सत्तेवरती येणे हा हिंदूंसाठी “buffer Period” होता. हे आपण लक्षात घ्यायला हवे. सत्ता स्थापून ती पक्की होईस पर्यंत २-४ प्रसंग सोडले तर अकबराने सरसकट कत्तल केलेली नाही. त्या आधी त्याने प्रचंड कत्तल केलेली आहे. हे हि विसरता कामा नये. अकबराने जनान्यातील राजपूत स्त्रियांना हिंदू सण साजरे करायची परवानगी दिली. तो स्वत: त्या सण-समारंभात सामिल होऊ लागला. हे त्याकाळच्या मुस्लिम धर्ममार्तंडांना न झेपणारं होतं. पुढे पुढे तर त्याने राजपुत स्त्रियांच्या सहवासात येऊन मांसाहार बंद केला. जेवण्याच्या पध्दतीत हिंदुंच्या अन्नाप्रमाणे बदल होत गेले. त्याने हिंदु सण साजरे केले व अन्नाच्या सवयी बदलल्या म्हणून अकबर महान वगैरे अजिबात होत नाही. मात्र ह्याचा तत्कालिन “राजकारणावरती” व समाजावरती प्रभाव पडला होता हे हि नक्की ! अजमेरला तापल्या वाळूत नागव्या पायाने चालत फत्तेहपुर सिक्री येथे येऊन सलीम चिश्ती समोर मुलासाठी नवस करणारा अकबर नंतर नंतर खूप बदलत गेला. जनानखान्यामुळे राजपूत स्त्रियांच्या सहवासात तो आलाच होता पण पुढे त्याने आपल्या दरबारातील लायक अशा हिंदू लोकांना महत्वाची पदे देऊ केली. बदलत गेलेला अकबर पाहताना त्याने भूतकाळात हिंदूवरील केलेले अत्याचार विसरता कामा नये म्हणूनच अकबर सत्तेवर येणे हा आपल्यासाठी buffer period होता, असे मी आधीच सांगितले आहे.
अकबराची एक खासियत होती, ती म्हणजे तो समोर दिसेल तेच मानणारा व तर्काच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तासून बघणारा होता. दरबारातील मुल्ला-मौलवींशी भाषा म्हणजेच माणसाचे संवाद करणे, वगैरे बाबतीत त्याचे वाद झाले. मुल्ला-मौलवी नेहमीप्रमाणे फरीश्ते येऊन मानवाला भाषा शिकवून गेले वगैरे बरळू लागले तसे अकबराने हे चूकीचे आहे. मुल आजूबाजूच्यांकडे बघून शिकते हे ठासून सांगितले पण मुल्ला-मौलवी धर्मग्रंथाच्या बाहेर यायला तयार नव्हते. तेव्हाच “विक्षिप्त अकबर” जागा झाला.
त्याने शहराबाहेर दूर एका निर्जन ठिकाणी एक महल बांधला व राज्यातील काही मोजकी तान्ही मुले तिथे ठेवली व त्यांचा सांभाळ करण्यासाठी सगळे मुके व बहिरे ठेवले. पुढे ४-५ वर्षांनी त्या मुलांना सगळ्यांसमोर आणल्यावर ते फक्त प्राण्यांसारखे आवाज तितके काढत होते. पुढे त्या महालाला “गुंगा महल” असे नाव पडले. (हि वास्तू मी स्वता: पाहिली. गाईड लोक ह्या वास्तुविषयी काहीही सांगत नाही. कारण so called secular) असो ! हे करून त्याने मुल्ला-मौलवींची तोंडे बंद केली पण त्या मुलांच्या आयुष्याशी तो खेळला हे देखिल तितकेच खरे !
अकबराने अनेक बाबी इस्लामच्या बाहेरीलच नव्हे तर इस्लामच्या पूर्ण विरुद्ध केल्या. जोधा सूर्याचे पूजन करत असे तसेच तिचे पाहून तो हि सूर्य पूजक बनला. सूर्य हा सर्वांना उर्जा देतो त्याची उपासना करायला हवी हे तोच सांगु लागला. अकबर सूर्य नमस्कार घालत असे. “अकबरनामा” व “ऐन-इ-अकबरी” ह्या ग्रंथांचा कर्ता अबुल फजल ह्याला बिरबल आणि तोरडमल जबाबदार असून त्यांनी बादशहाला बिघडवले असे तो म्हणतो. अकबरने ह्याच अबुल फजल कडून महाभारताचा अनुवाद करवून घेतला वरुन त्यात जसे दिलंय तस्सच भाषांतर कर एकही शब्द तुझ्या मनातला लिहायचा नाही अशीही तंबीही दिली. काफरांचे हे ग्रंथ वाचल्यामुळे मला सुद्धा जहन्नुममध्ये जावं लागेल अशी भीती वाटाल्याचेही अबुल फजल लिहीतो.
अकबराची केस दिवसेंदिवस मुल्ला-मौलविंच्या हाताबाहेर जाऊ लागली. इस्लाममध्ये “दर्शन देणे” असा काही प्रकार नाही. अकबर मात्र सकाळ – संध्याकाळ लोकांना सज्जात उभं राहुन दर्शन देऊ लागला. हीच प्रथा पुढे मुघल घराण्यात कायम राहीली हे आपण लक्षात घ्यायला हवे. लोकांच्यात तो अवतारी पुरुष आहे अशी धारणा बनली. अकबर जी फळे वाटत असे ती लोकं प्रसाद म्हणून नेत. त्याने फत्तेहपुर सिक्री येथे सूर्याचे दर्शन घेण्यासाठी महालात बांधलेले ठिकाण मी स्वता: पाहिले, हे ३ मजले असून खालील फोटोत पाहू शकता.

आयुष्याच्या एका टप्यावरती कधीतरी अकबराची गंगेवरती फार श्रद्धा बसली. त्याला पिण्यासाठी फक्त गंगेचंच पाणी लागे. अगदी स्वारीसाठी तो शेकडो किमी दूर असला तरी त्याच्यासाठी गंगेच्या पाण्याची खास सोय केली जात असे. तो हिंदूप्रमाणे गंगेला पवित्र मानत असे. पुढे औरंगजेब सुद्धा गंगेचेच पाणी प्यायला. त्याने तर यात एक पाऊल पुढे टाकले. स्वता:च्या सर्व कामांसाठी तो ते पाणी वापरू लागला. २७ वर्ष महाराष्ट्रात असताना देखील त्याने ४००० उंट उत्तरेतून फक्त पाणी आणण्यासाठी ठेवले होते.
अकबर हा माणूस एकंदरच विचित्र होता. अकबरनामानुसार त्याला लहानपणापासून अंधाराची भिती वाटत असे, तो आपल्या दोन मजली शाही तंबूच्या बाहेर पुरुषभर उंचीच्या मेणबत्या रात्रभर जळत ठेवत असे. पहाटे फटफटलं की मग थोडावेळ झोपत असे. रात्रभर मशाली व शेकोट्यांच्या प्रकाशात विविध खेळ, मल्लांच्या कुस्त्या, गायन आणि अगदिच हटके म्हणाल तर रात्री-बेरात्री बैल, हत्ती, कोंबड्या-कबुतर्यांच्या झुंझी वगैरे बघत बसे. असाच एकदा उधळलेला बैल त्याच्या अंगावरती येऊन अकबर जखमी झाला होता पण त्याला एकंदरच पशु-पक्षांचा शौक होता. तो शिकार वगैरे करत असे पण त्याच बरोबर पकडलेल्या प्राण्यांच्या, पक्षांच्या – किड्यांच्या झुंजी लावत असे. काचेच्या पेटीत २ कोळी किंवा नाकतोडे सोडून त्यांची मारामारी व दुसर्याला पकडून खाऊन टाकणे वगैरे फार रस घेऊन बघत असे. हत्तींप्रमाणे त्याला कबुतरांचाही फारच शौक होता. उत्तमोत्तम जातींची कबुतरे त्याने जमवली होती. महालाच्या गच्चीत जाऊन ती कबुतरे उडवायचा छंदच होता त्याला ! त्याने त्या छंदाला नावही एकदम रोमॅंटिक दिले होते, “इश्कबाजी.” पारवा व कबुतर्यांच्या एकंदरच “गुट्टरग्गुम” आवाजामुळे आणि एकमेकांशी चावटपणे वागण्याची पध्दत बघून त्याला हे नाव सुचले का ? हे मात्र कळायला मार्ग नाही.
अकबरचा सर्वात आवडता छंद म्हणजे शिकार ! आणि या शिकारीसाठी चित्ते पाळण्याची सुरुवात अकबरने केली. २१ नोव्हेंबर १५६९ पासुन अकबराकडे १५९५ सालापर्यंत १००० चित्ते होते. एका चित्याला जवळपास ४ किलो मटण रोज लागत असे. या चित्त्यांसाठी अकबर रोज ४ टन मटण घेत असे. यात सुद्धा अकबराने एक प्रयोग केला. एका चित्त्याच्या पिल्लाला अकबरने हरणाच्या पाडसाबरोबर वाढवले होते. तो मोठा झाल्यावर सुद्धा बाकीच्या हरणांची शिकार करत असे, पण ज्या पाडसासोबत तो मोठा झालाय त्यासोबत पिंजऱ्यात राहत असे. अकबराकडे अनेक चित्ते, हरिण, ससा, कबूतर आणि अनेक प्रकारचे पक्षी होते. अकबरने कुत्रेसुध्दा पाळले होते. त्या काळी कर्मठ, धार्मिक धोरणांमध्ये डुक्कर आणि कुत्रे पालणे हे असंस्कृतीक आणि धर्माच्या विरोधातील होते आणि त्यावेळेस अकबरने कुत्रे पाळणे म्हणजे एक धाडसी निर्णय होता.
हे असले प्रकार करणारा विक्षिप्त अकबर न्यायदानाचे नियम मात्र काटेकोर पाळत असे. भूक लागली असताना, न्यायदानाच्या आधीच दुसर्या कारणाने चीडचीड होऊन मग न्यायासनावर बसले असल्यास किंवा आधीच्याला कडक शिक्षा दिली असताना पुढल्या प्रकरणात लगोलग शिक्षा अथवा निर्णय द्यायचा नाही. असा नियम त्याने बनवला होता. कारण अशा मनस्थितीत गरजेपेक्षा जास्त कठोर शिक्षा अथवा अविचारी निर्णय दिला जाऊ शकतो असे त्याचे तर्काला धरुन असलेले मत होते.
अकबरच्या राजकिय, सामाजिक, आर्थिक बाबी, प्रशासन, लढाया, कौटुंबिक कलह सरते शेवटी लग्नानंतर हिंदू धर्माच्या प्रेमात पडून सूर्य दर्शन, पूजापाठ यामध्ये गुंतणारा, त्याचे हत्तींवरील प्रेम, छंद वगैरेंवर लिहिला तर प्रत्येकी किमान एक एक लेख होईल. पण ह्या लेखात थोडीशी राजकीय बाजू व मुख्यत: धार्मिक बाजू दाखवण्याचा उद्देश होता.
अकबरने फत्तेहपुर सिक्री हे शहर त्याकाळी खूप सजवले होते. ह्या शहराविषयी राल्फ फीच नामक इंग्लिश व्यापारी/प्रवासी अकबराच्या काळात भारतात आला. त्याने खालील नोंद केली आहे.
“आग्रा आणि फतेहपूर सिक्री लंडन शहरापेक्षाही मोठी शहरे आहेत. लोकसंख्यादेखील लंडनपेक्षा अधिक आहे. आग्रा ते फतेहपुर २२ मैल असून कोणी या मार्गावरून प्रवास केला तर त्याला बाजारातून फिरल्याचा अनुभव येतो.”
पोर्तुगीज पादरी “अन्तनिओ मोसेरेत” अकबराचे धर्मांतर करण्यासाठी आला होता. तो लिहतो,
“युरोपातील एकही शहर लाहोर इतके मोठे नाही. जोनपूर आणि अलाहाबाद अत्यंत संपन्न शहर आहेत आणि दिल्ली लाहोर पेक्षा हि मोठे आहे.”
अजमेर, फतेहपुर, लाहोर, ढाका, राज महाल, वाराणसी, हुगळी, मुलतान, पटना इ शहरातील व्यापार आणि संपन्नता पाहून युरोपियांना नेहमीच भुरळ पडायची. जवाहर, खडे, पराचन करी इ. सारख्या कला विविध नक्षीदार कपडे यामुळे रंगीबेरंगी देश म्हणून जगात भारताची ओळख होती. आजही कंट्री ऑफ कलर्स म्हणून भारताची ओळख आहे.
मी स्वता: फत्तेहपुर सिक्री हे ठिकाण पाहिले. तिथे अकबराने बांधलेला हवामहल, जोधाला सूर्याच्या दर्शनासाठी ३ मजली बांधलेला महाल, दगडांच्या कोरीव जाळ्या, तानसेनला गाण्यासाठी तळ्याच्या मध्यभागी केलेली आसनव्यवस्था ती अभेद्य तटबंदी, अकबराचा गुरू सलीमचा दर्गा व गुंगामहाल अत्यंत अभ्यासण्यासारखे आहे.
तर असा हा अनेक पैलू असलेला विचित्र, विक्षिप्त आणि कधी कधी दिलदार असलेला अकबर इथे मांडण्याचा मी प्रयत्न केला. सत्ता मिळवण्यासाठी, वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि पसरवण्यासाठी त्याने शक्य त्या सगळ्या बर्यावाईट मार्गांचा वापर केला, हे यातून सिद्ध होते.
हा ब्लॉग लेखनासाठी सर्व संदर्भ खालील दस्तावेजात आहेत.
१) अकबरनामा (चित्ररूप) – दिल्ली येथे अस्सल प्रत पाहिली.
२) ऐन-इ-अकबरी – अबुल फझल
३) फत्तेहपुर सिक्री – गॅझेट दस्तावेज
४) भारतातील मुस्लिम राजकारणाचा वेध
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
लेखनाचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.
फत्तेहपुर सिक्रीचे काही खास फोटो खाली देत आहे.
रात्रभर जागून तानसेनला गाण्यासाठी कृत्रिम तलावाच्या मध्यभागी केलेले आसन..

मुघलांचा हातखंडा असलेली एकसंध दगडात कोरलेली दगडी जाळी….

शतपावलीचा व्हरांडा….

कलाकुसर (ताजमहालची छाप)

वास्तूंचे दगडी खांब….

अकबरने बांधलेला जगातील सर्वात उंच दरवाजा – बुलंद दरवाजा….

अबुल-मुताह जलालुद्दीन-महमद अकबर….

लेख कसा वाटला ते खाली comment मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर कळवा.
No comments:
Post a Comment