अखंड सावधान असावे….



शिवराय हे एक अगाध व्यक्तिमत्व आहे. अफाट विचारांच्या ह्या राजाच्या मनाचा वेध आजही घेता येत नाही. ती झंजावती कारकीर्द आठवताना त्यावेळी टेन्शन काय असेल ? हे शब्दांत सांगता येत नाही. फक्त ५० वर्षांचे आयुष्य पण आजही साडे तीनशे वर्ष झाली तरीही स्फूर्तिदायक वाटतात. रायगड, राजगड आणि प्रतापगड ह्या बलाढ्य किल्ल्यांचे बांधकाम पाहून स्थापत्यशास्त्र म्हणजे काय ? आणि आपल्या राजाचा त्याविषयी असलेला खोलवरचा अभ्यासाचा वेध घेता येतो. शिवचरित्र कधीही, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत वाचले तरी ते नवीन काहीतरी शिकवते. दबावात असाल तर १००% बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते. प्रसिद्धीच्या झोतात असाल तर जमिनीवर यायला शिकवते म्हणजे एकंदरीत कधीही आणि कुठूनही सुरुवात करा, शिवचरित्र प्रगतीपथावर यायला शिकवते.
आज दुर्दैव हे आहे कि, शिवचरित्र वाचायला घेतल्यावर आपला बुद्धीभेद करण्यासाठी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या विचारजंतांची वळवळ चालू होते मग लेखकाला पहिले शिव्या कारण तो ब्राम्हण असतो मग हाच विचारजंत पिवळे पुस्तक हातात ठेवतो आणि हेच खरं म्हणून आपल्यावर बिंबवत राहतो. तेव्हा वाचकाचा पारा इतका चढतो कि, हे पण नको आणि ते पण नको म्हणून तो काहीही वाचत नाही. वाचायला घेतले तर जाडजूड शिवचरित्र वाचण्यापेक्षा पिवळं पुस्तक ५०-१०० पानांचे असते म्हणून ते वाचतो आणि मोठा गैरसमज व्हायला इथूनच सुरुवात होते. शिवचरित्र इतके अफाट असून आज बरेच लोक शिवरायांचे गुरू कोण ? त्यांच्या सैन्यात यवन किती ? ते गोब्राम्हणप्रतिपालक आहेत कि नाहीत ? त्यांच्या तलवारीचे नाव काय ? त्यांच्या घोड्याचे नाव काय ? अशा छोट्या छोट्या प्रश्नांत आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. त्यात हे लोक इतके अडकले आहेत कि, त्यावरून वादविवाद होईपर्यंत मजल जाते. अथांग कीर्तीच्या शिवरायांच्या विचारांना मात्र तिलांजली दिली जात आहे.

यवनांचे लांगूलचालन करण्यासाठी म्हणा अथवा राजकीय चाल म्हणा; अफजल इथे स्वराज्याच्या सीमा वाढवायला आला होता, शिवरायांनी मशिदी बांधल्या, त्यांच्या पहिला सेनापती अमुक त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख तमुक, शिवरायांच्या सैन्यात इतके इतके यवन होते. असे काहीही सांगत आपल्याच धर्मात फितुरी माजवली जात आहे. शिवरायांच्या सैन्यात यवन होते तर शिवराय यांना सेक्युलर वाटतात तर औरंगजेबाच्या सैन्यात राजपूत आणि कितीतरी हिंदू सरदार होते मग तो का नाही सेक्युलर वाटतं ? सोयीने हि राजकीय मंडळी इतिहास बदलत आहे. हे ह्यातून जाणवते.
बरेच लोक मला भेटून सांगतात कि, ते जाडजूड शिवचरित्र वाचायला घेतले कि, आम्हांला झोप येते. ज्या राजाने साडेतीनशे वर्षांपूर्वी शत्रूंच्या झोपा उडवल्या आणि हिंदू धर्म वाचवला त्या राजाचे चरित्र वाचताना जर झोप येत असेल, तर अशा शहाण्यांना आपण काय बोलणार ? आज बुद्धीभेदाचे पीक इतके अमाप आले आहे कि, “जय भवानी जय शिवाजी” अशी एकेकाळची असलेली आपली घोषणा “जय जिजाऊ जय शिवराय” अशी येऊन स्थिरावलेली आहे. यात वाईट काही नाही, असे सर्वसामान्यांना वाटते पण “भवानीमाता” नाकारण्यासाठी काही संघटनांचा जोमदार प्रयत्न आहे. त्यात आपल्या साधेपणामुळे ते काही अंशी यशस्वी होत आहेत, हे हि नक्की !
विशिष्ट समाजाला फक्त शिव्या द्यायच्या आणि जातीभेद निर्माण करण्यासाठी पिवळी पुस्तके फुकटात वाटायचा यांचा धंदा हि जंत मंडळी जोमदार करत आहे. कोणताही पुरावा न देता, उगाच काहीतरी सांगत फिरायचे आणि पुरावा मागितला कि, भांडण करायचे. रामदास स्वामी बोलले होते कि, अखंड सावधान असावे, ते उगाच नव्हे. तर समर्थांवर या लोकांनी कमरेखालचे विनोद केले आहेत पण एक नक्की समर्थांची दूरदृष्टी आज आम्हांला कळून येत आहे. जो पर्यंत समकालीन कागद उपलब्ध आहे तो पर्यंत इतिहास बदलता येणार नाही पण त्याला आवाहन देणारा त्याच काळातील कागद उपलब्ध झाला तर मात्र घटना काही अंशी बदलली जाण्याची शक्यता असते. आज मात्र पुरावा न देता घटना बदलण्याचे काम काही लोक करत आहेत, हे क्लेशदायक आहे.
शिवचरित्र वाचलं जात नाही म्हणून शिवराय आज शिवजयंतीला वाजवायचा आणि गाजवायचा विषय बनला आहे नाहीतर वैचारिक शिवजयंती साजरी झाली असती. शिवजयंतीला DJ मध्ये बेस आणि टॉप किती याची जणू स्पर्धा लागलेली आहे. खंत हि आहे कि, यातून आपला राजा खूप दूर निघून चालला आहे आणि म्हणूनच so called शिवभक्त जन्माला आले आहेत. हीच लोकं शिवरायांना style icon म्हणून समाजाच्या समोर आणत आहेत. त्यासाठी निमुळती दाढी, चंद्रकोर आणि कानांत डूल मिरवला जात आहे. काळ कठीण येत आहे, त्याला कारण ह्या गोष्टी आहेत ज्या नकळत घडवल्या जात आहेत. तुमची आमची शिवजयंती आणि तुमचा आमचा राज्याभिषेक ह्यातच शिवरायांना वाटून घेतले आहे. तोडगा विचारांनी निघतो पण दुर्दैवाने आज अविचारांचा बाजार मांडला आहे. निमुळती दाढीवर ताव मारून गडावर अथवा गडाखाली दारू रिचवली जात आहे, तंबाखू आणि गुटख्याचा तोबरा भरला जात आहे. चंद्रकोर लावून नजर नाही तिथे भिरभिरत आहे. डूल घातलेल्या कानावर सिगारेट ठेवली जात आहे. स्वतःच्या नावापुढे शिवरायांचा मावळा, शिवभक्त, शिलेदार, सरसेनापती, किल्लेदार अशी विशेषणं लावली जात आहेत. बरीच मंडळी प्रसिद्धी मिळविण्यासाठी किल्ल्याचे संवर्धन करत आहेत, हे सोशल मीडियावर टाकलेल्या १००-१५० फोटोंमधून स्पष्ट होते. फार कमी मंडळं, प्रतिष्ठान आणि संस्था आहेत जी मनापासून प्रसिद्धीच्या झोतात न येता, हे कार्य करत आहेत.
शिवराय हे कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते, हे नव्याने कथन करण्याची गरज नाही. ह्या हिंदू राजाने कधीच धर्माच्या नावाने राज्य केले नाही तसेच धर्म जनतेवर लादलासुद्धा नाही तर हिंदू धर्म वाचवण्यासाठी शस्त्र हाती धरले होते, हे हि तितकेच सत्य आहे. मागील काही वर्ष शिवराय किंवा आणखी कोणाला पुरोगामी वा सेक्युलर ठरवण्याची खेळी नवी नाही पण सत्य लपत नाही. आदिलशाही, मोघलशाही, कुतुबशाही, निजामशाही आणि बिरदरशाही अशा विविध शाह्या हिंदू धर्म संपवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होते. हिंदूंची मंदिर उध्वस्त करणे, पुरुषांना गुलाम म्हणून विकणे, स्त्रियांची अब्रु लुटणे असे कितीतरी अत्याचार केले जात होते. देव, देश आणि धर्म सर्वच संकटात होते. या संकटांना तोंड देत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करत होते, हि सामान्य बाब नव्हती. या सर्व परिस्थितीचा आढावा त्याकाळी कवी भूषणांनी आपल्या काव्यात गुंफला आहे.

“काशी कि कला जाती, मथुरा मे मस्जिद वसती ।

अगर शिवाजी ना होते, तो सुन्नत होती सबकी ।।”

इतके पुरावे आपल्याकडे असताना आपल्या समाजातील लोकांचा बुद्धीभेद का बरं होत आहे, हे काही उमजत नाही.

नेतोजी पालकरांचा धर्म औरंगजेबाने जबरदस्तीने बदलला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना पुन्हा हिंदू करून घेतले, हे मात्र सोयीने विसरले जात आहे. कृष्णाजी भास्कर हा अफजलच्या दरबारात कुलकर्णी ह्या पदावर होता. त्याकाळी कुलकर्णी हे आडनाव नसून पद होते, जे आज आडनाव झाले आहे. इतिहासात त्याचे आडनाव आढळत नाही तरी सुद्धा आजचा दृष्टिकोन बुद्धीभेद करण्यासाठी वापरला जात आहे.
असो ! सध्या शिवरायांची आठवण आपल्यातील काही लोकांना आलेली आहे. कोणीतरी एक राजकीय पुढारी शिवरायांविषयी बोलला आणि स्वतःकडे लक्ष वेधून बऱ्याच चर्चा नाक्यानाक्यावर झडल्या. बऱ्याच जणांनी Social Networking वर तर काही जणांनी विविध ब्लॉग मार्फत मतं मांडली त्यामुळे या विषयी मी आणखी काय नवीन लिहिणार ? साहजिकच आता जास्त काही लिहित नाही पण पुरावा म्हणून खालील एक फोटो पहा, हा श्लोक आहे संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथातील ! तर काही जणांनी मत मांडले कि, या मध्ये संभाजी महाराज शिवरायांना म्हणत आहेत. पुन्हा वेडीवाकडी चर्चा !

या श्लोकाचा अर्थ आहे..

वेदांना वाचून, अग्निदेवतेस यज्ञ करून इच्छा धरून (घालून) प्रजेचे गोब्राम्हणासह नीट पालनपोषण करून, अंतरात्मा शस्त्राने पालन करून, संग्रामामध्ये (रणक्षेत्रात) मारला गेलेला क्षत्रिय स्वर्गास जातो. 

हे हि कमी म्हणून आता मात्र हे खालील पत्र पहा. ज्यामध्ये शिवरायांचा उल्लेख “गोब्राम्हणप्रतिपालक” केलेला आहे. हे पत्र शिवचरित्र साहित्य खंड ३, लेखांक क्रमांक २५१९ वरती आहे.


शिवरायांनी अफजलला मुस्लिम म्हणून नाही मारला तर स्वराजाचा शत्रू म्हणून मारला, अगदी बरोबर ! पण कृष्णाजी भास्करलासुद्धा ब्राम्हण म्हणून नाही तर स्वराजाचा शत्रू म्हणून मारला, हे हि सांगणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. हे न सांगता जे घडते, त्यालाच म्हणतात राजकारण ! आणि तेच नेमके घडवले गेले. वायफळ आणि निष्फळ चर्चा झडल्या. बुद्धीभेद केला गेला आणि इतिहासापासून आपल्याला लांबवर नेले. शिवचरित्र वाचणाऱ्या मंडळींनी शिवचरित्र कपाटात बंद केले आणि ते हि लोक या निष्फळ वादात गुरफटून गेले. तर असे आहे राजकारण !
शिवरायांच्या कारकिर्दीचा दुर्दैवाने आज राजकारणासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे इतिहासात बऱ्याच गोष्टी घुसवल्या गेल्या. त्याकाळी लागलेले फितूरीचे ग्रहण आजही सुटलेले नाही म्हणूनच शिवराय, शंभूराजे व इतर बलाढ्य आणि पराक्रमी मराठे सरदार पुन्हा जन्माला न येता, औरंगजेब मात्र बऱ्याच वेळा जन्माला येत आहे, हि खंतेची बाब आहे.
काळ कठीण येत आहे, त्याला जबाबदार आपण आहोत. शिवजयंती व राज्याभिषेक आज वाटून घेतलेले आहेत. हिंदू धर्म वाचवणारा राजा आज सेक्युलर बनवला जात आहे. रस्त्यातील चौकाचौकांना आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे पण चौकाचा उल्लेख मात्र एकेरी केला जात आहे. गड किल्ल्यांवर काही लोक हुक्का आणि दारूच्या पार्ट्या करत आहेत. राजाची राजचिन्ह बाजारात सर्रास वापरली जात आहेत. शिवचरित्राचे वाचन न करता खोट्या गोष्टी जरा जास्तच चघळल्या जात आहेत. दुर्दैवाने आज राजकीय मंडळी शिवरायांचा इतिहास जातीभेद आणि बुद्धीभेद करण्यासाठी वापरत आहे.
प्रसिद्ध बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात, “शिवाजी केवळ महाराष्ट्राचा निर्माता नव्हता. मध्ययुगीन भारतातील विधायक बुद्धीचा तो श्रेष्ठतम असा लोकोत्तर पुरुष होता. त्याची राजकीय उद्दिष्टे अशी होती की, आजही त्यांच्यात बदल न करता ती स्वीकारता येतील. आपल्या प्रजेला शांतता, सार्वत्रिक सहिष्णुता मिळावी, सर्व जातीधर्मांना समान संधी लाभावी, हितकारक, कार्यक्षम व निकोप प्रशासन असावे, व्यापाराच्या वाढीसाठी नाविकदल आणि जन्मभूमीच्या संरक्षणासाठी सैन्य असावे, ही त्यांची उद्दिष्टे होती. या सर्वांपेक्षा अधिक प्रयत्न त्यांनी राष्ट्रीय विकासासाठी केले.”

औरंगजेबाचा इत्नभूत अभ्यास करणारे सर जदुनाथ सरकार आणि कवी भूषण जर शिवरायांविषयी असे म्हणत असतील तर आपण आणि आपले स्वार्थी पुढारी आपल्याला नक्की कशात अडकवू पाहत आहेत, यावर विचार करणे गरजेचे आहे.

यावरून खरंच ! समर्थांचे बोल “अखंड सावधान असावे….” हे मला सतत आठवत राहतात.

लेख कसा वाटला हे comment मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.



© सागर माधुरी मधुकर सुर्वे

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960