
३ एप्रिल १६८० छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून कायम स्वरूपी देहाने अनंतात विलीन झाले पण त्यांचे विचार मात्र आजही जिवंत आहेत त्या विचारांचा उपयोग आजच्या काळात जो तो आपआपल्या स्वार्थासाठी करताना दिसतो.
सध्या वंदे मातरम् चे अमाप पीक सोशल नेटवर्किंगवर आलेले आहे कोणीतरी छडमाड नेता काहीतरी बोलला आणि प्रसिद्धी मिळवून बाजूला झाला. त्यावर बऱ्याच चर्चा घडवल्या गेल्या आणि दुसऱ्याच दिवशी या मॅटरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने ओढले आणि मला वाटते कि, "अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे." याचा साधा अर्थ असा की, एखाद्या विषयावर बोलायच्या आधी अभ्यास हवा, तो नसेल तर आपलेच हसू होईल आणि ते काही बरे नाही."
थोडेसे मागे जाऊया, पाच पाच इस्लामी शाह्या हे हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते. त्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय हे स्वराज्य वाचवत होते आणि फक्त वाचवणे हि एकच क्रिया त्यांनी केली नसून तर ते चहू बाजूंनी वाढवणे, हे सुद्धा काम अव्याहतपणे सुरु होते. अहो ! देव, देश आणि धर्म सर्वच संकटात होतं आणि ते हि समजत नसेल तर इतिहासातून आपला राजा वजा करून फक्त एकदा विचार करा कि, तुम्ही आम्ही हिंदू राहिलो असतो का ? तेव्हा कळेल काहीही उरत नाही. ह्या वरून छत्रपतींचे कार्य नेमके लक्षात येईल पण आज मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास फार कमी लोक वाचतात, त्यात सुद्धा काही ग्रेड नसलेल्या संघटना जातीयवादी इतिहास लिहून तरुणांच्या भविष्याची वाट लावू पाहत आहेत.
दिल्लीतील एक मराठी वजन आणि ज्यांच्याकडे आम्ही फार आशेने पाहतो, ते आज महाराष्ट्रात जातीयवादी इतिहास लिहिणाऱ्या माणसांचा सत्कार करताना दिसतात. काही पक्ष राजाचे राजचिन्ह म्हणजे स्वराज्याचा झेंडा फक्त नावापुरता वापरत आहेत. त्यांना कधीही गड संवर्धन करताना अजून तरी मी पाहिलेले नाही तसेच सत्य इतिहास घराघरांत पोहचावा म्हणून त्यांची खटपटसुद्धा दिसलेली नाही. देश स्वतंत्र झाल्यापासून ज्यांनी सर्वात जास्त राज्य केले त्यांनी तेव्हा पासून ताजमहाल आणि लालकिल्ल्याकडे जितके लक्ष दिले तितकं लक्ष आमच्या किल्ले राजगड आणि रायगड दिलेले आम्हांला कधी दिसून आलेले नाही. निवडणूकांमध्ये शिवराय फक्त पुष्पहार घालण्यापुरते आणि एखाद दुसरा प्रसंग कथन करून मतं मिळविण्यासाठी वापरले जातात, हेच दुःखदायक आहे. आज काल तर या लोकांचा शिवरायांचा यवन धार्जिणा खोटा इतिहास खोलवर रुजवण्यासाठी खटाटोप चालू आहे आणि त्यात हे लोक यशस्वी होत आहेत ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे "वंदे मातरम् " नाही बोलणार म्हणून एकाने शिवरायांवर भाष्य करणारे केलेले भाषण !
कमाल आहे ना, ज्या राजाने हिंदू धर्म वाचवला, ज्या राजाने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा रंगीबेरेंगी नसून फक्त भगवा होता. जो राजा त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजीराजेंना पत्र लिहून कळवतो कि, तुरुक सैन्यात बाळगल्याने जय कसा प्राप्त होईल ? ज्या राजाने जेव्हा कल्याण व भिवंडीवर स्वारी केली तेव्हा तेथील यवनांनी आपली मंदिरे पाडून मशीदी बांधल्या होत्या त्या पुन्हा पाडून तिथे देवालय उभी केली. ज्या राजाने औरंगजेबाने बाटवलेल्या नेतोजी पालकरांना पुन्हा हिंदूधर्मात घेऊन घर वापसी केली. ज्या राजाने प्रत्येक किल्ल्याचा किल्लेदार हा हिंदूच नेमला. ज्या राजाच्या अष्टप्रधान मंडळात फक्त हिंदूच होते. दक्षिणदिग्विजय मोहिमेतसुद्धा श्री शैलमला मंदिराची मशीद झालेली दिसली तेव्हा पुन्हा तिथे मंदिर उभे केले; ज्याला आज "शिवाजीचा गोपुर" म्हणून ओळखतात. इतके सर्व समोर असताना आम्हांला मात्र हे काल्पनिक इतिहासात फसवत आहेत.
ज्यांची नावे आपल्याला हे लोक सांगतात त्यांपैकी एक म्हणजे शिवरायांचा कधी वकील नाहीतर न्यायाधीश म्हणून सांगण्यात येणारा, "काझी हैदर"! समोर शत्रू पक्ष म्हणून मुस्लिम असेल तर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या तर्फे वकील म्हणून यवन पाठवलेले एकही उदाहरण सापडत नाही, हे झाले वकिलाच्या बाबतीत ! आता न्यायाधीश म्हणून पाहू. न्यायदान सारख्या सर्वात महत्वाच्या पदावर स्वतः शिवाजी महाराज तसेच जिजामाता असत. सिंहगडावरील अमृतेश्वरच्या मंदिरात मावळातील न्यायदानासाठी जिजामाता कितीतरी वेळा येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. सन १६४६ ला महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरात घेतली तेव्हा राज्यातील "काझी" हे पदच रद्द केले तेव्हा पासून हा हैदर इतिहासात कुठेही आढळत नाही, याची सुद्धा आठवण असू द्या. ह्याच काझी हैदरचा तुम्ही उदो उदो करता, तो १६८० ला महाराज निवर्तल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात आढळतो, हे हि सांगा कारण त्याने केलेल्या फितूरीची आज तुम्ही वकिली करत आहात पण तुम्ही ते सांगणार नाहीत कारण शिवरायांचा उपयोग फक्त आणि फक्त तुम्हांला राजकीय दृष्टीने करायचा आहे.
दुसरं एक नाव सांगितले जाते ते म्हणजे दौलतखान ! इथे मात्र त्याच्या जातीचा उल्लेख अगदी मोठमोठ्याने केला जातो ! कारण तुम्हांला शिवराय तेवढ्या पुरतेच वापरायचे आहेत ना, असो ! तर आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या सीमा संरक्षण मोहिमेत पगारावर नेमलेले इंग्रज होते कारण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला करून घायचा होता. आपल्याला हीच दृष्टी इथे बाळगावी लागते, पण करणार काय ? कारण जाणूनबुजून राजकीय चष्मा घातलेला आहे ना ! खाली एक फोटो जोडत आहे. गजानन भास्कर मेहंदळे लिखित शिवछत्रपतींचे आरमार या पुस्तकातील पान क्रमांक १३४ व १३५ याचा फोटो देत आहे. त्यामध्ये मायनाक भंडारी व एक मुसलमान खांदेरी मोहिमेत कुचराई करत आहे. त्याला छत्रपतींनी काय उत्तर दिले आहे, ते कळेल. राजकीय बाधा झालेल्यांना दिसावे म्हणून पान क्रमांक १३५ वर ओळींच्या खाली पेन्सिलने रेघ मारलेली आहे आणि तेही दिसत नसेल तर वरून चार ओळी वाचा. बघा खालील फोटो !
यावरून एक नक्कीच समजेल कि, शिवाजी महाराजांच्या पदरी यांना नक्की काय स्थान आहे ते ! कारण आज ग्रेड नसलेल्या संघटना आणि राजकीय चष्मेबहाद्दूर उलट चित्र उभे करताना दिसत आहेत. आपण जर गाफील राहिलो ना, तर एक दिवस असा येईल कि ते म्हणतील, "शिवराय त्यांचेच होते आणि त्यांनी हिंदूंवर राज्य केले". काळ कठीण येत आहे आणि त्याला जबाबदार आपणच आहोत कारण आपण इतिहास वाचत नाही.
असो ! सरते शेवटी रणशिंग पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या खालील ओळी आम्ही नेहमीच लक्षात ठेवतो.
धटासी आणावा धट । उद्घटाशी पाहिजे उद्धट ।।
खटनटाशी खटनट । अवश्य करी ।।
लेख कसा वाटला ते मेल स्वरूपात sagarblog4@gmail.com वर अथवा comment box मध्ये नक्की कळवा.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
No comments:
Post a Comment