
दिनांक १ ऑगस्ट १९२० बाळ गंगाधर टिळक आपल्यातून कायमस्वरूपी दूर निघून गेले पद्मासनात निघालेली ती अंत्ययात्रा आम्हांला नवीन तर जुन्या लोकांच्या मनात घर करून राहिली. त्या दिवशी नेहमीप्रमाणे लोकलने घरी चाललो होतो. बदलापूर नंतर तशी गर्दी कमी असते. जवळ जवळ डब्बा रिकामाच होता म्हणून टिळक जयंतीनिमित्त Whatsapp वर आलेला देशभक्तीचा महापूर पाहत असताना समोर भरगच्च मिशांनी ओठ झाकलेला पुणेरी लाल पगडीधारी, पांढर शुभ्र धोतर आणि त्यावर सोनेरी कडांची पांढरी शाल सांभाळत एक माणूस समोर येऊन बसला. थोडे दुर्लक्ष केले पण आजच्या काळात असे कपडे घातलेला गृहस्थ दिसला म्हणून परत निरखून पाहिले तर साक्षात बाळ गंगाधर टिळक !
मी निशब्द आणि समोर तो करारी आवाज "वंदे मातरम्...." पटकन मी काहीतरी बोलणार तितक्यात काय ती ठाण्याला गर्दी, चढूनच दिले नाही मला आणि डोळ्यांत तो निखारा आणि पुढचं वाक्य त्याच तत्परतेने कुठे गेले सगळे ????? My god...... माझ्या अंगावर काटा.... जबरदस्त-भारदस्त असा आवाज आणि ते ही मला उद्देशून, थोडासा बावरलो आणि सावरत भानावर आलो आणि विचारले, लोकमान्य तुम्ही साक्षात इथे ? त्यांचा पुन्हा तो विजेच्या कडकडाचा आवाज.... पुण्याला जाण्यासाठी ट्रेन शिवाय अजून काही पर्याय आहे का ? तुमचा तो expressway नेहमी तुंबलेला असतो. मी आता विषय बदलला.
लोकमान्य नमस्कार करतो म्हणून वाकलो. नमस्कार केला त्या तेजस्वी महापुरुषाला.... माझ्या डोक्यावर ठेवलेला त्यांच्या भारदस्त हाताने मला भरून आले होते. तुम्ही आम्हांला स्वातंत्र्य मिळवून दिले. तुमच्या जहालवादाचा दरारा आम्ही पुस्तकात वाचतो. केसरी आणि मराठा वृत्तपत्र यांतील कधीतरी काही निवडक लेख आम्हांला वाचनालयात वाचायला मिळतात. बाप रे ! शांत झोपेत तो फुललेला निखारा अंगाला लागावा आणि झपकन आम्ही उठून उभे राहावे, असे तुमचे लिखाण हे वास्तवाला धरून असते. आज आपला हिंदू समाज शांत झोपेत आहे आणि तुमच्या लेखांची आम्हांला आज खऱ्या अर्थाने नितांत गरज आहे पण दुर्दैव ! तुमचे नाव घेतल्यावर आम्हांला शेंगा-टरफले आठवतात, बाकी अजूनही निद्रिस्त त्याच विश्वात आहे. शाळा सुरु झाल्यानंतर भाषणांचा मुहूर्त तुमच्या जयंतीपासून सुरु होतो. एक दिवस तुमची आठवण आम्ही काढतो. वर्गात खुर्चीवर ठेवलेला तुमच्या फोटोला त्या दिवशी आम्ही स्वच्छ करून हार घालतो. हुशार मुले त्या दिवशी भाषणं करतात प्रत्येक भाषणात चिखली गावाचा उल्लेख, चिखलात कमळ म्हणून तुम्हांला उपमा, स्वराज्य, हक्क वगैरे असे मोठे शब्द आणि सरते शेवटी शेंगा-टरफले ! बाकी मुलं फक्त टाळ्या वाजवतात. शिक्षक लोक खूप खुश होतात. दुपारपर्यंत हा कार्यक्रम आटपतो आणि तुमचा तो फोटो पुन्हा कपाटात बंद होतो तो पुढील वर्षीची वाट पाहत !
तुम्ही बोलले होते मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही. असाच काहीसा प्रसंग जेव्हा आमच्यावर ओढवतो ना आणि त्यावेळी हेच आम्ही बोललो, तर आमची गणती उद्धटांमध्ये होते. शिंग फुटली का तुला म्हणून आम्हांला वर्गाच्या बाहेर काढले जाते. तुमच्या प्रत्येक विचारांना आम्ही तिलांजली दिलेली आहे. काही पडलेले नाही इथे कोणाला ! तुम्ही इंग्रजांच्या विरोधात भारतीयांना बोलला होतात कि, आपण सर्व मिळून थुंकलो तरी हे वाहून जातील. आज कुठेही आणि कोणीही थुंकत आहेत आणि त्यात वाहून चालली आहे, ती आपली संस्कृती....! तुम्ही गीतारहस्य लिहिला आज किती जणांनी वाचला, हे तुम्हीच विचारा. तुम्ही विचारांची क्रांती करण्यासाठी केसरी आणि मराठा वृत्तपत्र चालवली पण आज वृत्तपत्र वाचायला आम्हांला आवडत नाहीत. काही लोकांकडे वेळ नाही तर माझ्याकडे वेळ आहे तरी सुद्धा वाचायला मला आवडत नाही कारण घोटाळे करणारी पुढारी मंडळी ते चालवतात. अहो ! क्रांती नाही तर आजच्या काळात बुद्धीभेद करण्याचे उत्तम साधन म्हणजे वृत्तपत्र आहेत. तुम्ही आम्हांला दिशा दिली पण आज आम्ही दिशाहीन आहोत. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच." अशी तुम्ही सिंहगर्जना केली होती. आज whatsapp वर त्यावर विनोदात्मक खंडीभर वाक्य रोजची येत आहेत. तुम्ही लोकांना एकत्र येण्यासाठी घरातला गणपती चौकात नेऊन बसवला. आज चौकात जरी गणपती असला तरी आम्ही घरोघरी गणपती आणतो. अहो ! खंतेची बाब हि आहे कि, दोन भाऊ सुद्धा एकत्र नाहीत. ते सुद्धा एकमेकांचे तोंड न पाहता, वेगवेगळे गणपती बसवतात. तुम्ही पेरलेला एकत्र येण्याचा विचार आज कुठे आहे ? उलट गणेशोत्सव कोणी सुरु केला म्हणून कोर्टात केस चालू आहे. अहो खरंच !
तुम्ही गणपतीत विविध विषयांवर भाषणं ठेवायचे आज हीच नालायक लोक बुद्धीच्या देवतेपुढे पैशांवर पत्ते खेळत आहेत. भाषणं तर सोडाच, तो हि जुगार बस् करा म्हणून हात उंचावत आहे पण त्याचे कोणी ऐकत नाही तर तुमचे कोण ऐकणार ? अनंतचतुर्थीला गणपतीची भव्य मिरवणूक तुम्ही काढली होती. धर्म समजावा म्हणून मर्दानी खेळ आणि छत्रपतींच्या घोषणा तुम्ही दिल्या होतात आज आम्ही डिजे लावत आहोत. तुमच्या नावाच्या चित्रपटातील गाणे आम्ही remix करून धिंगाणा घालत आहोत. मिरवणुकीत वल्गर नाचणारी लोकं तर किड्यांसारखी गर्दी करत आहेत. मिरवणुकीत तुम्ही मर्दानी खेळ ठेवले होते. हाहाहाहा ! आज टपोरी पोरं दारूच्या बाटल्या रिचवत आहेत. म्हणे नाचायला स्टँमिना राहायला पाहिजे ना, कमाल आहे ना लोकमान्य, सर्वच संपले आहे आज !
तुम्ही फक्त भाषणापुरते आहात. आजच्या काळात कोणी काहीही वाचत नाही. फक्त पैसा कमवायचा छान छान कपडे, सुंदर बायको, ढुंगणाखाली गाडी, राहायला माडी ह्या पलीकडे आम्ही गेलेलो नाही आणि जाणारही नाही कारण देश आणि देशभक्ती आम्ही अंधश्रद्धा मानतो आणि असल्या गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ नाही. पैसा, पैसा आणि पैसाच.... ह्यातच लोकं अडकली आहेत. पाहिलेत ना ! ठाण्याला तुम्हांला लोकलमध्ये चढता आले नाही. अहो, गर्दीत तुम्हांला ओळखले नाही ह्या षंढ समाजाने, तुम्हांलाही ढकलायला ह्या लोकांनी मागेपुढे पाहिले नाही, बोला आता काय करणार ? काळ बदलला आहे. फक्त पैशासाठी जगायचे. इथल्या लोकांची मानसिकता म्हणजे नाती गेली खड्ड्यात मग तुम्ही आम्ही कोण ? ग्रेड नसलेली संघटना तुमची बदनामी करण्यासाठी कंबर कसत आहे. का माहितेय ! तुम्ही ब्राम्हण आहात म्हणून ! किती हास्यास्पद आहे ना....! लोकमान्य शांतपणे ऐकत होते. तितक्यात लोकल कर्जत स्थानकात थांबली होती.
मी थाऱ्यावर आलो, पुन्हा वाकून नमस्कार केला. आजच्या काळात आई-वडील सोडले तर कोणाला नमस्कार करावासा वाटत नाही कारण कोण काय आशीर्वाद देईल, याचा आज भरवसा नाही. लोकमान्यांचे डोळे भरले होते. समाज दिशाहीन होतो आहे. यांची खंत त्यांना वाटत होती. निरोप घेताना तो करारी आवाज पहिल्यांदा घोगरा होताना पाहिला. लोकल मधून आम्ही दोघंही उतरलो. ती अदृश्य शक्ती निशब्द होती. मी माझ्या वाटेने निघालो होतो. थरथरणारी पावले जड अंतकरणाने दूर निघून जाताना पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाहत होतो. मागे सुद्धा वळून पाहिले नाही त्या महामानवाने ! मी आसवे गाळत पाहतच राहिलो. टिळक दूरवर निघून गेले होते. सर्वच शांत....
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
लेख कसा वाटला ते sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात किंवा comment box मध्ये नक्की कळवा.
लेखनाचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पुर्वपरवानगी शिवाय लेख कॉपी करू नये. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
No comments:
Post a Comment