पावसाळ्यात वाहून चाललेला स्वाभिमान….


पावसाळा म्हटला कि, दर आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी ठरलेला सण म्हणजे waterfall picnic ! या पावसाळी सहली आणि विविध ट्रेक करायला आमचा मुळीच विरोध नाही. तो खुशाल तुम्ही डोंगर दऱ्यांतील विविध धबधब्यांवर करा परंतु हे सर्व करण्यासाठी किल्लेच का ? गडावरील बेधुंद वातावरणात बेधुंद वागणे कितीपत बरोबर आहे ? ह्याचा विचार होणार आहे कि नाही ? ह्याच गोष्टी नेमक्या खटकल्या म्हणून हा ब्लॉगप्रपंच….

          पावसाळ्यात गड किल्ल्यांवर जत्रेचे स्वरूप येते. इतके महिने तिथे तशी वर्दळ कमीच असते पण पावसाळा म्हटला कि, पर्यटकांचे आणि so called शिवभक्तांचे जत्थेच्या जत्थे तिथे जमायला सुरुवात होतात मग तिथे जाऊन मांसाहारी जेवण करणे, दारू पिऊन तर्र होणे आणि त्याचा किक बसलेल्या आवेशात “जय भवानी, जय शिवाजी” चा घोषा लावणे. काही संघटना तर हे सर्व धंदे पैसे आकारून करत असतात. त्यासाठी ते फेसबुकवर खास वातावरण निर्मिती करतात, खंत ह्याची वाटते कि, हीच वातावरण निर्मिती गड संवर्धनासाठी केली जात नाही आणि इतिहासासाठी तर मुळीच नाही. किल्ल्यांचा मान राखण्याची अक्कल ह्यांना येतच नसेल तर हे आपले दुर्दैव आहे आणि हेच आपल्याला भविष्यात मारक आहे, हे हि तितकेच खरे !

          या दिवसांत गडावर असलेले निसर्ग सौंदर्याचा आस्वाद नक्की घ्यावा पण त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. हे गड किल्ले एकेकाळी लढले आहेत आणि तेही आपला धर्म वाचवण्यासाठी ! मावळ्यांचे रक्त सांडलेली ती गडावरील माती आपल्यासाठी पवित्र अंगारा आहे पण आज त्याच मातीत दारू सांडवली जात आहे. ज्या तटावरून त्या काळी शत्रूवर नजर ठेवली जायची त्याच तटावर आज अश्लील फोटो काढायची स्पर्धा लागली आहे. ज्या किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांनी तेव्हा सर्वांची गरज भागवली, अहो ! किल्ला जगला तो ह्या पाण्यांच्या टाक्क्यांवर ! आज त्याच टाक्यांमध्ये दारू पीत पीत ती तर्र मंडळी पोहत आहे. हाच किल्ला वाचवायला आडवळणावरील बुरुजांवर डोळ्यांत तेल घालून आपले मावळे दिवस-रात्र गस्त घालायचे. आज तिथे तोच एकांत साधून काही “कपल्स” चाळे करण्यासाठी गर्दी करत आहेत. 

          गडावरील काही कड्यांवरून पावसाळ्यात पाणी कोसळत असते आज तिथे वॉटरफॉल रॅपलिंग आणि क्लाइंबिंग केले जात आहे. कमाल आहे ना, इतिहासाचा विसर किती झटकन पडतो. आज हाच फालतूपणा करायला या लोकांना फक्त गड आणि लेण्या दिसतात. इतिहास तिथे न जागवता भरमसाठ पैसे आकारून फक्त धिंगाणा करण्यासाठी गर्दी केली जात आहे. ह्या सर्व क्रियांना गोंडस असे “पावसाळी ट्रेक” नाव दिले आहे. 

          दारूच्या त्या दर्पात कधी दारू न शिवलेला आमच्या राजाच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे टीशर्ट घालून हातात दारूची बाटली सांभाळत घोषणा द्यायला आघाडीवर आहेत. दाट पडलेले धुके त्यात भुरभुरणारा पाऊस पाहता एकमेकांच्या मिठीत हे “कपल्स लोक” तर भलत्याच आवेशात असतात. जणू काही ते धुंद वातावरण फक्त आणि फक्त ह्यांच्यासाठी जमवून आणले आहे. काळ कठीण येतो आहे, त्याला जबाबदार हे वातावरण नसून आपण आहोत. ह्या so called शिवभक्तांना आज आपण समजवू शकत नाहीत, हि माझ्या सारख्या लोकांची खंत आहे. हतबलता म्हणजे काय ? तर गडावरील आणि लेण्यांमधील हे वातावरण आहे. इतिहास डोळ्यांनी वाचला गेला नाही तर तो प्रत्यक्षात कधीच वाचणार नाही मग ढासळणारे बुरुज, तटबंदी आणि किल्याची ती आर्त हाक ह्यांना कधीच ऐकायला येणार नाही. 

          आपले पोलिस दादा आज हे प्रकार घडायला नको म्हणून प्रयत्न करत आहेत पण त्यांची सुद्धा नजर चुकवून आणि गडाखालील गावातील मंडळी नाममात्र पैसे आकारून चोराटी मार्ग ह्या दारूड्या पर्यटकांना दाखवत आहेत. सर्वच ग्रामस्थ तसे नाहीत आणि त्याकाळी सुद्धा नव्हते पण काही फितूर लोक तेव्हा सुद्धा होते आणि आजही आहेत. अरे, उगाच नाही रे आपले दुसरे छत्रपती शंभूराजे कैद झाले ! फितूरीचे ग्रहण आजही सुटलेले नाही, काय वाटत असेल छत्रपतींना ? ह्याचा विचार कधी केला आहे का ? 

          दारूच्या बाटल्या आज तटाच्या आणि बुरुजाच्या खाली सापडतात, झाडीझुडपात आणि त्या काळातील संकटकाळी मार्ग (चोरदिंडी) ह्या मध्ये निरोधची पाकिटे सापडतात किती नीच लोक घाणेरडी कृत्य करायला आज गडावर येतात ह्याचे जणू हे पुरावेच ! 

           इतिहासाचा जागर होत नाही कारण आज इतिहास वाचक कमी आहेत आणि शिवभक्त जास्त आहेत. ह्यामुळे आजची पिढी व्यसनात गुरफटली जात आहे, साहजिकच इतिहास आज कंटाळवाणा विषय होऊन बसला, ते उगाच नव्हे. ग्रेड नसलेल्या संघटना जातीच्या राजकारणात तरुणांची माथी भडकवत आहेत पण त्यांना पावसाळ्यातील हे गलिच्छ प्रकार दिसत नाही. राजकीय झापडं बांधली गेली आहेत, बाकी काय ? 

          गड, लेणी आणि जुनी मंदिरे हि तर आपली पवित्र स्थाने आहेत, पूर्वजांनी जपलेला तो ठेवा आहे पण आज त्याच वास्तू धोक्यात आहेत. पावित्र्य का राखले जात नाही ? हे माझ्यासाठी न सुटणारं कोडं होऊन बसले आहे. त्याकाळी इस्लामी वावटळीत हि गडमंदिरे फुटत होती, लुटली जात होती मग आज हे जरी होत नसले तरी जे काही घडतंय ते कुठे बरोबर आहे ? हा प्रश्न आपल्या मनाला एकदा तरी विचारा. जर आपली पिढी ह्या वास्तूंचे पावित्र्य ठेवू शकली नाही, तर पुढील काळ धोक्याचा आहे जो आपल्या जीवावर उठेल आणि तेव्हा मात्र आपल्या हातात काहीही राहणार नाही, संपले असेल सर्वच ! ह्यावर कधीतरी विचार करा. 

          एक सदैव लक्षात ठेवा, नक्षीदार संगमरवरी कबरीत सडणाऱ्या बादशहापेक्षा दगडी किल्ल्यात राहुन रयतेच्या हृदयात घर करणारा आमचा राजा श्रेष्ठच आहे आणि त्याचा मान आपल्याला आयुष्यभर राखलाच पाहिजे मग ते गड असो कि लेण्या ! एकंदरीत पावसाळ्यातील गडावर धिंगाणा घालण्यासारख्या ह्या प्रथा घातक तर आहेतच पण त्या इतिहासातील वास्तू एक दिवस नेस्तनाबूत करतील आणि इतिहाससुद्धा ! 

© सागर माधुरी मधुकर सुर्वे

लेख कसा वाटला हे comment स्वरूपात अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.

लेखनाचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत. 



No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960