इस्लामच्या वावटळीत नष्ट झालेली हिंदुस्थानातील विद्यापीठं


इसवी सनापूर्वी विद्येचे माहेरघर म्हणजे हिंदुस्थान ! अशी आपली ओळख होती. आजपासून हजारो वर्षांपूर्वी आपल्या हिंदुस्थानात जगभरांतून लोकं शिकायला येत असत. काही लोक ह्याच विद्यापीठांमधून शिकून प्रसिद्ध झाले तर काही प्रवासी मंडळी ह्याच विद्यापीठांमुळे भारताकडे आकर्षित झाले. एकंदरीत काय तर ही विद्यापीठं भारतीय संस्कृतीचा गाभा होती तर विद्येचे पीक घेणारे बुद्धिवंत ह्याच विद्यापीठांमुळे भारताची मान जगभरात उंचावत होती. मुसलमानपूर्व भारत सुखी होता त्या विद्यापीठांमुळे ! युरोपमध्ये त्यावेळी शिक्षणाची बीजं रोवलीसुद्धा गेली नव्हती तेव्हा ह्या विद्यापीठांमधून मुलं पदवीधर होत होती. अहो, इतकंच काय तर जगभरात पहिला कॅम्पस इंटरव्ह्यू हा सुद्धा भारतातच झाला. विविध विद्यापीठांमध्ये लाखो ग्रंथ व्यवस्थितरित्या जोपासले जात होते तेच अभ्यासून इथे बुद्धिवान रत्नांना पैलू पाडले जात असत. ह्या प्रस्तुत लेखात मला इस्लामी वावटळीत नष्ट झालेल्या ह्या विद्यापीठांवर एक नजर टाकायची आहे.

युरोपात पहिलं विद्यापीठ उभं राहिलं ते मुळातच जर्मनीत तेव्हा साल उजाडले होते सन १३८६ ! आणि आपल्या अखंड हिंदुस्थानात पहिलं विद्यापीठ उभं राहिलं ते इसवी पूर्व सातशे वर्षांपूर्वी ! विचार करा तेव्हा भारतात इतर देशांतून कित्येक लोकं शिक्षणासाठी येत होती. आज मात्र परिस्थिती उलट आहे, हे मात्र दुर्दैव आहे आणि ह्याला कारणीभूत आहे, इस्लामी आक्रमणे ! चला तर मग एक सफर करूया विविध विद्यापीठांची....

तक्षशिला विद्यापीठ

हे आपल्या अखंड हिंदुस्थानातील पहिलं विद्यापीठ जे आज अवशेषरुपी पाकिस्तानमध्ये आहे. हे विश्वविद्यालय इसवी सन पूर्व सातशे वर्षांपूर्वी स्थापन झाले होते परंतु इस ४५५ मध्ये ह्यावर हुणांनी आक्रमण केले आणि हे विद्यापीठ नष्ट केले. तो पर्यंत ह्या विद्यापीठाने १२०० वर्ष ज्ञानदानाचे मोठे काम पार पाडले होते. ह्या विद्यापीठाचा त्या काळात भरतखंडाची "बौद्धिक राजधानी" असा लौकिक होता. ह्या राजधानीची ख्याती ऐकून चाणक्य म्हणजेच कौटिल्य मगध देशांतून तक्षशिलेला शिकायला आला होता. बौद्ध ग्रंथ सुसीमजातक आणि तेलपत्त मध्ये तक्षशिलेचे काशीपासूनचे अंतर सुमारे २००० कोस सांगितलेले आहे म्हणजे विचार करा किती लांबून हा मनुष्य तिथे गेला होता.

ह्याच विद्यापीठामध्ये संस्कृत व्याकरणकार पाणिनी शिकलेला आहे. मगध राजवंशात प्रसिध्द चिकित्सक राजवैद्य जीवक हा सुद्धा इथेच शिकला होता. ह्याने पुढे अनेक ग्रंथ सुद्धा लिहिले होते. जीवकला "जिबाका" असे सुद्धा म्हणतात. वर म्हटल्याप्रमाणे कौटिल्य हा सुद्धा इथलाच विद्यार्थी ! ह्याच ब्लॉग साईटवर प्राचीन भारतात भावलेले दोन प्रवासी म्हणून ज्यांची आपण ओळख करून घेतली होती त्यातील एक फाहियान हा सुद्धा इस ४०५ मध्ये इथे आला होता परंतु तेव्हा ह्या विद्यापीठाचा पडता काळ होता आणि त्याला इथे ज्ञानाचा लाभ झाला नाही कारण आक्रमकांमुळे येथील आचार्य हे विद्यापीठ सोडून गेले होते. पुढे फाहियानच्या पावलावर पाऊल ठेवून युअन् च्वांग जेव्हा इथे आला तेव्हा मात्र हे विद्यापीठ नष्ट झाले होते आणि त्या अवशेषांची नोंद त्यानी केली. हेच ते विद्यापीठ ज्याचा नाश इस्लामी आक्रमकांनी न करता, हुणांनी केला होता कारण इस्लाम तेव्हा जन्माला यायचा बाकी होता.

नालंदा विद्यापीठ

हुणांनी तक्षशिला विद्यापीठ उध्वस्त केले आणि त्याच काळात मगध म्हणजेच आजच्या बिहारमध्ये नालंदा विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मगधचा राजा गुप्तवंशीय सम्राट शकादित्य (कुमारगुप्त) ह्याने विद्यापीठाची स्थापना केली. ह्या विद्यापीठाचे नाव होते, नलविहार ! हे अगदी त्या काळातील बाकी विद्यापीठांमध्ये सर्वोत्तम विद्यापीठ गौरवले जायचे. इथे प्रवेश घेण्यासाठी सर्वात कठोर परीक्षा (Entrance Exam) द्यावी लागत असे. चिनी यात्रेकरू युअन् च्वांग इथेच दहा वर्षे शिकला. इमारतींच्या एक संपूर्ण संकुलात विविध भवने होती; ज्यांची नावं रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नरंजक अशी होती. रत्नोदधी ही इमारत नऊ मजली होती. हो हो नऊ मजली, ही अतिशयोक्ती नाही तर युअन् च्वांग आणि इतर चिनी प्रवाशांनी ह्या इमारतीचा उल्लेख त्यांच्या त्यांच्या प्रवासवर्णनात केलेला आहे. सर्वात उंच प्रशासकीय भवन ज्याचे नाव होते, मानमंदिर ! ह्या विद्यापीठात एकाच वेळी एकूण १०,००० विद्यार्थी तर २,००० शिक्षक आणि काही संशोधक कार्यरत होते. ह्या विद्यापीठाचे एक ग्रंथालय होते त्याचे नाव होते "धर्मगंगा" ! लाखो ग्रंथ इथे अगदी व्यवस्थितरित्या सुरक्षित ठेवले होते.

इख्तियारुद्दीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी ह्या लांबलचक नावाच्या क्रूरकर्माने इस ११९३ मध्ये नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला. सतत तीन महिने ह्या धर्मगंगा ग्रंथालयातील पुस्तकं रात्रंदिवस आगीत टाकून जाळली जात होती म्हणजे विचार करा काय अमाप संग्रह असेल हा !

विक्रमशील विद्यापीठ

आठव्या शतकातील बंगालच्या पाल वंशीय धर्मपाल राजाने ह्या विद्यापीठाची स्थापना केली. ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण सहा विद्यालयं होती. प्रत्येक विद्यापीठात १०८ शिक्षक होते. प्रत्येक दिशेच्या द्वाराला एक प्रमुख आचार्य नेमलेला असे व हेच आचार्य नवीन विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन प्रवेश देत असत. नोंदींनुसार पूर्व द्वारावर पंडित रत्नाकर शास्त्री, पश्चिम द्वारावर वर्गाश्वर कीर्ती, उत्तरी द्वारावर नारोपंत तर दक्षिण द्वारावर प्रज्ञाकार मित्रा होते. ह्यातील नारोपंत हे आपल्या महाराष्ट्रातील होते. दीपक हे ह्या विद्यापीठातील सर्वात प्रसिद्ध आचार्य झाले आहेत. १२व्या शतकात इथे देशी व परदेशी असे एकूण ३,००० विद्यार्थी शिकत होते. ह्या मध्ये सर्वात जास्त प्रमाण तिबेटी विद्यार्थ्यांचे होते. ह्या विद्यापीठाच्या एका सभागृहात एकूण ८,००० लोकांची बसायची व्यवस्था होती. असे उत्खननात स्पष्ट झाले आहे. बौद्ध धर्माच्या वज्रयान पंथाच्या अभ्यासाचं हे महत्वाचे आणि अधिकृत केंद्र होते.

इस ११९३ला नालंदा विद्यापीठ उद्धवस्त केल्यानंतर बख्तियार खिलजीने सहा वर्षांनी म्हणजे इस १२०३ला ह्या विद्यापीठाला जाळून नष्ट केले.

उड्डयंतपूर विद्यापीठ

हे सुद्धा विद्यापीठ पाल वंशीय राजा गोपाळने स्थापन केले होते. हे विद्यापीठ बौद्ध विहाराच्या स्वरूपात होते. याच्या भवनांना पाहून जणू काही हा किल्लाच आहे, असे नोंदी सांगतात. सहाजिकच इस्लामचा फटका ह्यालाही बसला आणि बख्तियार खिलजीने ह्यावर आक्रमण करून विद्यार्थी व आचार्यांचा प्रचंड रक्तपात करून हे विद्यापीठ जाळून नष्ट केले.

सुलोटगी विद्यापीठ

कर्नाटकातील विजापूरमध्ये राष्ट्रकुटांच्या वंशातील तिसरा कृष्ण राजाच्या दरबारातील मंत्री नारायण ह्याने हे विद्यापीठ ११व्या शतकाच्या उत्तरार्धात उभे केले. मात्र ते सुरू व्हायच्या आधीच यावर मुसलमानांनी आक्रमण करून उध्वस्त केले. त्याच सुमारास पविट्टागे हे संस्कृत महाविद्यालय चर्चेत आले होते आणि इथे देशभरातून निवडक २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असे तसेच भोजन व निवासाची सोयसुद्धा करण्यात आली होती. कालांतराने हे सुद्धा भक्ष्यस्थानी पडले.

सोमपूर महाविद्यालय

आजच्या बांगलादेशमध्ये नवगाव जिल्ह्यात बादलगाझी तालुक्यात पहाडपूर गावात महाविहार म्हणून स्थापन झालेले हे शिक्षा केंद्र पुढे विद्यापीठ म्हणून उदयांस आले. पाल वंशातील दुसरा राजा धर्मपाल देव ह्याने आठव्या शतकाच्या उत्तरार्धात हे विद्यापीठ स्थापन केले होते. जगातील सर्वात मोठा बौद्ध विहार म्हणता येईन अशी त्याची रचना होती. नोंदींनुसार इथे चीन, तिबेट, मलेशिया, जावा व सुमात्रा येथून विद्यार्थी शिकायला येत असत. १० व्या शतकात प्रसिध्द विद्वान अतिष दिपशंकर श्रीज्ञान हे ह्या विद्यापीठाचे आचार्य होते. पुढे हेही महाविद्यालय भक्ष्यस्थानी पडले आणि जगाच्या नकाशावरून गायब झाले.

रत्नागिरी विद्यापीठ, ओडिशा

सहाव्या शतकात मटमायूर वंश हा कलचुरी वंशांपैकी एक वंश होता. ह्यातील युवराजदेव पहिला ह्याने ह्या विद्यापीठाची स्थापना केली. हे विद्यापीठ खास करून तांत्रिक आणि इतर विषयांसाठी प्रसिद्ध होते. तिबेट मधील कित्येक विद्यार्थी इथे शिकून गेलेले आहेत. ह्या विद्यापीठात खास एक विभाग खगोलशास्त्राचा होता आणि त्याचेच मुळात इथे आकर्षण होते. तिबेटीयन इतिहासात ह्या विद्यापीठाला "कालचक्र तंत्राचा विकास करणारे विद्यापीठ" असा लौकिक होता. ह्याच विद्यापीठाचा एक भाग म्हणजे गोलकी मठ ! ६४ योगिनींचे मंदिर म्हणजे गोलकी मठ होय. ह्याचा उल्लेख "मलकापूर पिलर" असाही केला जातो. खगोलशास्त्रसंबंधी हा गोलकी मठ महत्वाचा ठरत होता. काळाच्या ओघात ह्या विद्यापीठालाही झळ बसली आणि ह्याचाही अस्त झाला.

अखंड हिंदुस्थानात अजून बरीचशी महाविद्यालय पसरली होती. बंगालमधील जगद्दल, आंध्र मधील नागर्जूकोंड, काश्मीरमधील शारदापीठ, तामिळनाडूतील कांचीपुरम, ओडिशातील पुष्पगिरी, उत्तरप्रदेशातील वाराणसी ! अगदी सांगायचे झाले तर वनवासी विभागात सुद्धा ही ज्ञानपीठं कार्यरत होती. ह्याचाच परिणाम म्हणून इस पूर्व २०० पासून ते इस ११०० पर्यंत संस्कृत ही राजभाषा व लोकभाषा होती. पुरुषपूर म्हणजेच आजचे पेशावर ते कंबोडिया, जावा-सुमात्रापर्यंत संस्कृत भाषाच प्रचलित होती. ह्याच भाषेमुळे विद्यापीठांची कीर्ती जगभरात पसरली होती आणि शिक्षण क्षेत्रात भारत सर्वोच्च स्थानावर होता. साहजिकच जागतिक व्यापारातही आपल्या भारताचा हिस्सा २९℅ पेक्षा जास्त होता, असे प्रख्यात अर्थशास्त्री प्रोफेसर अंगस मेडिसन ह्यांनी लिहून ठेवलं आहे. हा विक्रम आजही कोणत्याही देशाने मोडलेला नाही.

ह्या विद्यापीठांमधून हुशार विद्यार्थ्यांना विविध देशांत आपल्या दरबारात मानाचे स्थान देण्यासाठी राजांमध्ये चढाओढ होती. इस ७५४ ते ८४९ ह्या काळातील अल रशीदची एक नोंद महत्वाची आहे. तो म्हणतो की, अरबी सुलतान अल मन्सूरने भारतीय विद्यापीठांतून हुशार मुलांना घेऊन येण्यासाठी आपले दूत पाठवले होते. हाच जगभरातील पहिला कॅम्पस इंटरव्ह्यू होय आणि तोही सुमारे १२०० वर्षांपूर्वीचा !

मुस्लिम आक्रमक भारतात येण्यापूर्वी आपल्याकडे परिपूर्ण शिक्षण पद्धती होती परंतु १२व्या शतकानंतर भारतीय विद्यापीठं नष्ट केली गेली आणि ज्ञानाचा ओघच थांबला. ग्रंथालयांचे नामोनिशाण मिटविले गेले. उच्च स्तरावर ज्ञान घेणं आणि देणं, नुसतं कठीणच नाही तर अशक्य गोष्ट बनली. संशोधनाचे प्रकल्प बंद पडले आणि ग्रंथनिर्मिती संपूर्णतः थांबली. जे काही ग्रंथ शिल्लक राहिले ते इंग्रज, डच, फ्रेंच आणि जर्मन संशोधकांनी युरोपला नेले.

आज परिस्थिती वेगळी आहे, चांगले शिक्षण म्हणजे विदेशातील शिक्षण असे सूत्र बनले आहे. जो तो आज बाहेर जाण्यासाठी धडपडत आहे. शिक्षणाची भारतीय परंपरा कट्टर धर्मीय इस्लामकडून अस्तास नेली गेली. इतर धार्मिक लोकांवर इस्लाम लादला गेला आणि एकंदरीत आपला हिंदुस्थान धर्माच्या कचाट्यात अडकला तो कायमचाच ! पुढे इंग्रजांनी त्यांची पोळी भाजून घेतली आणि शिक्षणाचा ढाचाच बदलून टाकला. आज त्याचे परिणाम आपण पाहत आहोतच. असो ! तर अशी होती प्रगल्भ भारतीय विद्यापीठं आणि त्यांची कहाणी.....

लेख कसा वाटला हे Comment मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.

लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

© सागर माधुरी मधुकर सुर्वे

संदर्भ ग्रंथ :

१) मुसलमानी रियासत - गो. स. सरदेसाई

२) मुसलमानपूर्व भारत - वा. कृ. भावे

३) भारताचा इतिहास - डॉ. श. गो. कोलारकर

४) भारतीय ज्ञानाचा खजिना - प्रशांत पोळ

५) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. ब. देगलूरकर

६) छायाचित्र सौजन्य : गुगल

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960