दिल्ली देशाची राजधानी....
दिल्ली गजबजलेले एक शहर....
दिल्ली राज्य करणाऱ्या गुलाम वंशांची....
दिल्ली मुघलांची आणि सरते शेवटी दिल्ली मराठ्यांची....
दिल्लीची रूपं अनेक आहेत आणि त्यात इतिहासातून दिल्ली वगळली तर तो शून्य होतो. आज अशीच एक ऐतिहासिक माहिती घायची आहे. दरवेळी विविध राजसत्ता अभ्यासताना त्यातील मनाला भावलेल्या घटना अथवा त्यातील पात्र मी नेहमीच आपल्या ब्लॉगवर इथे मांडत असतो तर आज आपल्याला पाहायचे आहे तुघलक राजसत्ता, त्यांचा गड आणि त्यांच्या गंमतीजमती.... ह्या किल्ल्याला मी नुकतीच भेट दिली आणि जे काही पाहिले आणि भावले ते ह्या प्रस्तुत लेखांत उतरवण्याचा माझा प्रयत्न आहे. दिल्लीला गेलो कि, आमच्या बहिणाबाई नवीन हटके ऐतिहासिक वास्तू दाखवतात त्यातील हा एक प्रशस्त गड !
तुघलकांचा हा भला मोठा किल्ला दिल्लीत वसला आहे आणि आपण दिल्लीला गेलो कि, मुघलांच्याच अनेक वास्तू पाहतो पण तुघलकांचा हा किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे, समजून घेण्यासारखा आहे. प्रचंड लांबलचक सापासारखी पसरलेली तटबंदी, तो सध्या तरी तुंबलेला खंदक, बालेकिल्ला त्याचे ते तुंदील बुरुज आणि किल्ल्याच्या आत असलेल्या जमिनी खाली असलेल्या त्या बाजाराची वास्तू पाहताना अगदी हरखुन जायला होते.
हा किल्ला तुघलकाबाद मध्ये आहे त्याकाळी दिल्लीतील सात शहरांमधील हे तिसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर ! त्याकाळी ह्या शहराचा बाज जबरदस्त असणार, हे आता तो किल्ला पाहताना वाटते इथून जवळच आदिलाबाद किल्ला आहे. ह्या दोन किल्ल्यांच्या मध्ये तुघलक राजसत्तेचा संस्थापक गयासुद्दीन तुघलक ह्याची भव्य कबर मात्र पाहण्यासारखी आहे आणि हि कबर पाहताना त्यात आपला थोडा जर स्थापत्यशैलीचा अभ्यास असेल तर आपल्याला मंदिराचे प्रतिबिंब त्यात जाणवत राहते. त्याचे काही मी फोटो घेतले जे लेखाच्या शेवटी देणार आहे. चला तर मग ज्याला तुम्ही वेडा समजता त्याला भेटूया.
गयासुद्दीन तुघलक हा तुघलक राजसत्तेचा संस्थापक ! त्याचा पुत्र उलुग खां उर्फ जौना खां हाच पुढे मुहम्मद बिन तुघलक झाला. ह्याची राजसत्ता १३२५ ते १३५१ अशी होती. सत्तेत निर्णय चुकले आणि हा राजा जगासाठी वेडा तुघलक म्हणून ओळखला जाऊ लागला. जगांत वेडी माणसं इतिहास घडवतात, हे वाक्य कोणीतरी म्हटले आहेच ते ह्याच्याकडे पाहूनच म्हटले असावे, असे वाटते. निर्णय कोणाचे चुकत नाही आणि हाच नियम लावायचा झाला तर शहाणे कोण ? हा प्रश्न कधीही सुटणार नाही, हे हि खरेच ! चुकलेले निर्णयांना आपल्याकडे "तुघलकी फतवा" म्हणतात पण मला मात्र हा तुमच्यासाठी वेडा ठरलेला मुहम्मद बिन तुघलक भावला आणि त्याचीच दुसरी बाजू आपल्याला इथे पाहायची आहे. वेडी बाजू इतकी प्रसिद्ध आहे कि ह्याची दुसरी बाजू विद्ववत्तेची होती ह्याचा विसर पडला.
असा हा विद्ववान तुघलक फारशी आणि अरबी भाषेचा गाढा अभ्यासक होता. गणित, खगोलशास्त्र, भविष्य, तर्कशास्त्र या विषयांमध्ये देखील तो अतिशय पारंगत होता. दरबारात भली मोठी गणितं तो चुटकीसरशी सोडवायचा. गहन विषयांवर तासंतास चर्चा करायचा. अहो, अगदी मध्य आशियातून कितीतरी विद्वान ह्याच्याशी चर्चा करायला खास येत असत. असं म्हणतात कि, त्यात तो अरबी आणि फारशी भाषेतील शब्दांना प्रतिशब्द देत असे, भन्नाट आहे ना ! इतकं करून तो कुशल योद्धा देखील होता आणि दान धर्म देखील करायचा. दिल्लीच्या राजवटीतील हा पहिला सुलतान होता जो हिंदूंच्या होळी आणि दिवाळीसारख्या सणांमध्ये स्वखुशीने सहभागी व्हायचा. Overall विचार करता, तो versatile होता हे मान्य करावे लागेल. प्रसिद्ध इतिहासकार डॉ. ईश्वरीप्रसाद यांच्या मते, मध्ययुगातील सर्वात विद्वान, सुसंस्कृत शासक एकच होता तो म्हणजे मुहम्मद बिन तुघलक !
आयुष्यात निर्णय चुकतात आणि लोकं दोष देतात ते आजही चालू आहे. तेव्हा काय वेगळं असणार ? तर अशा ह्या विद्वानाचे राज्याविषयी घेतलेले प्रमुख दोन निर्णय चुकले आणि आयुष्याला मूर्खांचा स्टिकर लागला तो कायमचाच ! त्यात पाचशे वर्ष लोटली तरी ह्या भाईची ओळख मूर्ख म्हणून आहे, हे थोडं मनाला चटका लावतं. ह्याने राज्याच्या बाबतीत दोन प्रमुख निर्णय घेतले होते. ते खालीलप्रमाणे....
१) सोन्या-चांदीच्या नाण्यांऐवजी ताब्यांची नाणी चलनात आणली आणि
२) राजधानी दिल्लीवरून दौलताबादला व परत दिल्लीकडे न्यायचा निर्णय घेतला.
बस् ! ह्या दोन निर्णयामुळे ह्यावर महामुर्ख म्हणून शिक्का बसला. अहो ह्याच्या मरणाचे वर्णन करताना इतिहासकार बदायुनी लिहितात की, ........अशाप्रकारे सुलतानाला आपल्या प्रजेपासून आणि प्रजेला आपल्या सुलतानापासून अखेरची सुटका मिळाली.....
बघा काय करणार ! आपण जरा ह्या निर्णयांचा सविस्तर आढावा घेऊया.
१) सोन्या-चांदीच्या नाण्यांऐवजी ताब्यांची नाणी चलनात आणली.
मुहम्मद बिन तुघलकाच्या लक्षात आले होते की, आपल्याकडे सोन्या चांदीपेक्षा तांबे आणि पितळ मुबलक प्रमाणत आहे आणि म्हणून त्याने स्वत:च्या राजवटीत “दोकानी” नावाचे एक चलन जारी केले. जे तांबा आणि पितळ यापासून बनवले जात असे आणि ही नाणी लोहारांकडून बनवून घेतली जात असतं. जेणे करून त्यांना रोजगार मिळेल असा त्याचा मानस होता परंतु त्यामुळे त्याचा परिणाम वाईट झाला. तुघलकाचं त्यांवर नियंत्रण राहीलं नाही आणि त्याची बनावट नाणी बनू लागली. लोकांच्या हातात पैसा येऊ लागला. गरजेपेक्षा जास्त नाणी बाजारात फिरू लागली, परिणामी महागाईने उच्चांक गाठला. जेव्हा ही गोष्ट तुघलकाच्या लक्षात आली तेव्हा त्याने पुन्हा नवीन नाणी रद्द करून त्या जागी जुनी नाणी चलनात आणली आणि असे जाहीर केले की, तांब्या-पितळेच्या खऱ्या नाण्यांच्या बदल्यात तेवढ्याच किंमतीचे सोने आणि चांदी देण्यात येईल. मग काय लोकांच्या या योजनेवर उड्या पडल्या आणि इकडे राजाच्या खजिन्यातील सोने आणि नाणी काही दिवसातच संपुष्टात आली. हा एक त्याचा फसलेला निर्णय !
२) राजधानी दिल्लीवरून दौलताबादला व परत दिल्लीकडे न्यायचा निर्णय
या एका निर्णयामुळे मुहम्मद बिन तुघलक इतिहासात अधिकृतरीत्या मूर्ख घोषित केला गेला. मंगोली सैन्याच्या वारंवार कारवायांनी त्रस्त झालेल्या तुघलकाने आपली राजधानी दक्षिणेमध्ये देवगिरी अर्थात आजचा दौलताबाद किल्ला येथे हलवण्याचा निर्णय घेतला. मुहम्मद बिन तुघलकाला दक्षिणेचे फारच आकर्षण होते. त्यामुळे त्याने त्वरित आपल्या संपूर्ण प्रजेसह देवगिरीच्या दिशेने कूच केले. परंतु किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये पाण्याची कमतरता असल्या कारणाने त्याने आपली दिल्लीच बरी असे म्हणत राजधानी पुन्हा दिल्लीला हलवण्याचे ठरवले. ४० दिवसांत ७०० मैलांचा प्रवास करून आलेल्या प्रजेला सुलतानच्या या निर्णयावर हसावं की रडावं तेच कळेना पण शेवटी तो ठरला सुलतान त्याच्या विरोधात कोण जाईल. दिल्ली ते देवगिरी आणि पुन्हा दिल्ली या संपूर्ण प्रवासात कित्येक लोक आजाराने, थकव्याने मृत्यूमुखी पावले. ही घटना म्हणजे मुहम्मद बिन तुघलकाच्या कारकिर्दीवर लागलेला सर्वात मोठा कलंक ठरली.
फक्त या दोन घटनाच नाहीत तर अश्या अनेक घटना तुघलकाचा मूर्खपणा सिद्ध करण्यासाठी इतिहासाच्या पानांवर उपलब्ध आहेत. आपण प्रमुख दोन पाहिल्या.
हा सत्तेवर असताना एक प्रवासी चौदाव्या शतकात ह्याच्या दरबारात येऊन गेला त्याचे नाव होते इब्नबतूत ! खालील फोटोत पाहू शकता.
इब्नबतूत हा अरेबियन प्रवासी होता. या प्रदीर्घ प्रवासात ज्या ज्या अद्द्भुत गोष्टी त्याला आढळल्या त्या त्याने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेल्या आहेत. इब्नबतूत ह्याने लिहिलेल्या प्रवासवर्णनाला तुहफ़तअल नज्ज़ार फ़ी गरायब अल अमसार व अजायब अल अफ़सार हे नाव देण्यात आलं. इब्नाबतुत भारतात आल्याचे समजताच महंमद तुघलकाने त्याचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्याची उत्तम प्रकारे बडदास्त ठेवण्याचे हुकुम त्याने आपल्या कारभाऱ्यांना सोडले. बतूतचा अतिशय थाटाने त्याने सत्कार केला. महंमद तुघलकाने त्याची एवढी बडदास्त जी ठेवली त्यामागे त्याचा स्वार्थ होता. इब्नबतूतने आपल्या रोजनिशीत आपल्याविषयी गौरवपर लिहावे अशी त्याची इच्छा होती परंतु इब्नबतूत सत्याचा पुजारी होता. त्याने बादशहाचा सत्कार स्वीकारला व रोजनिशीत लिहिताना सत्याला डावलले नाही.
या तुघलकाची काही योगींशी ओळख होती. एखाद्या वेळी तो योगी लोकांच्या संगतीत येऊन राहत असे. हे योगी मृत माणसाकडे नुसती नजर टाकून व काही मात्र पुटपुटून त्यांना जिवंत करीत, असे इब्नबतुतने लिहून ठेवले आहे. भन्नाट ना ! मला तर ह्याची डायरी वाचताना मजा येते राव ! असाच एक अनुभव म्हणजे महंमद तुघलकाने अशाच एका योगीची इब्नबतुतला ओळख करून दिली. तो योगी योगविद्येत पारंगत होता. त्याने इब्नबतुतला काही योगसामर्थ्य दाखवावे अशी बादशाहने त्या योगीला विनंती केली. ती विनंती मान्य करून तो योगी उठला व थोड्याच वेळात तरंगत वर आकाशात गेला आणि चक्क भ्रमण करू लागला, इब्नबतुतच्या आश्चर्याला पारावार उरला नाही आणि त्यात त्याला मूर्च्छा आली. बादशहाच्या खास वैद्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. तो शुद्धीवर येऊन वर पाहू लागला. तेव्हा तो योगी अजूनही आकाशात भ्रमण करीत असलेला दिसला. थोड्याच वेळात दुसरा एक योगी उठला व त्याने हातातील चंदनाचे खोड जोराने जमिनीवर आपटले व तोही तरंगत वर गेला व आकाशात विहार करू लागला. इब्नबतुतने नंतर ही चक्षुर्वैसत्यम हकीकत जशीच्या तशी आपल्या रोजनिशीत लिहून ठेवली. त्या हकीकतीवरून भारतात योगींचे योगसामर्थ्य किती पराकोटीचे आहे याची कल्पना येऊन शकते. तुघलककडून हा अरबी प्रवासी देवगिरीवर म्हणजेच महाराष्ट्रात आला होता. इथे मरहटे लोक राहतात असं तो लिहतो. इथेसुद्धा त्याने अनेक योगींचे बरेच चमत्कार त्याने पाहिले व रोजनिशीत नोंद केली.
तर असा हा मुहम्मद बिन तुघलक विद्वान होता पण अचाट निर्णयांमुळे महामुर्ख ठरला आणि त्याची ओळख महामुर्ख आहे पण विद्वान नाही, माझ्या ब्लॉग वाचकांना दोन्ही बाजू समजाव्यात म्हणून हा लेख प्रपंच!
बलाढ्य तुघलकाबाद किल्ल्याचे काही खास फोटो तुमच्यासाठी....
गयासुद्दीन तुघलक ह्याची भव्य कबर स्थापत्याच्या दृष्टिकोनातून पाहताना मंदिरशैलीचा भास होतो. तिथे एकेकाळी मंदिर असेल का ?????
तुघलकाबाद किल्ल्यातील बालेकिल्ल्याचा तूंदिल बुरुज
तुंबलेला प्रशस्त खंदक..
किल्ल्यातील प्रसिद्ध असा जमिनीखालील बाजार....
No comments:
Post a Comment