रायगड जिल्ह्यातील आमचे कर्जत ऐतिहासिक आहे कारण या नगराच्या पूर्व-पश्चिम बाजूला गडकिल्ले तर दक्षिणोत्तर बाजू लेण्यांनी नटलेल्या आहेत. अफाट निसर्गसंपन्नता इथे लाभलेली आहे. तर अशाच एका सोप्या चढाईच्या गडावर जाण्याचा माझा आणि ओंकारचा बेत झाला आणि लागलीच सूत्र फिरली आम्ही जायचे ठरवल्यापासून पावसाने जोर धरलाच होता, कसलं उट्ट काढत होता, कोणास ठाऊक ? तरी सुद्धा जायचेच ह्यावर एकमत झाले. शनिवारी धो धो कोसळणारा हा पाऊस रविवारी मात्र काहीसा विसावला. आम्हांला वाटले परिस्थिती जुळून आली आहे पण कोणीतरी म्हणून गेलेच आहे की, जगावेगळी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या हक्काचा माणूस नेमका कसा वागेल हे कधीच सांगता येणार नाही आणि झालेही तसेच ! पहिलाच फटका ओंकारच्या गाडीने दिला. रेंगाळलेला पाऊस पाहून ती बया म्हटली, "कुठे ऊत घेतोस" पण हा सुद्धा हट्टाला पेटला पण ती जिंकली. अहो ! ती सुरु झालीच नाही मग काय "गेलीस उडत" म्हणून ह्याने लोकल पकडली आणि माझ्या घरी दाखल झाला आणि काही वेळातच आम्ही निघालो. विसावलेल्या पावसाने संधी साधली आणि फुलटू आम्हांला चोपायला सुरुवात केली.
हो, भिवगड आम्हांला खुणावत होता आणि पाऊस फटकवत ! मजलदरमजल करत वदप गावांत आम्ही पोहचलो. त्या धो धो कोसळणाऱ्या प्रसिद्ध धबधब्यावर जत्रा लोटली होती. "गाव तिथे वाईन शॉप" या तत्वाखाली तोबा गर्दी "त्या" दुकानात उसळली होती जणु काही रेशनवर रॉकेलच आले होते. आजच्या काळातील हे रॉकेल बेवड्यांच्या आयुष्याला आग लावून त्यांची राखरांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, हेही नक्की !
वदप गावाच्या पुढे गौरकामत या गावामध्ये माझा मित्र संतोषच्या घरी आम्ही गाडी लावली आणि भिवगडाच्या घेऱ्यात आलो. संतोषने अर्धा रस्ता दाखवला आणि ओंकार आणि मी मार्गस्थ झालो. पहिल्या छोट्या टेकडीच्या सोंडेवरुन भिवगडाच्या डोंगरपायथ्याजवळ पोहचलो. डोंगराविषयीच्या विविध व्याख्या ओंकारला समजून देत असताना भूरभूर पावसात भिवगडाच्या माथ्यावर ढग लपाछपी खेळत होते हे चित्र सुखावणारं असले तरी आमची चढाई धारेतुन होती, मनांत चर्र झालं पण एकेकाळी आपले पुर्वज अशा कितीतरी धारेतुन आणि कातळकड्यातून हिंदवी स्वराज्य टिकविण्यासाठी भिडले आहेत साहजिकच तो आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही त्या धारेतुन चढायला सुरुवात केली. वरून खळखळत येणारे पाणी मन सुखावत होते. धारेतील पायऱ्या ह्या हजार-दिडहजार वर्षांपूर्वी कोरलेल्या आहेत. कातळातील ह्या छोट्या छोट्या पायऱ्यांना "पावठ्या" म्हणतात. तर अशा ह्या पावठ्यांना जणू काही निसर्ग जलाभिषेक करत होता.
खालील फोटोत ती धारेची वाट पाहू शकता.
भिवगडवरील असलेले काही कोरिवकाम हे हजारो वर्ष जूने आहे. १६व्या शतकात ह्या डोंगराला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. छोटेखानी डोंगराच्या मागे सह्याद्रीची पर्वतरांग आहे. जणू काही ह्या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी ती उभी ठाकली आहे. कसा होता हा मार्ग हे जाणून घेऊया.
सातवाहनांच्या काळात अनेक व्यापारीमार्ग निर्माण झाले, विविध बंदरातून राजधानीकडे धाव घेणाऱ्या व्यापारी मार्गांवरून आर्थिक संपन्नता महाराष्ट्रात नांदू लागली. ह्याच व्यापारी मार्गांवरून यात्रेकरु, धर्मप्रसारक आणि इतर प्रवासी प्रवास करत असत त्यामुळे व्यापारी ताफांचा आणि तांड्यांचा वेग मंदावत असे ह्यातून मार्ग काढण्यासाठी यात्रेकरूंसाठी वेगळे मार्ग उदयांस आले त्यातील दक्षिण घाटावर जाण्यासाठी भीमाशंकर, गोरखगड व कोथळीगडाकडून येणारे यात्रेकरुंचे मार्ग भिवगडाकडून जात होते. त्यांच्यासाठी ह्या डोंगरावर दोन छोटे विहार व पाण्याची टाकं खोदण्यात आली. धारेतुन हा मार्ग चढत असताना ते छोटे विहार दृष्टीस येतात त्यामध्ये जायला दोन पावठ्यासुद्धा आहेत. खालील फोटोत पाहू शकता.
तिथून पुढे गेले की, संपूर्ण कातळ फोडून जवळ जवळ काटकोनात मार्ग तयार केलेला आहे. तो मार्ग त्यावरील पायऱ्या पाहताना त्या तयार करणाऱ्या अनामिक हातांना वंदन करावेसे वाटते. त्यात मध्ये मध्ये तटबंदीचे मूकं अवशेष आपल्याशी स्मितहास्य करतात. काटकोनाकृती मार्ग खालील फोटोमध्ये पाहू शकता.
आम्ही आता त्या धारेच्या मार्गातून गडाच्या पठारावर आलो होतो. तिथे एक पाण्याचे टाकं आढळले त्याचे स्थापत्यसुद्धा अगाध होते त्या टाक्यासमोर एक छोटा कुंड असून आज तो मातीने भरलेला आहे परंतु प्रत्येक वेळी प्रवाश्याला मुख्य पाण्याच्या टाक्याजवळ जायची गरज नाही कारण दुर्घटना होऊ शकते हा विचार करुन हे कुंड खोदलेले आहे तसेच पावसाळ्यात हे अती झालेले पाणी (overflow) बाहेर जाण्यासाठी खडकात खाच केलेली आढळली. त्यावेळी केलेले हे विचार आपल्याला थक्क करतात. मातीने भरलेले कुंड व पाण्याचे टाकं खालील फोटोत....
थोडा चढ चढून आम्ही अलीकडे ध्वज लावलेल्या ठिकाणी आलो तिथे सुद्धा दोन पाण्याची टाकं होती आणि त्याच्या चहू बाजूने ते शाकारण्यासाठी खास भोकं पाडलेली आढळली. विचार केला तर साधारणतः त्या पठारावर दक्षिणेकडून वारा वाहतो आणि म्हणूनच दक्षिणेला वाऱ्याच्या वेगाचा विचार करता, त्याच दिशेला जास्त भोकं पाडलेली दिसून येतात जेणे करुन शाकारलेले बांबू टिकाव धरु शकतील. किती हा विचार ! जेव्हा शहाजी राजांच्या काळात ह्याला गडाचे स्वरूप प्राप्त झाले तेव्हा इथे बालेकिल्ला होता, आज तिथे प्रचंड मोठ्या वास्तूच्या जोत्याचे अवशेष पाहता येतात. त्यात सुद्धा चपटे तोडे एक वेगळंच स्थापत्य डोळ्यांसमोर आणतात बस् तशी ऐतिहासिक दृष्टी पाहिजे. ह्या बालेकिल्ल्यात सुद्धा एक खोदीव असे खोल पाण्याचे टाके आहे. खास ते बालेकिल्ल्यासाठी असावे तसेच मागच्या बाजूला असलेले पाण्याचे टाके मात्र पाहताना इथे आल्याचे सार्थक वाटते कारण हे पाण्याचे टाके खांबटाके आहे. दोन भल्या मोठ्या दगडी खांबांवर वरील बालेकिल्ल्याचा डोंगराला तोलून धरलेले आहे. आहाहा खळखळून आनंद देणारं हे टाकंस्थापत्य प्राचीनत्व सिद्ध करते.
क्षणभर विश्रांती आणि पोटभर पाणी पिऊन यात्रेकरु इथून ढाक-बहिरीमार्गे दोन वाटांनी कोंडाणा लेणीकडे जात असत. एक वाट होती खांडशीची वाट तर दूसरी होती गाळदेवीची वाट ! खांडशीच्या वाटेवर आज खांडपे गाव वसले आहे. कमाल आहे ना ! त्या वेळच्या ह्या प्रमुख वाटा आपल्या गावातून गेलेल्या आहेत आणि त्या वाटांवरून कित्येक प्रवासी गेलेले आहेत, हाच विचार इतिहासाचा अभ्यास करायला स्फूर्ति देऊन जातो.
भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केला असता, ह्या गडाच्या पूर्वेला पुणे जिल्ह्यातील जांभळी गाव व खांडी धरण असून पश्चिमेला इर्शाळगड, पेब अथवा विकटगड व माथेरानची डोंगररांग दिसते. दक्षिणेला ढाक बहिरी, कोंडाणे लेणी असून इथूनच राजमाचीकडे म्हणजेच घाटावर जाता येते. उत्तरेला कोथळीगड, भीमाशंकरच्या घाटवाटा, गोरखगड व पदरगड आहे. तर असा हा ऐतिहासिक यात्रेकरुंच्या मार्गावरील व नंतर गडाचे स्वरूप प्राप्त झालेला भिवगड रायगड जिल्ह्यातील कर्जत पासून हाकेच्या अंतरावर आहे. कधी कर्जतला गेलात तर नक्कीच ह्याला भेट द्यायला विसरू नका, त्यासाठी हा लेख प्रपंच !
लेखांसबंधी काही फोटो खास वाचकांसाठी....
बालेकिल्ल्यातील ज्योत्याचे अवशेष
पाण्याचे टाकं, त्याच्या बाजूला overflow ची खाच व शाकारण्यासाठी पाडलेले भोक
बालेकिल्ल्यातील पाण्याचे टाकं
धारेच्या वाटेतील पायऱ्या
लेख कसा वाटला हे comment मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment