काळ कठीण आपणंच आणतोय का ?

Shivaji-Maharaj-Rajyabhishek-Photo

सर्व प्रथम हा ब्लॉग वाचायचा आधी एक सांगू इच्छितो की, कोणताही गैरसमज करून घेऊ नका. हा ब्लॉग वाचून आत्मचिंतन करा आणि मगच प्रतिसाद द्या, ही विनंती ! ब्लॉगचे नाव वाचून थोडं वाईट वाटेल पण खरंच आज तसंच घडत आहे.

तो दिवस होता ज्युलियन कालगणनेनुसार ६ जून १६७४चा आणि तिथीनुसार म्हणाल तर आनंदनाम संवत्सर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ ! श्रीमद् रायगडवर न भूतो न भविष्यती असा सोहळा पार पडला. लाखो लोकांच्या उपस्थितीत वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींनी श्रीमद् रायगिरौ फुलून गेला होता. मराठ्यांच्या ह्या शिस्तीच्या प्रदर्शाने सोहळ्यात एक शिस्त जपली होती. हो ! लाखभर लोकांमध्ये कुठलाही दंगा झाला नाही की कुठली चेंगराचेंगरी ! शिस्तीची नैतिक जबाबदारी म्हणतात ना, ती हीच ! जी आम्हांला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविली पण आपण आज ती जपतोय का ? राज्याभिषेकाला जरूर जावे पण शिस्त आपण बाळगतो का ? राजाला अभिवादन करताना नक्की आपण कसलं शक्ती प्रदर्शन करतोय, ह्याचे भान आहे का ? 

 

श्रीमद् रायगड हा छत्रपती शिवरायांचा एकमेव गड आहे ज्याच्या नावाच्या आधी "श्रीमद्" विशेषण लावलं आहे. व्याडेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ (ज्याला आज जगदीश्वर म्हणतात ते मंदिर) तिथे एक शिलालेख आहे, त्यामध्ये रायगडला "श्रीमद् रायगिरौ" संबोधले आहे तसेच ह्या गडाला जगदीश्वराचा प्रासाद म्हटले आहे, हा सामान्य गड नाही हे आधी लक्षात घ्या. हा गड आपल्यासाठी फक्त राजाचे निवासस्थान नसून एक पवित्र मंदिर आहे, हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. सर्व देवांना, राष्ट्राला आणि धर्माला वाचवणार राजा इथे चराचरांत आहे. ह्या दगडी चिरा ज्याला तोडे म्हणतात हे फक्त दगड नाहीत तर इतिहास पाहणारे आणि स्वराज्याचे रक्षण करणारे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा मान आपण राखलाच पाहिजे. अहो ! छातीवर शिवबा लिहून आणि दंडावर छत्रपती शिवरायांचे चित्र काढून so called शिवभक्त श्रीमद् रायगडवर जो धिंगाणा घालतात, ह्याचे प्रचंड दुःख होतं पण सांगणार कोण ? आज राज्याभिषेक सोहळ्याला जत्रेचे स्वरुप आपणंच आणत नाहीत ना, हा प्रश्न स्वतःला विचारा. फक्त शिवभक्त आणि शिवश्री पदवी लावून जो बाजार तुम्ही हुंगत आहात ना, त्याला राजा कधीही आशीर्वाद देणार नाही, हे ही नक्की !

  

गर्दीला दिशा नसते, तिथे दशा होते हे ह्या राज्याभिषेकाच्या वेळी जाणवले. त्या काळात छत्रपतींच्या गडावर जायला आणि यायला तटबंदीवर चढून ओलांडायची कोणाची हिंमत झाली नाही त्याला कारण राजाची शिस्त पण आज ह्या भगव्या रंगाचा फेटा सोडून त्याला टांगून तटावर उतरत बेशिस्तीचे प्रदर्शन घडवले ह्या भक्तांनी ! सोहळा तोच होता, तेव्हाही प्रचंड गर्दी उसळली होती आणि आताही ! पण तेव्हाची शिस्त आता नव्हती त्याला कारण तेव्हा राजा साक्षात होता आणि आज मात्र संस्काररूपी अस्तित्वात असलेला राजा तोही निघून गेल्याचे जाणवले. गडाची तटबंदी ओलांडायला मावळ्यांनासुद्धा कधीही परवानगी नव्हती पण आज मात्र ह्या हुशाऱ्या सहज केल्या जात आहेत. आता रेलिंग हवे आणि रस्ता हवा अशा मागण्या जोर धरत आहेत परंतु "नैतिक जबाबदारीचे भान" त्यावर कोणी बोलायला तयार नाही.

  

राज्याभिषेक हा असा सोहळा आहे जो ह्या त्रिखंडात गाजणारा आहे. निदान त्याला तरी गालबोट लावू नका. त्या काळी राजा दरबारात असताना तलवार नंगी करायला कोणाला परवानगी होती का ओ ? मग तो सामान्य असो की vip ? पण आज मात्र चित्र उलटे आहे. राजदरबारात ते ही राजा सिंहासनाधिश्वर असताना त्यांच्या समोर नंग्या तलवारींचा खणखणाट भर दरबारात करून नक्की काय दाखवायचे आहे, तेच मुळात कळत नाही. ती वास्तू पवित्र आहे आणि माझ्यासाठी तो मंदिराचा गाभारा आहे पण तिथे गुटखा, तंबाखू आणि तत्सम पदार्थ खाऊन जर त्या राज्याभिषेकात तुम्ही घोषणा देत असाल तर तुम्हीच विचार करा, आपली कृती योग्य आहे का ? एक लक्षात घ्या, त्या मातीला राजाचा चरणस्पर्श झाला आहे, साहजिकच ती माती आमच्यासाठी अंगारा आहे, त्याच मातीत गुटखा, पान आणि तंबाखूच्या पचापच पिचकाऱ्या मारल्या जात आहेत, हे लिहिलं म्हणून तुम्हांला वाईट वाटेल आणि तुम्ही माझ्यावर टीकाही कराल पण ही सत्य परिस्थिती आहे, जी नाकारता येणार नाही आणि सत्य नेहमीच कटू असते. असो ! सुधारणा करायची की टीका करायची हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. जे मनाला रुचत नाही त्यात सुधारणा करण्यासाठी मी इथे लिहणारच ! कारण वास्तूची पावित्र्यता राखायला हवी आणि मला तरी ते माझ्या जीवापेक्षा जास्त किंमतीचे वाटते.

 

मागच्या वेळेस सुद्धा अशीच घटना घडली. ज्या वाटेने आपल्या छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी फार आधीच गडावर हत्ती नेऊन दाखवले. अगदी इंग्रज अधिकारी हेन्रीलासुद्धा आश्चर्य वाटले आणि त्याने ह्या घटनेची नोंद स्वतःच्या डायरीत केली पण दुर्दैवाने मागच्या वर्षी त्याच वाटेने धड आपल्याला घोडा आणता आला नाही. खुबलढा बुरुजाजवळ त्याला उगाचच वेगाने खेचत खाली आणताना त्याचा पाय घसरला आणि तो बाजूचे रेलिंगमधून दरीत पडून गतप्राण झाला. काय वाटले असेल त्या मातीला ? ज्या मातीने तीनशे वर्षांपूर्वी इथून हत्ती नेताना पाहिला होता. स्वराज्याची दौलत आपल्यालाच सांभाळायची आहे ना, मग आपण इतके गाफील का ? पवित्र राज्याभिषेक सोहळ्याला so called शिवभक्तांनी जत्रेचे स्वरूप दिले आहे. काही मोजकी लोकं जी खरंच अभिवादन करायला येतात आणि शांत चित्ताने निघून जातात पण काहींचा तोरा विचारता सोय नाही मग तलवार घेऊन तो त्वेषाने फोटो काढणे असो की राजा बरोबर सेल्फी मारणे असो, सारंच चित्र दुखावणारं आहे. कधी कधी वाटते की, दर्शनासाठी मंदिरात आपण जशी रांग लावतो तशी रांग मंदिर वाचवणाऱ्या आपल्या राजाला वंदन करण्यासाठी नाही लावता येणार का ? आणि मग मात्र वाटते की, काळ कठीण आपणंच आणतोय का.............?


लेख कसा वाटला हे sagarblog4@gmail.com वर नक्की कळवा, काही खटकले असल्यास ते हि कळवा पण एक लक्षात असू द्या गडांचा मान राखणे म्हणजेच महाराजांनासुद्धा अभिवादन आहे. सरते शेवटी राजाचा तिथे वास आहे आणि आज आपल्याला त्या ऐतिहासिक वास्तूंची पावित्र्यता राखणे हि आपलीच सर्वस्वी जबाबदारी आहे, त्यासाठी हा लेख प्रपंच !


लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.


© सागर माधुरी मधुकर सुर्वे

 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960