ब्लॉगचे नाव वाचून क्षणभर त्रास होईल पण एक इतिहास अभ्यासक म्हणून कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करताना तटस्थ करावा लागतो, तेव्हा कुठे ती घटना आपल्याला उमजते.
असो !
ह्याच वर्षाच्या सुरुवातीला खांदेरी दुर्गाला आमच्या टीमने अभ्यासू दृष्टिकोनातून भेट दिली. संपूर्ण दुर्ग फिरत त्यावर घडलेल्या घटनांना ओंकार उजाळा देत होता. एकंदरीत इतिहास जागवताना त्या दुर्गात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांनी मात्र मन खिन्न होत होते. ह्या मराठ्यांच्या दुर्गात सर्व धर्माच्या लोकांचा धिंगाणा चालू आहे. त्याकाळी दुर्ग बांधताना शत्रुमार्फत वित्तहानी तर झालीच परंतु मनुष्यहानीलासुद्धा तोंड द्यावे लागले होते पण आज स्वकीयच ते काम तिथे जोमाने करत आहेत. त्या दुर्गाच्या ढासळणाऱ्या चिरा पाहताना इतिहास ढासळत होता, हे सर्व मनाला रुचले नाही आणि तीच घटना मी तरुण भारत वर्तमानपत्रात दुर्दैव खांदेरीचे ह्या मथळ्याखाली प्रकाशित केली. तेव्हा अगदी जवळच उंदेरी बेटावरील दुर्ग वाकुल्या दाखवत होता. त्याला भेट देणे तेव्हा जमले नाही तेव्हा पासून तो आठवणीत आला कि, सलत होता. विचार केला आणि खास त्यावर अभ्यासात्मक दौरा करायचे ठरवले.
दिनांक २९ एप्रिल उजाडला आणि तडक सकाळीच आम्ही थळ बंदरावर पोहचलो. होडीचा वाट पाहत तिथे मासळीचा एक प्रकार असलेला "जवळा" होडीतून उतरवण्यासाठी आणि तो वाळवण्यासाठी चाललेली लगबग पाहून कोळी लोकं किती मेहनत घेतात ते कळले. पहाटे समुद्रात घेऊन गेलेल्या होड्या पुरुष मंडळी भरतीच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर लावत होते आणि त्याच वेळी घरातील मुलगा बैलगाडी घेऊन अगदी त्या बैलांना नाकापर्यंत पाण्यात घेऊन जात होता, झटपट जवळ्याच्या बादल्या गाडीत भरून किनाऱ्यावर उभ्या असलेल्या महिलावर्गांकडे त्या सोपवल्या जात होत्या. हि लगबग इतकी जोमात होती कि, आम्ही ज्यावर उभे होतो तिथे महिलावर्ग जवळ्याची चादर अंथरत होते आणि ज्यावर हा कार्यक्रम सुरु होता तो थळचा कोट होता. खालील फोटोत पाहू शकता.
थळचा कोट
हो हो ! छत्रपतींनी खांदेरीचे काम सुरु असताना त्याला आधार असावा म्हणून जो कोट उभा केला तो ! आज त्याची संपूर्ण ओळख पुसलेली आहे. कोटाच्या तटाच्या मोठमोठ्या एकावरएक रचलेल्या दगडी आज दिसतात आणि इतिहास अभ्यासकांना ते समुद्री युद्ध आठवते. पोर्तुगीज अधिकारी रिचर्ड केग्विन व ऍथरटन खांदेरीच्या लढाईच्या वेळी लिहितात कि, "शिवाजीच्या त्या छोट्या सरपटणाऱ्या मराठी होड्या इतक्या विलक्षण आहेत कि, आम्हांला त्या आश्चर्यकारकरित्या चकवतात आणि अशा होड्या आमच्या ताफ्यात हव्यात". बस् ह्या कोटाने त्या पाहिल्यात पण दुर्दैवाने तो घुसमटतोय. ह्याच कोटावरून मराठे खांदेरीला रसद पुरवत होते. हाच कोट सिद्धीच्या तोफांना समर्थपणे तोंड देत स्वतःच्या उरावर हिंदवी स्वराज्याचा झेंडा मानाने फडकवत होता. हा कोट मराठ्यांचा आधारस्तंभ होता, आज त्यावर मासळी वाळवली जात आहे, कमाल आहे ना ! फोटोत पाहू शकता.
जवळा मासळीची चादर...
आठवणीतून मी जागा झालो, होडी आली होती आणि प्रवास सुरु झाला त्या शापित दुर्गावर ! समुद्रावरील हिंदवी स्वराज्याला लागलेला उंदीर सिद्धी.... आणि त्याने बांधलेला दुर्ग उंदेरी....
आज सुदैवाने तिथे जेट्टी नाही म्हणून तो धिंगाणा घालणाऱ्या लोकांकडून वाचला ! खांदेरीत जत्रा भरते, सर्वच धर्माचे लोक तिथे धिंगाणा घालतात. दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडतो खच ! इथे १०-१२च बाटल्या दिसल्या. काय गंमत ना, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आणि स्वतः दुर्ग खांदेरी उभा करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या दुर्गात दर्गा आहे आणि स्वराज्य पोखरणाऱ्या, अनन्वित अत्याचार करणाऱ्या सिद्धीच्या ह्या उंदेरी दुर्गात वृंदावन आहे. काळाचा महिमा तो असा ! काहीही असो ! मराठे तेव्हाही भारी पडत होते आणि म्हणून जिद्दीच्या जोरावर खांदेरी उभा राहिला तर चिवट स्वभावाच्या जोरावर उंदेरी उभा राहिला, दुरून पाहणारे आणि काट्याने काटा काढणारे इंग्रज १७ किमी असलेल्या मुंबईवर स्थित होते तर पोर्तुगीज मात्र इथे निदान अवशेषांच्या दुनियेत कुठेच दिसत नाही. तेव्हाही सिद्धी वचकून होता आणि त्याचा उंदेरी दुर्गही ! आजही तो चळचळ कापताना मला दिसला म्हणून जर तुम्ही कधी गेलात तर निरीक्षण करा. संपूर्ण तटबंदी शाबूत आहे परंतु खांदेरीच्या बाजूची तटबंदी कोसळली आहे. आज तिच्यात ह्या मराठ्यांच्या दुर्गासमोर उभी राहण्याची हिंमत नाही, असे म्हणतात कि, 'एखादी शक्ती परजण्यापेक्षा तिच्या अस्तित्वाची जाणीवही तिच्याविषयी जरब निर्माण करू शकते.' हे पडझड झालेल्या त्या तटबंदीकडे पाहून मला तरी वाटते.
हा दुर्ग सिध्दीने बांधला, ह्या दुर्गात गोड्या पाण्याचे टाके आहेत आणि म्हणूनच त्याला झटपट बांधकाम करता आले. तर खांदेरीसाठी तेथील दुर्ग बांधणाऱ्या मराठ्यांना जेवणाचे साहित्य व पाणीसुद्धा नागावच्या बंदरातून आणि थळच्या कोटातून पाठवावे लागले, ह्यातून मराठ्यांची जिद्द दिसते. इंग्रज ह्या दोन्ही बेटांचा उल्लेख हेन्री आणि केन्री करतात. छत्रपती शिवरायांनी जेव्हा खांदेरी दुर्ग बांधायला काढला तेव्हा पहिला विरोध मुंबईकर इंग्रजांनी केला. २२ एप्रिल १६७२च्या सुरतेहून मुंबईला पाठवलेले पत्रात ह्याचा उल्लेख आहे कारण त्यांच्या मुंबईच्या बंदरातून निघणारे किंवा बंदरात येणारे प्रत्येक जहाज इथून दिसणार होतं म्हणून हा दुर्ग बांधताना सतत ते अडचणी निर्माण करत होते. सरते शेवटी जिद्दीने छत्रपती शिवाजी महाराजांनी २२ ऑगस्ट १६७९ ला हा दुर्ग बांधायला घेतला. साहजिकच इंग्रजांबरोबर झटापटी झाल्या आणि ह्या लढाईत इंग्रजांचे बरेच नुकसान झाले त्यात वित्तहानी तर झालीच पण कॅप्टन थोर्प सारखे प्रमुख अधिकारी मारले गेले तर काही वेळा फ्रान्सिस मॉलिव्हरसारखे अधिकारी अटकसुद्धा झाले. ह्यातून काट्याने काटा काढण्यासाठी या धूर्त इंग्रजांनी सिद्धीला पाचारण केले आणि त्याने खांदेरी जवळील बेटावर दुर्ग बांधायला काढला ज्याचे नाव उंदेरी !
उंदेरी दुर्गाच्या मागील बाजूस समुद्रातून १ किमीवर खांदेरी तर प्रवेशद्वारासमोर थळचा कोट दिसतो, बाजूला दूरवर कुलाबा नजरेत येतो, ज्यावर आपले नाविक तळ होते. इतकं सर्व असतानासुद्धा ह्या पठ्ठयाने ९ जानेवारी १६७९ ला उंदेरी बांधायची हिंमत केली म्हणून मी ब्लॉगच्या नावात "चिवट उंदेरी" असा शब्दप्रयोग केला. १२ व १३ जानेवारीला स्वतः सिद्धी उंदेरीवर होता म्हणून मराठ्यांनी उंदेरीवर हल्ला केला पण त्यात त्याची हानी झाली नाही परत २६ जानेवारीला दौलतखानाने पुन्हा हल्ला केला आणि तोही सिद्धीने यशस्वीपणे परतावून लावला. स्वतः सिद्धी तिथे उभा राहून तटबंदीचे काम करत होता. ते करत असताना खांदेरीवर इंग्रज व सिद्धी दोघंही तोफांचा मारा करत होते पण मराठे हटत नव्हते तर जोमाने काम करत होते. हळूहळू सिद्धीने खांदेरीवर मारा कमी करत थळ कोटावर हल्ला करायला सुरुवात केली पण तिथेसुद्धा काहीही उपयोग झाला नाही. सिद्धीही हटत नव्हता आणि मराठेसुद्धा ! मराठ्यांचे काही नुकसान झालेले इंग्रजांनी लिहून ठेवले आहे. ह्यात एक महत्वाची नोंद माझ्या हाताला लागली. २८ जानेवारी १६८०ला सिद्धीने कॅप्टन मिंचिनला सांगितले कि, "उंदेरी बेट काबीज केले नाही तर तुला ठार मारीन अशी धमकी शिवाजीने दौलतखानाला दिली आहे." साहजिकच त्या दिवसापासून गस्त जरा जास्तच वाढविली गेली, इंग्रजांचे नाकेबंदी पथक त्या रात्री पासून उंदेरीच्या जवळ जाऊन नांगरत असत. सरते शेवटी ह्या खांदेरी-उंदेरी प्रकरणावरून २७ फेब्रुवारी १६८० ला इंग्रज व मराठ्यांमध्ये तह झाला व ह्या प्रकरणावर पडदा पडला.
छत्रपती शिवरायांना ३ एप्रिल १६८० ला देवाज्ञा आली. स्वराज्यातील सोनेरी पर्व असलेल्या आरमाराचा संभाजी महाराजांनी खास उपयोग केला नाही, त्यात आपल्या राजांना अल्प आयुष्य लाभले. क्रुरकर्मा औरंग्याने १६८९ ला शंभुराजांची हत्या केली. काही वर्ष सरली आणि १६९४ ला आरमारात नवीन पर्व प्रसिद्धीस आले, त्यांचे नाव कान्होजी आंग्रे ! सन १६९४ ते १६९८ कान्होजींनी मुघलांना विरोध करत कोकण प्रांतावर अंमल बसवला आणि ४० जहाजांचा लहान पण समर्थ आरमारी ताफा तयार केला. दुर्ग कुलाब्याला आपला नाविक तळ तयार करून छत्रपतींच्या आरमारावर कळस चढवायला सुरुवात केली. ह्या आमच्या छोटेखानी मोहिमेत आम्ही कुलाबासुद्धा पाहिला हिराकोट आणि दुर्ग असा मिळून असलेला हा कुलाबा छत्रपतींच्या शुष्कसांधी स्थापत्याचा अप्रतिम नमुना आहे. हा दुर्ग १६९८ ला सिद्धीच्या ताब्यात गेला तेव्हा त्यावर ७-८ हजार माडाची झाडे होती जी त्याने तोडली. आज त्या दुर्गावर माडाचे एकही झाड नाही. असं म्हणतात कि, जसे प्रचंड नरसंहार झाल्यावर माणूस त्या जागी राहत नाही तसंच काहीसं आज तिथे माडांच्या बाबतीत झालेले वाटते.
फेब्रुवारी १७०० साली कान्होजींनी सिद्धीच्या ताब्यातील थळ बंदरावर हल्ला केला. (तोच वर सांगितलेला ज्यावर जवळा वाळत घालतात तो !) घाबरलेल्या सिद्धीने तह केला आणि धडा घेतलेल्या कान्होजी आंग्रेंनी ह्याच सालात कुलाब्याजवळ सर्जाकोट बांधला तर सन १७२० मध्ये हिरकोट गढी बांधली. पहिले समुद्रावर भ्रमण करण्यासाठी पोर्तुगीजांकडून कार्ताझ विकत घ्यावे लागे महाराजांनीसुद्धा सुरुवातीला घेतले होते पण त्यांच्या मृत्यूनंतर ५० वर्षात ती सुद्धा परिस्थिती बदलली. इस १७२१ च्या पूर्वीपासून पोर्तुगीजांच्या वसाहतीतील व्यापारी कान्होजी आंग्रेंकडे कौल घेऊ लागली आणि त्यासाठी पोर्तुगीजांच्याच वसईच्या प्रातांतून ते दरवर्षी सात लाख वसूल करत असत, हा बदल होता. हि प्रगती होती आणि समुद्रावरील वर्चस्व ठेवलेली पावती होती. तर असा हा उंदेरी दुर्ग पाहण्याचा योग जुळून आला.
उंदेरी दुर्गात गोड्या पाण्याचे टाके गाळांनी भरले आहेत त्यामुळे त्यातील पाणी पिण्यास योग्य नाही. बाकी अवशेषांच्या खच आहे. तुटलेली खापरं आणि कौलांचे प्रमाण बरेच आहे. प्रवेशद्वाराची कमान पाहता, ती शैली आपली वाटत नाही. (खालील फोटोत पाहू शकता) दोन्ही बाजूला असलेले घुमट शिल्प एका दगडात कोरुन अप्रतिम नमुना सादर केलेला आहे.
घुमटशिल्पाचा फोटो द्यायचा बाकी आहे, तुर्तास कमान पाहू शकता.
कुलाबाच्या आणि खांदेरीच्या बाजूला चोरदिंड्या आहेत पण पक्षांच्या वावरामुळे प्रचंड प्रमाणात विष्ठा पडलेल्या आहेत. त्याचा दर्प त्या परिसरात येत राहतो. वर्षानुवर्षे समुद्र धडका मारत आहे त्यामुळे कोसळलेल्या तटबंदीच्या काही दगडी चिरा थेट वाहून गेलेल्या दिसतात. जेट्टी नसल्यामुळे फार क्वचितच पर्यटक फिरकतात. बालेकिल्ल्याची बांधकामशैली मनात भरते. कधी गेलात तर काही तास ह्या दुर्गाला द्यायला हरकत नाही, शेवटी शत्रूने जरी बांधलेला असला तरी इतिहास त्याने सुद्धा पाहिला आहे आणि मराठेशाहीच्या उत्तरार्धात तो आपण जिंकलेला आहे, हे विसरता कामा नये.
उंदेरी दुर्गाचे काही फोटो खास तुमच्यासाठी....
उंदेरी प्रवेशद्वार
उंदेरी दुर्गातील वृदांवन
दुर्गातील गोड्या पाण्याचे टाकं..
उंदेरी दुर्गातील अनामिक कबर
उंदेरीतील बालेकिल्ल्याचे अवशेष
उंदेरीतील तुटलेली तटबंदीची फांजी..
थळ कोटाजवळील लगबग..
दुर्ग कुलाबा..
दुर्ग कुलाबाच्या पिछाडी बाजूच्या प्रवेशद्वाराजवळील सैनिकदेवडी..
दुर्ग कुलाब्यातील मिश्र मारुतीची मूर्ती
लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment