पुस्तकांवर लिहिण्यास कारण कि....


आज जागतिक पुस्तक दिवस म्हणून खास लेख पुस्तकांवर लिहिण्यास कारण कि....

नोव्हेंबर २०१० सालापासून पुस्तकं माझ्या आयुष्यात आली. ज्यांची साथ आज कायम आहे. सर्व प्रथम बाबासाहेबांचे राजा शिवछत्रपती हे पुस्तक आईने वाचायला दिले आणि आजपर्यंत स्वतःच स्वतःसाठी छोटेसे वाचनालय तयार करत आहे. या माझ्या छोट्या वाचनालयात कोण कोण आहे ? आणि ते लोक मला कशी मदत करतात ? तसेच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज खास त्यांच्या दिवशी केलेला हा प्रयत्न !


पुस्तक वाचण्याचा छंद नसतो तर ती जीवनावश्यक बाब आहे, हे जेव्हा कळले तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. पुस्तकांतून रोज भेटणारी हि लोकं रसायन असतात, त्यांचे विचार योग्य वेळी योग्य घटकांमध्ये मिसळले कि, तयार होणारा विचाररूपी पदार्थ अफलातून असतो आणि त्या रसायनाचा एखादा थेंब जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा मात्र खूप गोष्टी उलगडत जातात. हे लोक माझ्या आयुष्याचे महत्वाचे घटक आहेत. जे माझ्या कपाटात पुस्तकरूपी स्वरूपात आहेत. मनुष्य पुस्तक वाचू लागला कि, सखोल विचार करू लागतो आणि विचार करू लागला कि, आयुष्यात आमूलाग्र बदल घडतात, जे हितावह असतात तर असे हे पुस्तकांचे विश्व माझ्याकडे आहे. ह्यातील सगळी भन्नाट लोक जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्यांच्या गप्पा ऐकायला एक वेगळीच मजा येते. मुद्दामहून घरात कोणी नसताना जेव्हा हे कपाट उघडतो तेव्हा हि मांदियाळी अनुभवयाचा सोहळा अप्रतिम असतो. नारायण धारप सर म्हणतात कि, पुस्तकं नशिबात असावी लागतात, ते उगाच नव्हे.


या माझ्या पुस्तकांच्या कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर सर्व महापुरुष आहेत त्यात छत्रपती शिवराय, शंभूराजे, लिंकन, हिटलर, माजी सैनिक असे कितीतरी गुण्यागोविंदाने राहतात पण सृष्टीच्या नियमानुसार कोणीतरी वाईट असतोच, म्हणून मध्येच औरंग्या आहे, हो हो तोच तो, अबुल मुज़फ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर ! खतरनाक आहे हा! बघाल तेव्हा टोप्या विणत असतो. खूप धर्मांध आहे. ह्याला त्याचा धर्म आपल्याकडे पसरवायचा आहे म्हणून सतत प्रयत्नात असतो पण आपण पुरून उरलो राव ! तो ह्या महाराष्ट्रात मेला पण यशस्वी होऊन दिला नाही. ह्यालाच तर म्हणतात स्वाभिमानी हिंदू ! स्वतःला हा गाझी म्हणवून घेतो गाझी म्हणजे धर्मवेडा ! आणि शी ग्रेड संघटना ह्याला सेक्युलर म्हणून घोषित करतात, किती विरोधाभास ना ? तो अशी विशेषण स्वतःला लावून घेतो आणि हे लोकं जातीभेद करण्यासाठी त्याला खोट्यात पाडतात. सर्व वेड्यांचा बाजार मांडला आहे राव ! असो, आम्ही छत्रपतींचे सेवक आहोत त्यांच्या पायधूळ आम्ही अंगारा मानून कपाळी लावतो आणि साहजिकच ती आमची ताकद आहेत. त्यांचे विचार आमचा श्वास आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज ह्या सर्वांच्या केंद्रस्थानी आहेत. प्रत्येकाला आदर्श वाटावा असे आमच्या छत्रपतींचे राहणीमान आहे. हिंदू धर्म, देव आणि देश वाचवणारा हा राजा सर्वांच्या मनामनांत राज्य करतो. बाजूलाच शंभूराजे आहेत. अरे, धर्माचा अभिमान त्यांच्याकडून शिकावा. अफाट बुद्धिमत्तेचा हा राजा आजही आपल्यातील काही लोकांना समजलेला नाही, हे दुर्दैव आहे. आज त्यांचेच नाव वापरून काही संघटना नीच काम करत आहेत. ज्यामुळे समाजात अस्थिरता येत आहे तसेच जातीभेदाचे स्तोम इथे माजत आहे.


ह्या महापुरुषांच्या गटाची सुरुवात होते ती अब्राहम लिंकन पासून स्थितप्रज्ञ अब्राहम लिंकन यांची शांतात माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन जातात. हा माणूस ताडामाडासारखा उंच आहे आणि विचार सुद्धा त्यांच्यासारखेच सर्वोत्तम आहेत. आपले टेबल आणि काम यात ह्यात इतके गढून गेलेले असतात कि, फार कमीवेळा हे आमच्यात मिसळतात पण कधीही रागावताना यांना पाहिलेले नाही. विचार करण्याची अफाट ताकद असलेले लिंकन खूप काही स्फूर्ती देऊन जातात. इथे मी एक राजकीय चाल खेळलेली आहे, त्यांच्याच बाजूला हिटलर ठेवला आहे. बघाल तेव्हा हा लालेलाल झालेला असतोच, चिडचिडा, वैतागलेला असा हा अडॉल्फ हिटलर आहे. आजही आपल्याकडे हुकूमशाहीला समानार्थी शब्द हिटलर वापरला जातो. याची एकच बेरकी नजर थरकाप उडवून देते. याचे निर्णय आणि काम करण्याचा पद्धत कधी कधी बरोबर आहे असेच वाटत राहते आणि मला विचाराल तर आज आपल्या देशाला अशाच नेतृत्वाची गरज आहे. देशाबद्दलचा स्वाभिमान आणि शिस्त लावण्याची टॅक्ट याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत कोणा जवळ असेल. असो ! शेवटी हा ज्याचा त्याचा विचार आहे. हिटलरला परफेक्ट ठोसा म्हणून बाजूलाच एक अफलातून पुस्तक आहे, हो ! ज्यांच्याकडे आजही ७५ % नोबेल पारितोषिकं जातात. ज्यांच्याकडे पाहून आपल्याला देशभक्ती शिकता येते. जे लोक आयुष्य नाही तर आपला देश सर्वोच्च मानतात. असे हे पुस्तक म्हणजे इस्त्राईल युद्ध युद्ध आणि युद्धच ! म्हणूनच हा भाई इथे त्यांच्याकडे बेरक्या नजरेने पाहत आहे. असो ! तर हे पुस्तक शान आहे, माझ्या कॉम्प्लेक्सची ! हळूच मध्ये हिटलरच्या बाजूला ज्ञानेश्वरी ठेवून त्याची चांगलीच गोची करून टाकली आहे. ह्या कपाटाचे दार जेव्हा उघडतो तेव्हा कपाळाला आठ्या घालून हा माझ्याकडे बघत असतो.


आता देशभक्ती आली म्हणजे आपल्या देशातील महत्वाची व्यक्ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! धगधगतं अग्निकुंड म्हणजे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर ! धर्माचा अफाट अभिमान आहे परंतु त्यांना पुस्तक रूपात समजून घ्यायला थोडं जड जात पण एकदा वाचले कि, आयुष्यात मार्ग सापडतो. बऱ्याच गोष्टी नव्याने जुळून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या भाषाशुद्धीचा वसा वीर सावरकरांनी पुढे चालवला. माझी जन्मठेप वाचली कि, देशाभिमानाची ज्योत अखंड तेवत राहते, ते उगाच नव्हे. यांच्याच बाजूला त्यांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर आहेत. बाबाराव यांनी काही कमी भोगलेले नाही ते सुद्धा बोलायला लागले कि, डोळे आपसूक पाणवतात. विचार करा, लहानपणी नाकाचा हुंगूणा सतत फुटत असे म्हणून ह्यांनी नाकानेच पाणी प्यायला सुरुवात केली. भयानक ना ! सावरकर कुटूंबांनी जे भोगले आहे ते यांना भेटल्याशिवाय समजणार नाही. माझी जन्मठेप वाचताना डोळे आपसूक ओले होतात. ह्या कुटूंबाने देशासाठी काय काय केले आहे ? हे समजून घ्यायचे असेल तर त्यांवरील पुस्तकं महत्वाची ठरतात. सहा सोनेरी पाने म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ हे सोनेरी पान नसून नीचतम काळातून जेव्हा जेव्हा हिंदूंची पिढी हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान घडवते, ते आपल्या भारतीय राष्ट्राचे सोनेरी पान ! हे समजून येते. बाबारावांचे चरित्र, ख्रिस्तांचे हिंदुत्व, अंदमानच्या अंधेरीतून, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, बंदा बैरागी अशी कित्येक पुस्तकं आपले आयुष्य घडवायला महत्वाची ठरतात, ती आपल्या वाचनालयात हवीच.


काही पुस्तक जुन्या वाड्यांसारखी असतात, हो ! पुरंदऱ्यांचा सरकारवाडा त्यातील एक ! या वाड्यात फेरफटका मारताना मिळणारा अनुभव अगाध आहे. हा वाडा इतका प्रचंड आहे कि, कोणत्याही खोलीत थेट कऱ्हे पठारावरून जेजुरीच्या खंडोबाचा घंटानाद इथे ऐकू येतो आणि मन प्रसन्न होते. ह्या वाड्याने आपल्याला खूप काही दिले आहे कारण बाबासाहेब आणि त्यांचे "राजा शिवछत्रपती" हे महत्वाच्या चरित्राचा उगम इथूनच आहे. बघा ना, ती घाणेरडी संघटना गुढीपाडवा साजरा करू नका म्हणून हिंदूंमध्ये फूट पाडायला बघते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढीपाडवा साजरा केला होता, असा पुरावे देणारे पत्र ह्याच वाड्यात मिळाले आणि इतकेच काय तर हा वाडा सरते शेवटी आगीच्या भक्षस्थानी सापडला तेव्हा शिवशाहीर बाबासाहेबांनी सर्व प्रथम ह्या वाड्यातील तो पुस्तकांचा ठेवा वाचवला ज्यामध्ये हे पत्र होते म्हणूनच ह्या वाड्याची भूमिका महत्वाची ठरते तसेच हा वाडा माझ्या पुस्तकांची शोभा वाढवतो.


आयुष्यात सर्वांना आवडते ते म्हणजे पर्यटन ! पण त्याला अभ्यासाची जोड दिली तर ते पर्यटन न राहता एक संस्मरणीय ट्रिप होते आणि सतत त्यातून स्फूर्ती मिळत राहते. यासाठी आपल्याला वाचायला हवे आणि त्यासाठी काही लोकांना वेळ नसतो साहजिकच माझ्याकडे मात्र वाचनासाठी प्रचंड वेळ आहे. तरी सुद्धा Rapid Reading साठी व खास अभ्यासपूर्ण पर्यटनासाठी गोवा पर्यटन, अष्टागरे, मंदिरशैली, लेणीशैली अशी विविध पुस्तकं महत्वाची ठरतात. आपण जिथे राहतो तेथील खाचाखोचा माहित असाव्यात म्हणून घाणेकर सरांचे रायगड पर्यटन जबरदस्त आहे. तर असे आहे एकंदरीत अभ्यासात्मक पर्यटन !


दुसऱ्या म्हणजे शेवटच्या मजल्यावर तीन बलाढ्य अशी राज्य आहेत जी इतिहास कोळून त्यात अर्क ठेवला आहे. सर्व प्रथम आलेले आणि धर्मांतराचे ग्रहण लावणारे पोर्तुगीज, व्यापाराची पुडी सोडून राज्य करणारे इंग्रज अशा समुद्री सत्ता ब्रिटिश रियासतमध्ये बंद आहेत. त्यांच्या बाजूला दुसरी रियासत म्हणजे मुसलमानी रियासत ! अवघ्या दोन खंडात पूर्ण झाली आहे पण त्यांची आक्रमकता लपत नाही आणि त्यांनी आपल्या देशाचे केलेले नुकसान आजही भरून येण्यासारखे नाही. ह्या इस्लामी वावटळीत आपली जुनी मंदिरं तर आज शिल्लक सुद्धा नाहीत. ह्यांच्यामुळेच तर आज अस्थिरता आली, हे हि लक्षात असायला हवे. आपल्यावर कितीतरी अत्याचार केलेल्या ह्या राजसत्ता आज ह्या छोट्या जागेत दाटीवाटीने ठेवले आहेत. मात्र ह्यांना पुरून उरणारे आणि सर्वात मोठे राज्य शेवट पर्यंत टिकवणारे म्हणजे मराठ्यांचे राज्य ! ज्याला “मराठा रियासत” म्हणतात. ती तर आठ खंडात इथे आहे. अरे, आजही आपल्या राष्ट्रगीतात "मराठा" हा शब्द आहे ते उगाच नाही. अशी ह्या शब्दाची व्याप्ती आहे.


बाकी म्हणाल तर शिल्पांशी कधी तरी बोलावे जेणे करून ते मंदिरांचा इतिहास सांगतात आणि हे ग्रंथ जे माझ्यासाठी Dictionary म्हणून काम करतात त्यात पुरासंचय, प्राचीन भारत, पुरातत्व, पुरातत्वविद्या, शिलालेख वाचन, ताम्रपटवाचन अशी काही साधने आहेत पण हे समजण्यास आधी आपल्याला इत्नभूत इतिहास माहित असणे गरजेचे आहे.


छोटी मोठी पुस्तकं त्यांनासुद्धा इथे विसरून चालणार नाही. छत्रपतींच्या आयष्याशी निगडित असलेली हि पुस्तकं खरंच जीवनाचा सार शिकवितात. त्यातील आरमाराविषयीची पुस्तकं म्हणजे कर्तृत्वाचा कळस आहे. खालच्या बाजूला जवळ जवळ तीनशेपेक्षा जास्त गडांची जुजबी माहिती देणारे पुस्तकसुद्धा छान आहे.


तर अशा ह्या माझ्या पुस्तकांचा आज खास दिवस म्हणजे २३ एप्रिल ! जागतिक पुस्तक दिवस.... खूप साऱ्या शुभेच्छा ह्या पुस्तकांना आणि वाचकांना....


पुस्तकांत माझा जीव आहे त्यामुळे मी कोणालाही पुस्तकं देत नाही. घरी येऊन वाचा आणि चर्चा करा स्वागत करू पण मागू नका, हि विनंती !


लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.

लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

© सागर माधुरी मधुकर सुर्वे

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960