दुर्दैव खांदेरीचे....




दुर्ग खांदेरी, मराठेशाहीच्या जिद्दीचे प्रतीक ! इस १६७२ च्या एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी हे बेट हेरले परंतु गोड्या पाण्याच्या अभावामुळे दुर्ग बांधता आला नाही परंतु इस १६७९ च्या ऑगस्टमध्ये भर पावसात हा दुर्ग बांधायला काढला. हा दुर्ग बांधताना मुंबईकर इंग्रज, चौलचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्धी ह्यांना प्रचंड प्रमाणात शह तर दिलाच परंतु दुर्ग वाचवताना वेळेला आपले रक्तसुद्धा सांडलेले आहे. साहजिकच, मराठ्यांची जिद्द इथे चराचरांत आहे आणि म्हणूनच ह्या पवित्र दुर्गावरील माती आणि तो निशब्द दगड आमच्यासाठी पवित्र आहे. सिद्धी कोकण किनारपट्टीवरील लोकांना पकडून गुलाम म्हणून विकत असे, त्यावेळी ह्या व्यापाराला खीळ घालण्यात ह्या दुर्गाचा खारीचा वाटा आहे तसेच स्वराज्यातील हि महत्वाची व्यापारी वाट आपल्याकडे असावी म्हणून हा दुर्ग त्याकाळी महत्वाचा ठरत असे.


इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि सिद्धी हि सर्व शत्रूमंडळी ह्या बेटावर वर्चस्व गाजवण्यासाठी सतत प्रयत्नात होती परंतु दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवरायांनी हि भूमी आपल्याकडे राखली. हा दुर्ग बांधताना मराठे वेळेला उपाशीसुद्धा राहत होते. रसद वेळेवर पोहचेल कि नाही ? याची शाश्वती नसे तरी सुद्धा कोणतीही तक्रार न करता मराठ्यांनी हा दुर्ग दिवस-रात्र काम करून बांधून काढला आणि म्हणूनच ह्या दुर्गाला जिद्दीचे प्रतीक आज आपण मानले पाहिजे. आपल्या राजाने बाटवाबाटवीचे धंदे करणाऱ्या पोर्तुगीजांच्या गोव्याला शह देण्यासाठी शिवलंका सिंधुदुर्ग बांधला. गुलामांचा व्यापार करणाऱ्या सिद्धीला खीळ बसावी म्हणून जंजिऱ्याच्या उरावर पद्मदुर्ग बांधून काढला तर वरवर व्यापार करायला आलो म्हणून सांगणारे परंतु संपूर्ण भूमीच गिळंकृत करु पाहणारे मुंबईकर इंग्रजांवर वचक ठेवण्यासाठी दुर्ग खांदेरी बांधला. एकंदरीत भारताच्या इतिहासात संपूर्ण राजकीय दृष्टीने आरमार स्थापण्याची हि पहिलीच घटना असावी. असं म्हणतात कि, एखादी शक्ती परजण्यापेक्षा तिच्या अस्तित्वाची जाणीवही तिच्याविषयी जरब निर्माण करू शकते. इतकं सर्व आदर्शवत असताना आज हा पराक्रमी दुर्ग अतिशय खडतर आयुष्य जगत आहे.


ढासळलेली तटबंदी पाहताना जणू काही इतिहासच ढासळत होता. कोसळणारे बुरुज या दुर्गाचा इतिहास ओरडून सांगत आहेत पण आज तो ऐकायला कोणीही तयार नाही. छत्रपतींच्या स्वराज्यात साडे तीनशे पेक्षा जास्त गडकिल्ले होते तरी सुद्धा कोणत्याही गडावर त्यांचे नाव नाही पण आज खांदेरी दुर्गावर तेथील दगडी चिरांवर चक्क कलर पेंट करून काही लोकांनी स्वतःची नाव टाकली आहेत. असंस्कृत संस्कार दाखवायची जणू काही आज स्पर्धा लागलेली आहे. खरं तर हि जबाबदारी स्थानिकांची आहे, पर्यटकांची आहे पण आपल्या नाकर्तेपणाचा दोष ते सरकारला देत आहेत. अतिशय घृणास्पद प्रदर्शन घडत आहे. जो दुर्ग उपाशी पोटी राहून मावळ्यांनी बांधून काढला, वाचवला आणि जपला पण आज तिथे जागोजागी मांस शिजवून दारूच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत. इतकं कमी तर काय ! ढोल ताशा बडवत, मोठ्याने गाणी लावून तिथे अक्षरशः धुडगूस घातला जात आहे. खंत हि आहे कि, इतिहास विसरलेली हि माणसं अशी थेरं करायला लागली. दिवसभर दुर्गावर वेताळ भक्तांचा राबता असतो. साहजिकच जेवणसुद्धा तिथे बनवले जाते. ह्या कृतीला नकार मुळीच नाही परंतु जेवून झाल्यानंतर उष्ट्या पत्रावळ्या तिथेच टाकून दुर्ग नासवला जात आहे. ह्या वरून त्याच दुर्गसंबंधीत मला एक घटना आठवते, खांदेरी दुर्गावर चढाई करण्यासाठी १८ सप्टेंबर १६७९ च्या रात्री इंग्रज अधिकारी फ्रान्सिस थोर्प काही शिबाडं घेऊन आला होता. दारूचे प्रचंड व्यसन असलेला हा माणूस झिंगलेल्या अवस्थेतच लढाईत उतरला. त्याच वेळी मराठ्यांनी केलेल्या प्रतिकारात २ अधिकाऱ्यांसह हा ठार झाला. दारूड्यांची काय अवस्था होते ह्याचे हे द्योतक आहे पण दुर्दैवाने त्याच दुर्गात दारूच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत तसेच त्या बाटल्या इतस्त: फोडून नक्की काय आनंद मिळतो, हे समजत नाही. कधी तिथे गेलात तर लक्षात येईलच. काय वाटत असेल शिवरायांना ? ज्या राजाने कधीही दारूला स्पर्श न करता अथांग समुद्रावर अधिराज्य गाजवलं पण आज जिथे जेट्टी आहे तिथे दुर्दैवाने ह्या बाटल्यांचा खच पाण्यावर तरंगत असतो तसेच खांदेरीदुर्गात प्रचंड प्रमाणात बाटल्या पडल्या आहेत, ह्याचा विचारही कोणी करताना दिसत नाही.


दुर्गावरील उरलेले बुरुज आज सागराला तोंड देत आहेत. मुंबईकर इंग्रज कधीही दगाफटका करतील म्हणून त्यांच्या दिशेने लांब पल्ल्याच्या काही तोफा तैनात असत. आजही त्या तोफगाड्यावरील तोफा पाहू शकता परंतु त्यांची अवस्था सुद्धा जीर्ण झालेली आहे. ज्या तोफांनी त्याकाळी गड जागता ठेवला, ज्या तोफांनी आपला धर्म वाचवला तसेच ह्याच तोफांमुळे इंग्रजांचे "डव्ह" नावाचे गुर्राब मराठ्यांनी पकडले होते परंतु आज त्याच तोफा तिथे मातीत कोसळल्या आहेत. याहून वाईट सांगायचे झाले तर त्या तोफांवर सुद्धा काही दृष्ट लोकांनी स्वतःची नाव लिहिलेली आहेत. गडाच्या प्रवेशद्वाराजवळ ह्यातील काही तोफा उलट्या खोचून त्याला होड्या बांधल्या जात आहेत. आज त्यांची कोणतीही व्यवस्था केलेली नाही, हे पाहताना अतिशय वाईट वाटते. काही गडांवर निसर्गनिर्मित अशा काही "हटके" गोष्टी असतात, ज्या आपल्याला कुठेही आढळत नाही. त्यातील एक गोष्ट म्हणजे इथे असलेला नादमय भला मोठा दगड ! आश्चर्य वाटलं ना ! हो जसे विजयनगरला संगीतमय स्तंभ आहेत, तसे इथे एक मोठा दगड आहे, ज्यावर हळुवार प्रहार केला कि, अतिशय सुरेख असा संगीतमय आवाज येतो, जो मनाला भावतो. त्याच्यावरसुद्धा काही लोकांनी जोरदार प्रहार करून करून त्याला खड्डे पाडलेले आहेत. हा आपला ठेवा आहे, ज्याची आपण काळजी घेणे गरजेचे आहे नाहीतर येणारी पिढी ह्या सर्व गोष्टींना मुकेल.



ह्या दुर्गावर मराठ्यांनी केलेला पराक्रम, तोफांचे महत्व, दुर्गबांधणी ह्यावर विस्तृत विचार करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणाचे अलौकिक अध्वनीत पैलू आहेत. प्रकर्षाने हे विसरले गेले आहे. ज्या दुर्गाने एकेकाळी वैभव पाहिले त्याची आज दुरवस्था होत आहे आणि जर हे वाचवायचे असेल तर स्थानिकांनी आणि सरकारने वेळीच लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. सरते शेवटी काय तर इतिहास आपल्याला काय शिकवतो, हे पहायचे झाले तर आपण कोण होतो ? ह्या पेक्षा आपण कसं असलं पाहिजे आणि आपण कसं नसलं पाहिजे, हे शिकवतो.



हा लेख तरुण भारत, मुंबई आवृत्तीतील वृत्तपत्रांत दिनांक १८ मार्च २०१८ ला प्रसिद्ध झाला होता. खालील दिलेल्या लिंकवर पाहू शकता.

http://epaper.mahamtb.com/epaper.aspx?lang=2026&spage=Mpage&NB=2018-03-18#Mpage_8

.

होड्या बांधण्यासाठी खोचलेली आणि त्याकाळी आपला धर्म व हा दुर्ग वाचवणारी तोफ..


लांब पल्ल्याच्या मोठ्या तोफांची झाकणं (बोडूं)


दूरवर दिसणारा सिद्धीने वसवलेला दुर्ग उन्देरी..


पाण्याचे टाकं..


असंस्कृत लोकांचे देणं..


लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवू शकता.

लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

© सागर माधुरी मधुकर सुर्वे

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960