
अलीकडील अल्लाउद्दीन खिलजी बऱ्याच जणांनी चित्रपटात पाहिला पण पलीकडील खिलजी अंधारात आहे म्हणून इथे पार्ट - २ या सदरेत देत आहे कारण चित्रपटात व्हिलन असून तो अभिनयाच्या जोरावर हिरो ठरला आणि साहजिकच माझ्या मते, इतिहासातील पात्रांची आपल्याला संपूर्ण माहिती असेल तर मत बनवता येते आणि त्यासाठी हा ब्लॉगप्रपंच ! ह्या माहितीसाठी गो. स. सरदेसाई यांची मुसलमानी रियासत संदर्भासाठी वापरलेली आहे.
खिलजी हे घराणे अफगाणमधील खल्ज ह्या प्रातांतील आहे त्यामुळे त्यांना खिलजी हे नाव पडले. ज्यावर चित्रपट चित्रित झाला आहे तो अल्लाउद्दीन खिलजी ! ह्याला त्याच्या काकाने वाढवले त्याचे नाव जलालूद्दीन खिलजी होय. अल्लाउद्दीनच्या वडिलांचे नाव शहाबुद्दीन मसुद ! अल्लाउद्दीन हा पराक्रमी होता. त्याकाळी भयंकर अशा मंगोल फौजांना त्याने पाच वेळा हरवले होते आणि हा पराक्रम इतिहासाचा अभ्यास करताना नाकारता येत नाही साहजिकच ह्या पराक्रमाचे बक्षीस म्हणून गंगा आणि यमुना ह्या नद्यांच्या संगमाजवळ कुरा येथे त्याला त्याच्या काकाने सुभेदार नेमले. अरे हो आणि हा हिंदू स्त्रीशी लग्न करणारा पहिला मुस्लिम आहे, असे म्हणतात.
काही दिवसांतच अल्लाउद्दीनने विंध्य ओलांडला आणि यादवांची प्रसिद्ध राजधानी देवगिरी लुटली. हि प्रचंड लूट त्याने अफगाणला न पाठवता स्वतःजवळ कुरा येथे ठेवली. हाच राजकीय राग मनात धरून त्याचा काका इस १२९५ मध्ये त्याला भेटायला आला पण कसलं काय ह्या क्रूरकर्त्याने काकांचा कोथळा भर दरबारात बाहेर काढला व त्याचे शीर भाल्याच्या टोकावर खोचून संपूर्ण शहरात फिरवले. त्यामुळे त्याचा दबदबा आता वाढला. हिंदुस्थानच्या इतिहासात हिंदूंना त्रास देणारा हा सुलतान अगदी दक्षिणेत त्याच्या सरदारनांमार्फत रामेश्वर पर्यंत जाऊन कोसळला. त्याच्या वाटेत येणाऱ्या हिंदू राजांचा अतोनात छळ करत हिंदू राजस्त्रियांना मुस्लिम गोषांत त्याने ओढून आणले. ह्याला लिहिता वाचता येत नव्हते परंतु फौजेची व्यवस्था हा नीट लावून विजय मिळवीत असे. हा क्रुरकर्मा होताच कारण एकाच दिवसांत दिल्लीमध्ये तीस ते चाळीस हजार लोकांची कत्तल ह्याने करवली होती आणि असा हा हिंदुस्थानच्या इतिहासातील क्रूर वर्तन करणारा भयानक असा पहिलाच प्रसंग होय.
अल्लाउद्दीन खिलजीची पहिली बायको म्हणजे त्याची सख्खी चुलत बहीण जिच्या बापाला म्हणजे जलालउद्दीन खिलजीला मारुन तो सुलतान झाला होता, हि घटना आपण वर पाहिलीच. दुसरी पत्नी म्हणजे त्याने पळवुन आणलेली गुजरातच्या कर्णावतीच्या राजाची म्हणजे करण घेला याची राणी कमलदेवी ! आणि तिसरी आपल्या महाराष्ट्रातील बलाढ्य यादववंशीय राजा रामदेवरायाच्या गळ्यावर सुरी ठेऊन पळवलेली त्याची राजकन्या जेठाई !
कमलदेवीला जनानखान्यात डांबल्यावर गुजरातचा राजा करण घेलाची मुलगी देवलदेवीसह यादवांच्या आश्रयाला आला. अल्लाउद्दीनचा निर्लज्जपणा असा की, पळवलेल्या राणी कमलदेवीच्या मुलीची देवलदेवीची मागणी त्याने स्वत:च्या मुलासाठी केली. लढाईत राजा करण घेलो ठार झाला आणि देवलदेविला अल्लाउद्दीनाने दिल्लीत नेली आणि मुलगा खिज्रखानाशी निकाह लावुन दिला. गुजराती भाषेत या विषयावर "करण घेलो" नावाची कादंबरीसुद्धा आहे.
अलाउद्दीन खिलजीच बाकीचे सगळे कामजीवन म्हणजे त्याने बाटवलेेला हिंदु गुलाम ज्याच्याशी त्याचे बळजबरीचे विकृत संबंध होते. ज्यास त्याने खच्ची केले, तो आवडता गुलाम म्हणजे मलिक काफुर, शेवटी यानेच खिलजीला ठार मारले, हे हि लक्षात असू द्या.
अल्लाउद्दीन खिलजी व नंतर त्याचा मुलगा सुलतान मुबारकखान खिलजी याने हिंदुंवर जे अनन्वित अत्याचार केले त्याचा परिणाम दोन्ही खिलजींच्या भीषण अंतात झाला. अल्लाउद्दीचा गुलाम मलिक काफुर याच्यावर अल्लाउद्दीन खिलजी अतोनात आशिक होता, याच प्रेमकथेने खिलजीचा काटा काढला व नंतर रामदेवराय यादवाच्या मुलीच्या पोटी जन्मलेल्या अल्लाउदीनच्या ४-५ वर्षांच्या शहजाद्याला तख्तावर कठपुतळीसारखं बसवुन स्वत: त्याचा पालक म्हणून मलिक काफुर हा गुलाम राज्य पाहु लागला. त्याचाही महिनाभरात खून झाला आणि मुबारकखान हा अल्लाउद्दीन खिलजीचा वाचलेला मुलगा सुलतान झाला.
हा मुबारक खिलजी सुध्दा हसन नामक मुळ हिंदु असलेल्या व अल्लाउद्दीने पकडुन आणलेल्या एका देखण्या मुलावर आशिक होता. त्याने त्याला बढती देऊन नाव दिले होते खुस्रोखान ! हा खुस्रोखान मात्र मनातून संतप्त होता. इच्छेविरुद्ध सक्तीचे लैंगिक संबंध व सक्तीचे धर्मांतर याचा सूड त्यास घ्यायचा होता. त्यासाठी तो वाट पाहत होता, संधी मिळताच त्याने आपल्या भरवाड या जातीच्या आपल्या नातेवाईकांना व इतर हिंदुंनाही त्याने भराभर सैन्यात भरती करुन घेतले आणि मुबारकचा खून करुन स्वत:च सुलतान झाला. त्याने घेतलेले सुलतान पद हि हिंदु क्रांती होती, असे मला तरी वाटते.
खुस्रोखान सुलतान होताच त्याने व त्याच्या साथीदारांनी उघड उघड हिंदु धर्माचे आचरण सुरु केले. मशिदींची परत मंदिरे केली. गोहत्या बंदी केली. चार महिने दिल्लीतल्या व सुलतानी राज्यात सर्वत्र हिंदु राज्य सुरु झाले. खुस्रोखानची व भारवाडांची लष्करी ताकद चांगली होती. मुळात त्या वेळी हि जमात लढवय्यी म्हणून प्रसिध्द होती, सैनिकीकरण हिच त्या जातीची ओळख होती.
खुस्रोखान दक्षिणेत गेला असता हिंदु राजांशी कटकारस्थाने करुन सत्ता उलथुन टाकु पाहत होता पण त्यास अचानक दिल्लीस परतावे लागले होते. या वेळी संधीचा फायदा घेऊन सर्व भारतीय हिंदुंनी एकत्रित उठाव करुन भारत परकीय आक्रमकांपासुन मुक्त करण्याची संधी घेतली नाही व ५-६ महिन्यांतच खुस्रोखानला ठार मारुन तुघलक वंशाची इस्लामी सत्ता दिल्लीत प्रस्थापित झाली. इस्लामी रोपट्याचे वृक्ष व्हायला इथूनच सुरुवात झाली. तुघलकविषयी नक्कीच कधीतरी लिहीन.
तत्कालिन सुफी संत निजामुद्दीन औलिया हा तुघलकापेक्षा खुस्रोखानच्या बाजूने होता. तुघलक सत्तेवर आल्यानंतरही त्यांच्यात बेबनाव झाले. "दिल्ली तो बहोत दुर है", हा वाक्प्रचार म्हणजे एकवेळी तुघलकाने निजामुद्दीन औलियावर काढलेल्या एका आदेशाला अवलियाने तुघलकाला दिलेले तुच्छतापुर्ण उत्तर आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.
"इस्लाम खतरेमे" चा नारा देऊन तुघलक सत्तेत परतले. आजही हीच ट्रिक वापरून वातावरण ढवळले जात आहे. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काय, ते हेच !
खिलजीची हि बाजू म्हणजे इतिहासातील दुर्लक्षित असे एक पान आहे. सर्व मुस्लिम इतिहासकारांनी खुस्रोखानाच्या नावे भयानक शिविगाळ केली आहे. त्यावर विश्वास ठेऊन अर्वाचिन इतिहासकारांनी खुस्रोखानाच्या या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले व तवारिखकारांच्या मागे जाऊन खुस्रोला शिव्यांची लाखोली वाहीली.
सरदेसाई व के. एस. लाल यांसारख्या अगदी मोजक्याच अर्वाचिन इतिहासकारांनी, खुस्रोखानाला मुस्लिम दरबाऱ्यांनी एकतर्फी रंगवले आहे व हिंदुंनी त्याकाळी लिहिलेला इतिहास प्रकाशित झाला तर खुस्रोखानाची व या क्रांतीची दुसरी बाजू समजु शकेल असे मत मांडले.
आम्ही मुसलमान होऊ इच्छीतो, असा बहाणा करुन खुस्रोखानचे हिंदु साथीदार राजवाड्यात घुसले होते. स्वत:च्या मर्जीने जे मुसलमान होत त्यांना धनदौलत व नोकरी देऊन सन्मानित केले जाई.
एरवी युध्दकाळात हातात सापडलेल्यांच्या वाट्याला सक्तीचे धर्मांतर होते अशी साक्ष इतिहासाच्या पानोपानी मिळेल. स्वत:हुन धर्मांतर करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. हे समजण्यास कोणतेही समकालीन पुस्तक उघडुन नजर टाकली तरी समजेल, फार मोठी इतिहासाची वा संशोधनाची गरज नाही. ९९ % धर्मांतरे हि सक्ती व पैसा यांच्या जोरावर झाली.
सर्वसाधारण कोणत्याही जातीचा हिंदु अगदी तळागाळातला सुध्दा धर्म आणि जात सोडण्यास सिध्द नसे. धर्मांतर हे त्याच्या दृष्टीने मरणासमान होते. स्वत:चा धर्म हिंदुंना प्रिय असे. अगदीच नाईलाज झाला तर ते धर्मांतर करत. सर्वसाधारणपणे मुरतिद होणे म्हणजे परत धर्मत्याग करुन हिंदु होण हि उदाहरणे क्वचित होत. नेमकी कलाटणी मिळाली ती इथेच होत्याचे नव्हते व्हायला ! खुस्रोची क्रांती यशस्वी होती तर घरवापसीची शक्यता जोरदार होती. तसंही १३२० हा खुस्रोखानचा काळ !
याचीच पुनरावृत्ती दक्षिणेत १३३६ मध्ये होऊन परत हिंदु झालेल्या हरिहर व बुक्क यांनी विजयानगरचे साम्राज्य स्थापन केले हे ठळक उदाहरण आहेच.
मुसलमानी रियासतीचे लेखक सरदेसाई अल्लाउद्दीन खिलजी विषयी लिहितात,
"हिंदूंना हत्यारे, घोडे मिळू नयेत किंवा त्यांनी ते बाळगू नयेत, उंची पोषाख करु नये, छानछोकीने राहू नये असा बंदोबस्त अल्लाउद्दीन खिलजीने केला. हिंदुंना जमिनीचे अर्धे उत्पन्न कर म्हणून भरावे लागे. गाई, म्हशींचासुद्धा कर द्यावा लागे. कोणाही हिंदुच्या घरात सोने, चांदी वा सुपारीचा तुकडा सुध्दा उरला नाही. हिंदू अंमलदारांच्या बायकांना मुसलमानांच्या घरी चाकरी करावी लागे. हिंदूंना सरकारी नोकर्या मिळेनाशा झाल्या. मात्र एखाद्याला दरबारात नोकरी मिळालीच तर त्याला लोक आपली मुलगी लग्नासाठी देत नसत कारण अशा मुलींना मुसलमानांच्या जनानखान्यात नोकरीस रहावे लागे."
असा हा खिलजीचा काळ आहे, जो आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.
अल्लाउद्दीन खिलजी हा कट्टर धर्मांध होता. त्याच्या काळात हिंदुंची अत्यंत दयनीय अशी स्थिती झाली होती. आज चित्रपटात तो व्हिलन असून अभिनयाचा जोरावर हिरो ठरला आहे, हे हि खरेच ! परंतु त्याच्या ह्याही बाजूचा इतिहास आपल्याला माहित हवाच म्हणून हा लेखप्रपंच !
लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवू शकता.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment