![]() |
पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : नेपोलियन चरित्र
लेखक : म. श्री. दीक्षित
प्रकाशक : रिया पब्लिकेशन
पृष्ठ संख्या : ३३६
मूल्य : ₹ ४००/-
काही लोकं नियतीची अपत्य असतात असे म्हणतात, त्यातील ज्याचे नाव सर्वोच्च घेतले जाते तो म्हणजे नेपोलियन बोनापार्ट.....
आपला स्वातंत्र्यदिन आणि ह्याचा वाढदिवस एकाच दिवशीचा पण साल मात्र वेगळे ! हा भाई १५ ऑगस्ट १७६९ ला आताच्या फ्रान्समध्ये असलेल्या कॉरसिका बेटावर जन्माला आला. त्याचे पप्पा चार्ल्स पेशाने वकील पण मात्र फ्रान्सच्या राजाविरुद्धच्या लढ्यात ते सामील झाले. नेपोलियनची आई लेटेशिया रामोलिनो ही नेपोलियनच्या आधीच्या अपत्याला पाठीवर बांधून द्राक्ष मळ्यात मोलमजुरी करत असे. नेपोलियनचा जन्म झाला तेव्हा घरात फक्त ती एकटीच होती आणि ज्यावर ती प्रसूत झाली त्या गालिच्यावर ग्रीक महाकाव्यातील एक युद्ध प्रसंग विणलेला होता. कमाल आहे ना ! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात इथे मात्र जन्माला आलेले ते बाळच युद्धात दिसले. इथूनच सुरुवात होते, त्या जिद्दी योध्याची !
हे पुस्तक मी अंबरनाथला घेतले, अजब प्रकाशनचा सेल चालू होता आणि नेपोलियन सारखा एक गजब अवलियाने एका कोपऱ्यातून आवाज दिला, करारी आणि भन्नाट असा वेष असलेला व शिरस्त्राण घालूनच समोर उभा ठाकला आणि मग थेट त्याला मी घरी आणले. थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी आणि नंतर त्याने युद्धकथा सांगायला सुरुवात केली. फ्रेंच राज्यक्रांती मी शाळेत शिकलो होतो, डोकं उठायचे तेव्हा पण जसजसा काळ बदलत गेला आणि ह्या देशाविषयी भन्नाट गोष्टी कानावर यायला लागल्या तेव्हा पुन्हा प्रेमात पडलो, कोणाच्या ? फ्रान्सच्या राव ! नाहीतर...... असो ! हा देशच भन्नाट आहे. इथे नॉस्त्रादेमस होऊन गेला काही दिवसांपूर्वीच त्यालाही आपण भेटलो होतो. ह्या नेपोलियनचे भविष्य त्याने वर्तवले होते आणि शब्दांनी हाणला पण होता त्याला ! तर असा हा नेपोलियन मला भेटला.
नेपोलियनचे लहानपण अगदी आपल्यासारखेच गेले. त्याला युद्धाच्या कथा खूप आवडायच्या आणि म्हणूनच शिक्षणासाठी आपल्या आईला तो वयाच्या १०व्या वर्षी कॉरसिका सोडून फ्रान्समध्ये गेला आणि ब्रिनीच्या लष्करी शाळेत शिकू लागला. तिथे श्रीमंत मुलं त्याची थट्टा करत असत. मोडकी-तोडकी फ्रेंच बोलणारा हा तसा लाजरा-बुजरा होता. त्यामुळे त्याला मित्रही जोडता आले नाहीत म्हणजे घरी वडिलांचा सहवास नाही आणि इथे मित्र नाहीत त्यामुळे आईच त्याचं सर्वस्व होतं. ह्याच एकाकीमुळे तो अभ्यासू आणि वाचनवेडा झाला. वयाच्या सोळाव्या वर्षीच तो दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाला व आर्मीत लेफ्टनंट म्हणून दाखल झाला. सोळावे वरीस धोक्याचे म्हणतात. आपल्याकडे ह्याच वयात चौकात काय करत असतात, आपल्यातील काहीजण ? इथूनच सांगड घालत हे पुस्तक नेपोलियनचं चरित्र उलगडते आणि सुन्न करून टाकते आपल्याला ! नेपोलियनचा हजरजबाबीपणा आणि शब्दफेक खिळवून ठेवते आपल्याला ! मध्येच इथे नेपोलियनचा लष्करी गुरू गुबर्ट भेटायला येतो. अहाहा तो ही सॉलिड ! एकंदरीत नेत्रदीपक डावपेच, कमालीचा धुर्तपणा आणि grand tactics म्हणजे नेपोलियनच्या यशाचे मर्म होते. त्याला नियतीने प्रचंड प्रमाणात संधी दिल्या आणि त्याचे त्याने सोनं केले. आयुष्यात Dearing फार महत्वाची आणि ती त्यात ओतप्रोत भरली होती, उगाच नाही राव रिव्होलीच्या लढाईत नेपोलियनच्या मांडीखालचे पाच घोडे शत्रूकडून टिपले गेले तरी तो डगमगला नाही तसेच एका युद्धाच्या धावपळीत दोनदा कैद होण्याची वेळ त्यावर आली तरी हा वाचला.
ह्या चरित्रात त्याचे एक वाक्य खूप पटतं, तो इटलीत लढाईला गेला होता आणि तिथे त्याने लोकांसमोर भाषण केले त्यात तो म्हणतो, "देशाला आज खरी गरज आहे, समर्थ नेतृत्वाची, खुर्च्या अडवून वादविवाद करणाऱ्यांची नाही." ज्जे बात नेप्या ! जिंकलास मित्रा जिंकलास ! असला भारी होता हा ! यशाची शिखरं पादाक्रांत करत असताना लक्झेंबर्गच्या वाड्यात त्याचा २ जानेवारी १७९८ ला सत्कार झाला. सत्कारादाखल केलेल्या भाषणात त्याने लोकांना मंत्रमुग्ध केले. लोकांचे त्यावरील प्रेम पाहता, प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि समारंभाचा अध्यक्ष बारास हा नेपोलियनविषयी अवघं एक वाक्य बोलला. ते असे होते, Nature has exhausted all her powers in the creation of Bonaparte.
जिद्द, आकांशा, dearing आणि संधीच सोनं हे आपल्याला स्वतःच्या आयुष्यात उतरावायचे असल्यास एकदा तरी हे पुस्तक चाळणं अगदी गरजेचे आहे. नेपोलियनचे वादळी जीवन विविध रसांनी भरलेलं आहे, एखाद्या महाकाव्याचा नायक शोभावा, असं आपल्याला सतत वाटतं. हे पुस्तक वाचताना अगदी सहजपणे छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, सिझर, फ्रेडरिक, बाजीप्रभू, सर्वच आठवतात. नेपोलियन रसायन होता, जिथे मिसळाल तिथे विजय साकार होत होता.
सरते शेवटी चटका लागतो, जबरा पूर्वार्ध गाजवणारा हा उत्तरार्धात रडवतो. काहीही म्हणा, मला ते १८१८ साल अंगावर काटाचं आणते. आपल्या गडांना भिकारड्या प्रॉथरचे ग्रहण लागले आणि एकएक गड उद्धवस्त होत गेला इथेसुद्धा ह्याच सालात नेपोलियन क्षणाक्षणाला ढासळत होता. इंग्लडच्या मगरमिठीत भारत आणि नेपोलियन अडकले होते. भारत सुटला पण नेपोलियन मात्र सुटू शकला नाही. वेलींग्टन नावाचा अधिकारी नेपोलियन बरोबर खूप सहानुभूतीने वागला पण दुय्यम अधिकारी "लो" ह्याने मात्र त्याला अपमानास्पद वागणूक दिली. तरी सुद्धा इंग्लंच्या काही सैनिकांनी नेपोलियनला सॅल्युट मारला आणि लो खवळला. संपूर्ण युरोपला दणाणून सोडणारा हा नरकेसरी खंगत होता. दुःखाचे वाटेकरी कोणीच होत नाही, त्यावेळी जो तो पळून जातो. त्याच्या बाबतीतही असेच झाले. भाऊ-बहीण, पत्नी व मित्र इथेच कोणीच आले नाही की इंग्लंडने भेटून दिले नाही ? इथे मात्र मला प्रश्न सुटला नाही पण त्याच्या आईचे त्याला सेन्सॉर झालेले पत्र आले आणि तो ढसाढसा रडायला लागला. तेव्हा त्याची आई रोम मध्ये होती. ते पत्र इथे मी जसेच्या तसे देतो. ती लिहिते, "पोरा, इतक्या लांब, सहा हजार मैल दूर मी कशी येऊ ? फार थकले आहे. डोळ्यानं नीट दिसत नाही. यायला निघाले आणि वाटेत बोटीवरच मेले तर......."
नियतीने दुसरा फटका दिला होता, इस १८२० नेपोलियनची बहीण एलिसा वारली. तिच्या निधनाचे वृत्त ऐकताच तो एवढेच म्हणाला, बोनापार्ट कुटुंबातील व्यक्ती जाण्यास आरंभ झाला, आता बहुधा माझी पाळी ! ह्याच क्षणापासून त्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे स्वसदनी कोंडून घेतले. खाण्यापिण्याचे प्रमाण कमी केले. त्यानंतर कधी खायची इच्छा झाली आणि काही खाल्ले तर त्याला उलटी होई. एकंदरीत जुलाब त्याला लागले. क्षीण होत होत दिवा आता फडफडू लागला होता. मृत्युपत्र तयार झाले. माझे वडील कँसरने गेले बहुतेक मी ही त्यानेच जाईन. पुढे माझ्या मुलाला कँसर होऊ नये म्हणून त्याने काळजी घ्यावी असे तो पुटपुटला. इंग्लंडच्या नावाने बोट मोडून त्याने पुत्राला पत्र लिहिले, उगाच सूड घेण्याच्या भानगडीत पडू नकोस; उलट आहे त्या परिस्थितीचा फायदा घे, असा सल्ला त्याने दिला. ५ मे १८२१ वयाच्या ५२व्या वर्षी सुर्यास्तसमयी ५ वाजून ४९ मिनिटांनी वीर सावरकरांप्रमाणे उघड्या डोळ्यांनी चैतन्याचा महामेरू मृत्यूच्या साम्राज्यात विलीन झाला.
शवविच्छेदन केले आणि त्यात पोटाचा कँसर झाल्याचे निष्पन्न झाले. सेंट हेलिनामधून ह्या बादशहाची अंतिम यात्रा निघाली आणि एका ओढ्याकाठी धरणी मातेत गडप झाली. जागता पहारा बसला आणि मागे फक्त आठवणी राहिल्या. पुढे फ्रेंच सरकारने इंग्लंडच्या परवानगीने इस १५ ऑक्टोबर १८४० ला पुन्हा नऊ तास खपून कबर उकरली आणि ते अवशेष वाजतगाजत पॅरिसला आणले तेव्हा दिनांक होती २ डिसेंबर ! ह्या योध्याचे बूट कुरतडलेले होते. सदरा जीर्ण झाला होता. दाढी व नखे वाढली होती. शरीर मात्र शुष्क होतं. अलगद उचलून त्याला नव्या पेटीत प्रतिष्ठापना केली. फ्रान्समध्ये सीन नदीकाठी नेपोलियनचे त्रिखंडव्यापी पाऊल पडले आणि जयजयकार झाला, २१ तोफांची सलामी दिली आणि हा योद्धा दुसऱ्यांदा दफन झाला. ज्यांना जिद्दी लोकांविषयी वाचायला आवडते, त्यांनी हे पुस्तक वाचायला हरकत नाही. एक मस्त अनुभव पाठीशी मिळेल.
No comments:
Post a Comment