रायगड जिल्ह्यातील आपल्या कर्जतची मागील ब्लॉग मध्ये आपण ऐतिहासिक ओळख करून घेतलेली आहे आता भौगोलिक व ह्या नावाची ओळख करून घेऊया. कमाल आहे ना, ह्या नावाची स्वतंत्र अशी ओळख आहे, जी तार्किकदृष्ट्या विचार करण्यासारखी आहे आणि म्हणूनच इथे ते मांडत आहे. ह्या गावाच्या नावाविषयी ठोस असे काहीस सापडत नाही पण ज्या काही आख्यायिका चालत आल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला माहित असणे गरजेचे आहेत, त्या खालीलप्रमाणे....
१) पहिली शक्यता
साधारणतः सह्याद्रीच्या कुशीत असलेले कर्जतला उल्हास नदी लाभल्यामुळे सुजलाम सुफलाम प्रदेश निर्माण झाला आणि आजही तो तसाच आहे. इसवी सन पूर्वापासून चारही बाजूने इथे घाटवाटा उतरतात किंवा चढतात आणि समांतर असलेल्या बंदरांकडे हे व्यापारी तांडे प्रवास करतात. ह्या सर्वांचा आणि पुढे गडकिल्यांचा विचार करता इथे कर गोळा करण्यासाठी ठाणं असण्याचा संभव आहे म्हणजेच कर, जत आणि जकात गोळा करण्याचे हे ठिकाण पुढे कर्जत झाले असावे. असं तार्किक मत तज्ञांचे आहे. कोणकोणत्या घाटवाटा उतरतात हे आपण पुढे सविस्तर पाहणार आहोतच तूर्तास त्यांची नावं पुढीलप्रमाणे....
आज ह्या वाटांवर ट्रेकर्स आणि काही अभ्यासक मंडळी फिरकत आहेत परंतु बऱ्याच जणांना ह्या वाटा आज माहित नाहीत म्हणून ह्या पेजमार्फत आपण त्यांची तोंडओळख करून घेणार आहोत.
भीमाशंकर मधून कर्जतला येणाऱ्या व्यापारी घाटवाटा म्हणजे शिडी घाट, बैलघाट, गणपती घाट व खास यात्रेकरूंसाठी साखरटकी व हटकरवट ह्या वाटा होत्या.
पदरगड ते कोथळीगडच्या मध्ये असलेल्या वाटा - खेतोबा घाट, वाजंत्री घाट आणि नाखिंदाची वाट !
कोथळीगड ते ढाक बहिरी मधील घाट म्हणजे प्रसिद्ध असा कुसुर घाट ! पुढे हा कुसुर गावातून थेट जुन्नरकडे जातो.
कर्जतच्या दक्षिणेला घाटावर चढणार प्रवास सुरु होतो तो म्हणजे आताचा बोरघाट ! पण एकेकाळी ह्याचा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हापासून ह्याला समांतर असा राजमाची घाट होता. ज्याला कोकणदरवाजा असे सुद्धा म्हणतात. ह्याच वाटेवर आपल्या तालुक्यात सातवाहनांच्या काळात कोंडाणे लेणी कोरलेली आहे, त्याची सुद्धा माहिती ह्या आपल्या साईटवर आपण घेणार आहोत.
वरील मांडलेल्या सर्व वाटा थेट इसवी सन पूर्वतील सातवाहनांची प्रमुख पेठ जुन्नरकडे धाव घेतात तर तिथून त्यांची राजधानी असलेल्या पैठणला राजमार्गाने भेट घेतात.
ह्या घाटवाटा खास करून कर्जत जवळील व्यापारी बंदरांना म्हणजचेच कल्याण, पनवेल व उरणला जोडल्या गेल्या होत्या.
२) दुसरी शक्यता
अहमदनगर जिल्यातील कर्जतमध्ये १९व्या शतकाच्या पूर्वार्धात दुष्काळ पडला होता तेव्हा काही माणसे ते गाव सोडून इथे स्थायिक झाले आणि म्हणून ह्या गावाचे नाव कर्जत झाले, पण हि शक्यता मनाला रुचत नाही कारण इथे असलेल्या लेण्यांवरून काही प्रमाणात वस्ती ह्या उल्हास नदीच्या किनाऱ्यावर हजारो वर्षे असणार असे वाटते.
तर मान्यवरांनो असे आपले कर्जत आहे. आपल्या ह्या विभागात खास माहितीचा आज शुभारंभ आपण केलेला आहे, पुढे पुढे कर्जतमधील ऐतिहासिक पाऊलखुणांच्या माहितीचा आपण आढावा घेणार आहोत.
No comments:
Post a Comment